कर्मवीर भाऊराव पाटील

कर्मवीर श्री. भाऊराव पाटील यांना मागील महिन्याच्या २७ तारखेस सातारा येथे एक लक्ष रुपयांची थैली कृतज्ञतापूर्वक देण्यात आली.

कर्मवीर महर्षि भाऊराव पाटील यांचे शिक्षणक्षेत्रांतील काम अद्वितीय आहे. त्यांच्या संस्थांचा सातारा जिल्हाभर पसारा आहे. लाखोंचे वार्षिक अंदाजपत्रक असतें. खेडयापाडयांतून प्राथमिक शाळा, निमदुय्यम शाळा, दुय्यम शाळा ठायीं ठायीं यांनी स्थापिल्या. ट्रेनिंग कॉलेजें, पुरुषांचीं, स्त्रियांची काढलीं. सातारा येथें सुंदर हायस्कूल चालविले. कॉलेज सुरु केले नव्हे गांधी विद्यापीठ काढण्याचाहि भव्य संकल्प बोलून ठेवला आहे. मी त्यांच्या संस्था पाहिल्या आहेत. मुलें स्वयंपाक करीत आहेत, सफाई करीत आहेत, सारें पाहिलें आहे. भाऊरावांनीं या कार्यात तनमनधन ओतलें. त्यांच्या पत्नीनें मंगलसूत्रहि  संस्थेस शेवटीं समर्पिलें होतें. त्याग व कष्ट नि अपार निष्ठा यांच्या पायावर त्यांनीं थोर काम उभें केलें.

विशेषत: मागासलेल्या समाजांतील विद्यार्थ्यांना पुढे आणणें हें त्यांचे गौरवास्पद कार्य आहे. “भविष्य राज्य तुमारा मानो; अऐ मजदूरो और किसानो ” असे आपण म्हणतों. तो भार खांद्यावर घेऊं शकतील असे खंदे नवतरुण,  ज्ञानविज्ञानसंपन्न असे निर्माण करणें त्यासाठीं आवश्यक. ही आवश्यकता कर्मवीरांनी ओळखली हें त्यांचे ऋषित्व. ऋषी हा त्रिकालज्ञ लागतो. भूतकाळांतील अनुभव जमेस धरुन वर्तमानांत वावरत  असताना जो भविष्याकडे दृष्टी ठेवतो तो ऋषि.

महर्षींनीं अनेक तरुणांना परदेशांत पाठविलें आहे. कोणी परत आले आहेत. अशा रीतींने ज्यांना आपण मागासलेले म्हणतों त्यांच्यात आत्मविश्वास उत्पन्न करणें, त्यांच्यांत प्रखर अशी ज्ञानज्वाला पेटविणे हे थोर कार्य होय. श्री. भाऊरावांनी तीन तपांवर सेवा करुन आपलें नांवा अजरामर केलें आहे. आपल्या सेवेचा कळस म्हणून गांधी विद्यापीठ - जेथून ग्रामीण विद्येतील पारंगत विद्यार्थी बाहेर पडतील-सहकारी शिक्षण, मधुमक्षिका शिक्षण, चर्मोद्योग, दुग्धालयें, अशा अनेक विषयांतील तज्ज्ञ पदवीधर बाहेर पडतील असें विद्यापीठ त्यांच्या हातून उभे केलें जावो हीच मंगल आशा प्रकट करुन महर्षींच्या सेवेला प्रणाम करतों. त्यांच्या विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel