लाहोरांत त्यांना नवजवान सभा काढली. तिच्या पंजाबभर शाखा. भगतसिंगांनीं पंजाबभर काकोरी दिन साजरा केला. अनेक हुतात्म्यांचे नि क्रांतिकारकांचे फोटो मिळवून त्यांनीं स्लाईडस् तयार केल्या. लाहोरच्या ब्रॅडले हॉलमध्यें मॅजिक लँडर्ननें हे सारें दाखवण्यांत आलें. प्रत्येक क्रांतिकारकाचा परिचय भगतसिंगानीं लिहिला होता. अलोट गर्दी जमली होती. पंजाब सरकारनें या कार्यक्रमावर पुढें बंदी घातली. काकोरी कटानंतर संघटना विस्कळित झाली होती. ती पुन्हा नीट उभारायची  ठरलें. भगतसिंगांनीं अनेक ठिकाणीं तरुण मिळावे म्हणून दौरा काढला. काशी विद्यापीठांत तेव्हा शिवराम राजगुरु शिकत होते. ते त्यांना मिळाले. कलकत्त्याचे बटुकेश्वर दत्त मिळाले.

भगतसिंग वगैरे क्रांतिकारकांनी आपल्या संघटनेचें नांव बदललें. समाजवादी रचना व्हावी असे अभ्यासानें त्यांना वाटलें. “ हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन ”असें नांव घेतलें. आग्रा शहरांत त्यांनीं दोन घरें भाडयानें घेतली होतीं तेथे तरुण राहत. कधीं डाळे चुरमुरेच खात. कडाक्याच्या थंडीत पांघरायला नसे. नेम मारायला शिकणें, इतिहास , अर्थशास्त्र यांचा अभ्यास, डोंगर चढणें, द-या उतरणें, पोहून जाणे, इत्यादी गोष्टी शिकत. अशा वेळेस लालाजींवर मार पडल्याची बातमी आली. भगतसिंग, सुकदेव, राजगुरु यांनी लाहोरला जायचें ठरविलें. चंद्रशेखर आझाद हेहि दूर उभे राहणार होते. पळून जायचें नाहीं, ज्योतीन मुकर्जीप्रमाणे पोलिसांशीं लढत देत मरायचें असें ठरले.

१७-१२-१९२८. लालाजींना लाठया मारणारा सार्जंट साँडर्स फटफटीवरुन जात होता. गोळया घालण्यांत आल्या. सँडर्स मरुन पडला. चौघे रिव्हाल्वर घेऊन उभे होते. कोणी आलें नाही. ते निघून गेले. दुस-या दिवशीं लाहोरभर भिंतीवर पत्रकें “लालाजींचा बदला घेतला - हिंदी सोशलिस्ट रिपब्लिकन असोशिएशन, ” अशीं लावली गेली.

चंद्रशेखर आझाद गोसाव्याच्या मेळाव्यांत गेले नि निसटले. भगतसिंगांनी गो-या ऑफिसरचा पोषाख केला. ते गोरे गोरे होते. बरोबर सुकदेव हे पट्टा घातलेले शिपाई. आणि राजगुरु टिफिन कॅरियर घेऊन जाणारे बबर्जी झाले !  नवी कोरी करकरीत ट्रंक बरोबर. ट्रंकेवर लाहोरांतीलच एका बडया अधिका-याचें नांव आणि स्टेशनांत आले तिघे. ट्रंकेवरचें नांव पाहून पोलिसांनी मुजरा केला !

भगतसिंग वगैरे कलकत्त्याला गेले. १९२८ डिसेंबरमध्यें तेथें राष्ट्रसभेचें अधिवेशन होते. कांहीं बंगाली क्रांतिकारक काळयापाण्यावरुन सुटून आले होते. भगतसिंग त्यांना भेटले परंतु कांहीं दिवस सशस्त्र क्रांतींत पडायचें नाहीं असें बंगाली क्रांतिकारकांनी ठरवलें होते. भगतसिंगांनी त्यांच्याजवळून बाँबविद्या घेतली. अज्ञात लोकांना निवारा म्हणून कलकत्त्यास एक हॉटेल त्यांनी सुरु केलें आणि परतले. पंजाबांत व अन्यत्र त्यांनी बाँब तयार करणे सुरु केलें. या सुमारास दिल्लीच्या विधि-मंडळांत सरकारनें “पब्लिक सेफ्टी बिल व ट्रेड डिस्प्यूट्स अ‍ॅक्ट ” हीं दोन बिलें आणलीं. असेंब्लित बाँब फेंकायचें ठरलें. कोणा माणसावर नाही टाकायचा, पळून जायचें नाहीं. हिंदुस्थान किती असंतुष्ट आहे हें बाँबच्या आवाजानें ब्रिटिशांच्या कानांत घुसवायचें. सभांनी तें नाही घुसत. तीन दिवस खिशांत रिव्हॉल्वर आणि बाँब घेऊन बटुकेश्वर आणि भगतसिंग असेंब्लीच्या गॅलरीतंत जात होते. भगतसिंग रुबाबांत जायचे. जणू मोठा साहेब वाटे. ८-४-१९२९ ला त्यांनीं बाँब टाकले. धूरच धूर. सभासद पळाले. कोणी संडासांत लपले. पंडित मोतीलाल नेहरु, मदन मोहन मालवीय, अध्यक्ष विठ्ठलभाई पटेल आणि सर जेम्स क्रेशर हे चौघे आपापल्या जागीं स्थिर होते. भगतसिंग, बटुकेश्वर तेथें उभे होते. भरलेले रिव्हाल्वर हातीं होते. परंतु त्यांनी कोणाला मारलें नाही. एखाद्याची हत्त्या हें त्यांचें ध्येयच नव्हते. नाहींतर तो बाँबही कोणावर त्यांनी टाकला असता. ते पोलिसांच्या स्वाधीन झाले. खटला सुरु झाला.

“इन्किलाब जिंदाबाद, कामगार वर्गांचा जय असो ”अशा घोषणा कोर्टांत येतांना करीत. त्या नवीन घोषणा होत्या. भगतसिंगांनी जी कैफियत दिली ती चिरंजीव आहे. क्रांतीचें शास्त्रीय तत्त्वज्ञान तिच्यांत त्यांनी मांडलें. ते म्हणतात “वाटेल त्याची कत्तल करणारे आम्ही भाडोत्री सैनिक नाही. आम्ही इतिहासाचा सखोल अभ्यास केला आहे. आम्हाला येथील शासनपध्दतीचा बाँब टाकून सक्रीय विरोध करायचा होता. आम्हीं मानवी जीवन पवित्र मानतो. मानव्याच्या सेवेसाठीं आम्ही प्राण देऊ. परंतु राजकीय स्वातंत्र्यासाठी नि:स्वार्थी हिंसा ही हिंसा होत नाही. गॅरिबॉल्डी, शिवाजीमहाराज कां हिंसक ? व्यक्तीला मारण्यांत अर्थ नाही. परंतु संघटीत सशस्त्र क्राति करण्याचा गुलाम राष्ट्राला हक्कच आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel