त्यांनी सरकारी नोकरी सोडली. न्यू इंग्लिश स्कूल एक जानेवारी १८८० मध्यें स्थापिलें. मुलांना पुस्तकें हवीत म्हणून किताबखाना, छापायला हवींत म्हणून चित्रशाळा असे उद्योग आरंभिले. आपल्याकडे चित्रांची प्रथा नव्हती. चित्रशाळेंतून ‘रामपंचायतन’ हें पहिले रंगीत चित्र छापलें गेलें, हजारो प्रती खपल्या. आणि पुढें केसरी व मराठा हीं दोन साप्ताहिकें सुरु केली. निबंधमाला बंद करुन ग्रंथमाला सुरु करणार होते. परंतु एके दिवशीं फोटोसाठीं उन्हांत उभे राहिले. घरी येऊन पडले. हाच आजार. याचा आजारांत ते देवाघरीं गेले.
“ तुम्ही इतकें कडक कसें लिहितां ?” असें कोणी विचारले तेव्हा ते म्हणाले, “ आमचा एक पाय तुरुंगांत असतो.”

ते मेले तेव्हां केसरीवर खटला चालूच होता. आगरकर, टिळक हे डोंगरीच्या तुरुंगांत गेले तेव्हा विष्णुशास्त्री देवाघरी होते. परंतु त्यांची तयारी होती. त्या काळांत ते गडगंज पैसा मिळविते. एकदां न्यू इंग्लिश स्कूल पहायला तेलंग आले होते. ते म्हणाले, “अशा संस्थेंत काम करावें, असें मलाहि वाटतें. परंतु दोन लाख रुपये शिल्लक टाकूं दे. अजून कांहीं हजार कमी आहेत ! ” विष्णुशास्त्री यांचा त्याग यावरुन दिसून येईल. ते पुस्तकें घेण्यांत पैसा खर्चित. पुण्यास टाऊन हॉल करण्यासाठीं सभा भरली. आंकडे कोण घालणार ? कोरा कागद एका हातांतून दुस-या हातांत जात होता. शास्त्रीबोवांनी आपल्या एक महिन्याच्या पगाराचा आंकडा घातला !

तेव्हां ते सरकारी हायस्कुलांत शिक्षक होते. असा हा कर्मवीर होता. त्यांनी हजारोंना स्फूर्ति दिली. त्यांचा ‘इतिहास’ हा निबंध वाचूनच राजवाडे त्या कार्यार्थ उभे राहिले. विष्णुशास्त्री वारल्याचें ऐकून, “ मृत्यू म्हणजे काय तें मला आज कळलें ” असें राजवाडे म्हणाले. टिळक, आगरकर सारे याच त्यागाच्या शाळेंत तयार झाले. “His fall was like the fall of Roman Empire ”- स्विफ्टचें मरण रोमन साम्राज्याच्या पडण्याप्रमाणें वाटलें असें एकानें म्हटलें आहे. निबंध - मालाकारांचें तें मरण असेंच वाटलें. अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यांतील खटाटोप ! ते आद्य शंकाराचार्य अद्वैताचा संदेश देऊन ३२ व्या वर्षीच निजधामास गेले. हा नवभारताचा द्रष्टा महापुरुषहि त्यागाची, ज्ञानोपासनेची, देशभक्तीची दृष्टि देऊन, नवप्रकाश देऊन निघून गेला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel