निर्लोभ प्रीत माझी माया टाकुं नका ॥धृ०॥
पावले कष्ट इतुका स्नेह तुमचा जोडितां ।
निर्लज्ज जवळ निजले, आतां कां सोडितां ? ।
लाउन सोनकेळी पाणी कां तोडितां ? ।
अपला संग्रह होतां वाटते शरिर वाहावे
सागरिं बुडि देतां कोरडे कसे रहावे ? ।
जवळुनि येतां जातां अनाथाकडे पाहावे
मज काहींच न द्यावा पैसा दमडी रुका ॥१॥
प्रीतीच्या आधारानें जाहले साहेबसुभी ।
भोगुन अंतर द्याव हें न दिसे वाजवी ।
दूर जात नाहीं कोठें शेजारीं मी उभी ।
छत गालिच्या हंतरते, बैसा राजिवनेत्रा ! ।
ओणवी पाय चुरते आपले कोमळगात्रा ।
तुमच्या मागें करिते देशांतरिंच्या यात्रा ।
कल्याणभूषणमित्रा, तूं माझा सोनका ॥२॥
हाडाचीं काडें करून आर्जव संपादिलें ।
आजवर अंगाखाली काचानें नांदले ।
हें वर्तमान समुळीं अवघे निवेदिले ।
ईश्वरसूत्रीं आचरणें, निर्फळ काय बकावे ।
व्यर्थच रागें भरणें तुम्ही येवढें टाकावें ।
थोराचें हेच करणें उघडयाला झाकावें ।
आधीं काम करून भावें कापावी मान कां ? ॥३॥
अज्ञानदशा माझी काय काय सांगु अपणां ? ।
नि:शंक जवळ आले, सोडावी कल्पना ।
होनीजी बाळा म्हणे हो ऐका विज्ञापना ।
किंचित न्य़ून नसावें संगत केल्या अर्थीं ।
निर्मळ लक्ष असावें रूचकर गोड पदार्थीं ।
अवघड कसणिं कसावें, मी सुंदर भावार्थी ।
क्षोभित विषय अनर्थी जिव झाला तानका ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel