जिवलग जीवीचा बाई छान छबेला ॥धृ०॥
किति तरी जीव हा बाई कसुनि कसावा ।
आनंद सुखाचा प्राणी पलंगीं असावा ।
कोणे सवतीनें मोहुन प्राणविसावा ।
फिताउनि नेला गे फिताउनि नेला ॥१॥
काय आहे दुसरेपाशी काया हे सोन्याची ।
हिरे जडउनी बसली असल मिन्याची ।
म्हणोनिया सांड केली असल जुन्याची ।
पाहा घात केला गे पहा घाट केला ॥२॥
नये मज धुंडित जातां रात्र अंधारी ।
कोणि तरी जवळी आणा, असेल शेजारीं ।
खुशालीनें बक्षिस देइन तुम्हां निर्धारीं ।
शिरपाउ शेला हे शिरपाउ शेला ॥३॥
म्हणे गंगु हैबती प्राणप्रियेसी ।
रहा गडे सावध अपुले क्रियेशीं ।
सुखी राखो देव तुम्हां असें अस्त्रियेशी ।
महादेव भोळा, महादेव भोळा ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel