भोगा एकांतीं येकट, तिखट मर्जी कां हो इतुकी ? ।
काय तरी सांगा घडली चुकी ॥धृ०॥
तुम्ही पाच्छाय, रयत मी केवळ तुमची बघा ।
चालवा अतां सुखाच्या वगा ।
करून सात सायास करितसे या पायाची निगा ।
जवळ निजते हें ठाउके जगा ।
जिव जातो तडतडा, काय गत करूं शरिराच्या भगा ? ।
तिफाशी नरद लागली पगा ।
गळिं पडुं पडुं घेते छंद मालखांवद, तुम्हांला बघुन
घ्या आयती नवती हातीं, आली ती घटका जाती निघुन
पदरीं पडले तें भरा भरभर जाइल उलघून
आला दिवस दगदगुन (?) वृथा जगजगुन होतेसे दु:खी ॥१॥
महालमजकुराखालीं जन्म गेला नित उमजावितां ।
असेंच लटलटकें समजावितां ।
हमरस्ता चालुं द्या, प्रीतिची वाट कशी बुजवितां ? ।
मधुर फळ पिकलें का कुजवितां ? ।
तुम्हाखालिं बेलाशक दमले देह झिजणी झिजवितां
कशाला वरवरते रिझवितां ? ।
म्हणते साहेबशिरताज, बरें आज सांपडला एकटे
दिली ब्रह्मानें निरगांठ, करा वहिवाट, कोणाला सुटे ?
स्वाधिन जाहले आगदीं ! कागदी घ्या लेहून लाखोटे
कुठें जाण्यायेण्यास आपणा द्या मेणा-पालखी ॥२॥
द्यावा मज पदिं ठाव, सदर शिरपाव कृपेचा करा ।
बोल पुर्विंचा साचा करा ।
ज्यानें चाकरी केली द्यावें अंतर कसें त्या चाकरा ? ।
शोध आधीं पुरता याचा करा ।
धर्मशील म्हणवितां, काहीं लौकिक नांवाचा करा ।
सत्य ही अपली वाचा करा ।
मशि येवढें का तापला ? प्राणदिप अपला ओवाळिते
गादीवरते धनि तुम्ही, प्रधान मी, सेवा संभाळिते
जनाबरोबर तोलल्या बोलल्या शब्दाला पाळिते
अंगावर लोळते, खेळते, बरीवाईट ठाउकी ॥३॥
करूं नये त्या नात्यानें करितसा भलभलती तु टाळता (?) ।
गोष्टी का मागील उटाळतां ? ।
झूल जरिच जड नव्हे गजाला, कां हो कंटाळतां ? ।
बरें नाहीं वेळा टाळितां
परिसा अजुन काय चित्तामध्यें घोटाळतां ? ।
सोवळें असतां विटाळतां ।
मिठी मारूनिया धरितसे, करितसे पोटामधें कळवळा
तुमचेविण कोणा वरूं ? काय करूं भरला गोतावळा ?
मग जाहली उभयतां गार, विषय हा फारच उतावळा
होनाजी बाळा म्हणे, फळा आला ऋणानुबंध कीं ।
भरून घे द्रव्याच्या संदुखी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel