शांत ज्वालामुखी
प्रत्येक काँग्रेसवाल्याच्या प्रत्येक शब्दास अमर्याद महत्व आहे हें जाणूनच त्यानें बोलतांना प्रत्येक शब्द तोलून पेलून बोललें पाहिजे.
-पंडित जवाहिरलाल

काँग्रेसच्या व. कमिटीनें जें पत्रक प्रसिध्द केलें त्याचा केवळ सारांश, आजच्या अंकांत दिला आहे. वास्तविक तें पत्रक सर्व अक्षरश: दिलें पाहिजे होतें. सर्व प्रांतिक वा जिल्हा काँग्रेस कमिट्यांचें माझ्या दृष्टीनें हें पवित्र कर्तव्य होतें कीं या पत्रकाच्या संपूर्ण भाषांतराच्या लाखों प्रति काढून त्या सर्वत्र वांटणें. असें एक घर रहातां कामा नये कीं, ज्या घरीं तें पत्रक गेलें नाहीं. परंतु आमच्या काँग्रेस कमिट्या जागृतच नसतात. ज्याप्रमाणें काँग्रेसचे ठराव आजपर्यंत दप्तरांत राहिले, त्यांचा धूमधडाक्यानें प्रचार करण्याचें आमच्या कधीं स्वप्नींहि मनांत आलें नाहीं, त्याप्रमाणे आजच्या या पत्रकाचेंहि होईल. आमच्याजवळ प्रतिभाच नाहीं. या क्षणाचें महत्वाचें काम, तिकडे लक्ष जात नाहीं. राष्ट्र तयार कसें करावें याची कल्पनाच आमच्याजवळ नसते. तुफानी प्रचार, लाखों पत्रकें, प्रचंड मिरवणुकी, गाण्यांचा गुणगुणाट, पोवाड्यांचा दणदणाट असें सारखें चाललें पाहिजे. वास्तविक या वेळेचें व. कमिटीचें पत्रक इतकें महत्वाचें आहे कीं, काँग्रेसच्या आजपर्यंतच्या इतिहासांत इतकें महत्वाचें पत्रक प्रसिध्द झालें नाहीं. काँग्रेसकडे नेहमीं चिकित्सक दृष्टीनें पाहणारे एक हिंदुमहासभेचे कार्यकर्ते मजजवळ म्हणाले, “हें पत्रक खरोखरच गंभीर व काँग्रेसच्या धीरोदात्तपणास शोभेसें आहे. काँग्रेससंबंधीच्या वाटणार्‍या शंका या पत्रकानें निरस्त झाल्या आहेत. हें पत्रक फ्रेम करुन ठेवण्यासारखें आहे.” या हिंदुमहासभेच्या भक्तानें आपल्या अनेक इष्टमित्रांस काँग्रेसचें हे पत्रक अवश्य वाचा असें पत्रांतून मुद्दाम सुचविलें होतें.

खरोखरच हें पत्रक थोर आहे. त्यांत काँग्रेसची आजपर्यंतची भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्नांची नीट छाननी केली आहे. ब्रिटिशांचे धोरण फाडून फोडून स्वच्छ रीतीनें जगासमोर मांडलें आहे. संस्थानिकांना गंभीर इषारा दिला आहे. आणि जनतेला सावध रहा, सुसंघटित रहा, हुकमाकडे लक्ष ठेवा असें सांगितलें आहे.

हें वर्किंग कमिटीचें ऐतिहासिक महत्वाचें पत्रक, गंभीर उदात्त असलें तरी निश्चित गर्जना त्यांत नाहीं असें कांहींचें म्हणणें आहे. असें कळतें की, भाई जयप्रकाश नारायण, राष्ट्रगौरव सुभाषचंद्र वगैरे म्हणत होते कीं, निश्चित काय तें जाहीर करा. पं. जवाहरलाल जयप्रकाश यांच्यावर थोडे रागावलेहि. जहाल कार्यकर्त्यांचे म्हणणें कीं, “तें जाहीर केलें असतें तर इतर लहानमोठ्या ज्या संस्था आहेत, त्यांना आपापलीं मतें प्रसिध्द करण्यास जरा संकोच वाटला असता, कदाचित् जरा लाज वाटली असती परंतु काँग्रेसचें निश्चित धोरण गुलदस्त्यांत राहिल्यामुळें आज इतर सर्वांनी कोल्हेकुई सुरु केली आहे. काँग्रेसच्या म्हणण्याचा इतरांवर परिणाम होण्याऐवजी आज इतरांच्या म्हणण्याचा काँग्रेसवर परिणाम होणार कीं काय असें वाटूं लागलें आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel