साजुक नाजुक कळ्या पिवळ्या गुंफुनी आपहस्तकीं । प्राणविसाव्या बैस मंचकीं, तुस खोवीन मस्तकीं ॥धृ०॥

सत्य वचन इमान, प्राण संकल्प करीन तुजवरून । नाहीं तुसी बैमान कापलीस मान हातिं शिर धरून । तुझ्या पदरची दासी जिवलगा सनद देत्यें करून । तुळशी-पत्र भंडार दिवस रविवार घ्या मुठ भरून । लागली चटक या जीवा प्रियकरा । मज मैनेच्या राघवा प्रियकरा । तुजमज सारिखा जवा प्रियकरा । चालवा कीं माझा लळा, पडीलें गळां पाहूनी वस्त कीं ॥१॥

तुझी काळजी मला जीवलगा जासुद पिटीला येथुन । बराणपुर पैठण थेट पोशाख आणिलें तेथुन । अगाबानी चंदेरी महमुदी सांगीतल्याम्यां आंतुन । ज्यावरी तुमची रीज बुजली त्याची आणीवाल्या तेथुन । देइन जीवासी जीव प्रियकरा । जाण पैशावर चाचव प्रियकर । मी तशी लालुची नव्हे प्रियकरा । खोटी असेन तुझविशी करावी चौकशी आजी पुस्तकीं ॥२॥

नाना परीचे पदार्थ पुरवीन बसल्या नाना परी । शहर पुण्यामध्यें कराव्या मौजा झोक लाउनी भरजरी । मुखचंद्राची प्रभा तेज अमोल तनु गोजिरी । स्वरुप पाहातां मुखरण पद्मीण झुरते बंगल्यावरी । नको जाउं कुणाचें येथें प्रियकरा । घ्या दृष्टीचा ताईत प्रियकरा । या सवती मला माहीत प्रियकरा । वेडया होउनी तुज भवताल्या घालीतील गस्त कीं ॥३॥

जाइजुई सेवंति मोगरा बरा पांच हिरवा । केतकी-महतकी मालती दवणा पलंगावर भरवा । लावा गंध केशरी कपाळीं, मधीं टिळा भरवा । पाहा माझी चतुराई गुंफिला तुरा नजर ठरवा । कवी विश्वनाथ गीरि म्हणे गुणिजना । गुंफिला तुरा युक्तिनें गुणिजना । आदि माया आदिशक्तिनें गुणिजना । म्हणे विठोबा, नांदे लक्षुमण निजामपुरीं वस्ती कीं । मलुदसु कवी बाळ करिती कवन शिरां दस्त कीं ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel