मी तर तुमच्याजोगी ।
नित मजला भोगी ॥धृ०॥
तुम्ही तर शिरिमंत राजे । सौदागर माझे
रुप लावण्य विराजे । अशी कांता साजे
गुणमंडित गुण गाजे । झ्यां झ्यां नौबत वाजे
आज बसले अर्धांगी ॥१॥
करिते आदर आदराणा । जिव घ्या नदराणा
तूं नगद माल किराणा । प्रियकर पतिराणा
कां पोटाशीं धरा ना ? । मन शांत करा ना
मी झाले इतरागी ॥२॥
शिरि जरि हिरवा फेटा । हिरवाच दुपेटा
भर मदनाच्या लाटा । आवडसी मोठा
आवळुन मजला भेटा । मुख माझें चाटा
निसंग जाहले जोगी ॥३॥
मजवर लोभ असावा । कधीं राग नसावा
ममताघन वर्षावा । संशय निरसावा
कमानिला तीर कसावा । घट्ट जवा बसावा
होनाजी बाळा रागीं गाती सारंगी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel