कामापुरतें मशिं हासतां, बरे मतलबसाधु दिसतां ।
शरण आल्यावर मरण देउं नये, थोर म्हणुन धरली आस्था ॥धृ०॥
चला येकांतीं मजलीं, कां मर्जि कठिण जाहली जड कां ? ।
चुकलें आसन तर रुसा, नाहीं तर मग येवढी तुमची भिड कां ? ।
धर्मन्यायें चाला धड कां मजविषयीं पडली आड कां ।
लटकें असेल तर पहा पुराणें, चार वेदशास्त्रें हुडका ।
लाल रंग नवति भडका, भोगायाची नावड कां ? ।
दीन भाषणें भावार्थें भाकितां पाझर ते सुटती खडका ।
ही पूर्व दिशा प्रत्यक्ष भासते मजला तुमची आज्ञा
आपलि म्हटल्यावर जिला, तिला सांभाळणें सर्वज्ञा
प्रीत उभयतांची कशि चालवा जैशी भीमप्रतिज्ञा
घडली अवज्ञा कधिं नसतां, याच वेळेला कां रुसतां ? ।
मदन थरारि जेव्हां तेव्हां ती मरणांतिक होते अवस्था ॥१॥
लाभ भरामध्यें भर लुटला, आतां कशानें जिव विटला ? ।
मजवर तुमचा लोभ वाटतो, मुसळाला अंकुर फुटला ।
मुळापासून मेरू खटला किंवा सागरहि अटला ।
ढोंघधतोरे सारें पांडतां विषय कोणाला तरी सुटला ? ।
तुम्हांखालता उर पिटला, भोग भोगितां देह घटला ।
पूर्णाहूत प्राणाचि अजुन कां नाहीं मनचा संशय फिटला ? ।
हा महा सुखाचा मेघ वर्षतां चालुन आले द्वारां
वैश्वानर धडकावला काम, त्या दु:खाला संहार
अवघड जाग्याचें दु:ख सांगतां येइना जनवेव्हारा
तुम्ही सारासार समजतां, हें दुसर्‍याला काय पुसतां ? ।
जमाखर्च रोकडा, सोशिली म्या अजवर तुमची खस्ता ॥२॥
सुखशैजेचा खुषमक्ता, हाजिर होते मी त्या वक्ता ।
देउन हाक मला, न कळता मज कां नवतीकडे झुकतां ? ।
जाबसाल माझा उक्ता, तुम्ही तर परद्वारीं जुकतां ।
पैशा शेर सरसकट बरोबर मिठसाखर कां हो विकतां ?
घरिं पैका भरला मुक्ता, कसे कराराला चुकतां ? ।
अति शहाण्याचा बैल रिकामा, समजावा मार्ग उरकतां ।
तो कल्पवृक्ष, कल्पिलें न देतां कोठें बोभाटा न्यावा ?
त्या सिंधु जीवनीं मासोळीसारखा पाई जागा द्यावा
मग केली सदरलुट माफ, जन्मतों हवा तसा रस घ्यावा
गोड घोट प्यावा नुसतां, मला चुकावून कां बसतां ? ।
न मिळावा जो कधिं तुम्हांला तोच माल जाला सस्ता ॥३॥
दिवस चालले भरभर, आयुष्य जातें झुरझुर ।
किति करावे आर्जव तुमचे, अजुन बोलणें वर वर वर ।
पाऊस पडतो सर सर सर, भरती गंगा तर तर तर ।
नाहीं भरंवसा कांहीं घडिमधिं, पाणी उतरतें खर खर खर ।
मन वारा फिरे गर गर गर, शरीर कापतें थर थर थर ।
दु:ख मला सोसेना, आंत हें काळिज कांपें चर चर चर ।
जाला बंदखुलासा पुरज्या पूर्ण होत घामा घाई (?)
घरोघर असंख्य धुंडितां अशी योग्य नार कोठें नाहीं
येक ठाइ दोघे निजतां, आनंदाचा हमरस्ता
होनाजी बाळा म्हणे, तुझा गडे वैर्‍यावर कंबरबस्ता ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel