मनमोहना गुणनिधी, येकांतामधीं चला नेते ।
जिवाला जीव तुमच्या देते ॥धृ०॥
जन्मांतरसंग्रहीं जोडिल्या पुण्याच्या राशी ।
उभयतां त्या आल्या फळाशी ।
कृपाजळाचें स्नान मला राहणें या पायापशीं ।
कशाला मग व्हावी काशी ?
स्वामिपद पाहातां काय कारण इतर जनासी ? ।
असें पुरतें आणा मनासी ।
बांधिलें प्रीतकंकण तुम्ही आपले करीं
घातलें वस्त्र मायेचें शरिरावरी
काढितां कशी तड लागल माझी बरी ?
बारा महिने रमते तुमच्या बराबरी
न भेटतां क्षणभरी अंतरीं मी घाबरि होतें ॥१॥
कल्याणाच्या योगें समर्थाचें दर्शन होणें ।
मला भगवंताचें देणें ।
नव निधी अनकुळ सकळ मंडळ कीर्ती जाणें ।
भासतां ईश्वराप्रमाणें ।
खुशाल राहावें तुम्ही, हेंच माझें अवघें लेणें ।
मागणें हें मागुन घेणें ।
राहिले सुखाच्या स्नेहमंडपतळवटीं
पहिलीच विश्वकर्म्यानें लिहिली चिठी
प्रीतिनें शिवानें ठेविली गंगा जटीं
मी तशिच म्हणुन बाळगा झांकल्या मुठीं
त्रिकाळ भेटीसाठिं छंद हा रात्रंदिस घेते ॥२॥
तप करितां स्वहितार्थ गजाचे गंडस्थळिं बसले ।
चांगली अर्धांगी दिसले ।
अमरपतीपद उणें वाटतें सुख पाहुन असलें ।
मनामधें हें माझ्या ठसलें ।
कंच्या गोष्टीसाठीं तुम्हांवर्ती सांगा रुसले ।
बहुत परोपरी मजला कसलें ।
पूर्वींचे चांगलें हें होतें ठेवणें
मागुन मुखांतिल ग्रास मला जेवणें
“आपली’ असें जनलौकिकास दावणें
अडल्या-भिडल्या-नडल्याची कड लावणें
बोलावणें येतांच निजायाला नेहमीं येते ॥३॥
येका खांबावरी द्वारका मी केवळ तैसी ।
उतरतां हो खालीं कैशी ? ।
अंगिकारिली तिला म्हणावी लग्नाची जैशी ।
वाढवावी ममता लैशी ।
सत्यवचन करणार आढळली कोण तरी ऐशी ।
लागले थोराचे वंशीं ।
मर्यादशीळसंपन्न अशी आबळा
घडिघडि धरुन पोटाशीं तुम्हि आवळा
ठायिंठायिं उभि राहुनिया पडते गळां
धरु नये आतां किंचित भास वेगळा
होनाजी बाळा म्हणे, माग तुज काय हवें तें ।
भोग सारे पदार्थ आयते ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel