सूर्यप्रकाशाप्रमाणें स्वत: निर्भय होऊन आपल्या सर्व स्नेह्यासोबत्यांसहि वज्रसमान निश्चयी वृत्तींने निर्भय बनवा. हिंदु लोक नेभळट, भित्रे, दुबळें बुळ्ये, आहेत ही जगाची समजूत दूर करा. मन निर्भय असल्यावर दुबळें शरीरहि अचाट करणी करील. प्रचंड व अजस्र रशियन शिपायांचा, देहानें लहान पण मनानें निर्भय व तेजस्वी जपानी वीरांनीं कसा चक्काचूर केला होता ! निर्भय व्हा, नि:शंक व्हा; सतेज व्हा, बलवान व्हा; हिंदुस्थानास निर्भय मनाच्या व जोरदार वृत्तीच्या तरुणांची जरुर आहे, मातींत मान खुपसणार्‍या मुर्दाडांचें काय काम आहे ?

थेंबें थेंबें तळें सांचे
लंडनमध्यें ब्रिटिश म्यूझियम म्हणून एक उत्कृष्ट संस्था आहे. हा म्यूझियम १७५१ मध्यें स्थापन करण्यांत आला. या म्यूझियममध्यें सर्व जगांतील उत्कृष्ट वस्तु, अलौकिक चमत्कारिक वस्तु ठेवलेल्या आहेत. हिंदुस्थानांतील जुने शिल्पकलेचे नमुने, जुनीं नाणीं, ईजिप्तमधील सोन्याची थडगी हजारों वर्षांपूर्वीचीं मसाला घालून पुरुन ठेवलेलीं ज्यांस ममी म्हणतात-तीं प्रेतें हें सर्व या म्यूझियममध्यें आहे. निरनिराळ्या काळांतील शस्त्रास्त्रें, पोषाख अलंकार सर्व कांही येथें आहे.

या म्यूझियममध्यें खुद्द लंडन शहरांत ठिकठिकाणीं सांपडलेल्या प्राचीन वस्तु किती तरी आहेत. निरनिराळ्या ठिकाणीं खणतांना मजुरांना अनेक जुन्या वस्तु तेथें सांपडतात. कारण, लंडन हें फार प्राचीन शहर आहे. येथें रोमन राजे झाले, सॅक्सन झाले, अनेक घराणीं झालीं. तें कधीं प्लेगनें उजाड झालें तर कधी आगींने खाक झालें; यामुळे पुन:पुन्हां तें नवीन वसलेलें आहे.

लंडनमध्यें एक लारेन्स नांवाचा मनुष्य आहे. सुमारें ४० वर्षांपूर्वी लंडनमधील जुन्या वस्तु गोळा करण्याचा नाद त्यास लागला. लॉरेन्स घरचा श्रीमंत होता. काम करणार्‍या खणणार्‍या मजुरांकडे तो जाई व त्यांस सांगे, जर खणतांना कोठें कांही चमत्कारिक पदार्थ तुम्हांस दिसला तर मला आणून देत जा. मजुरांनी वस्तु आणल्या कीं लगेच रास्त ती किंमत पण लारेन्स देऊन टाकी. कधींकधीं एक एक पौंडसुध्दां तो मजुराच्या हातांवर ठेवी. रोमन काळांतील, सॅक्सन काळांतील, ट्यूडर काळांतील अनेक नाणीं वगैरे हजारों वस्तु त्यानें गोळा केल्या. लॉरेन्स मजुरांमध्यें प्रिय झाला. कारण, तो सढळ हातानें पैसे देई. एका लंडन शहरांतच १२००० प्राचीन वस्तु लॉरेन्सनें गोळा केल्या.

गेलें महायुध्द सुरु होण्यापूर्वीची गोष्ट. एक दिवस एक मजूर झोळींत कांही तरी भरुन लॉरेन्सकडे आला. ते तुकडे विटांसारखे दिसत होते. लॉरेन्सनें ते तुकडे ठेवून घेतले. नंतर ते चांगले पुसले. आश्चर्याची गोष्ट ते ट्यूडर कारकीर्दीतील बहुमोल दागिने होते. दुसर्‍या दिवशीं त्याच ठिकाणाहून मजुरांनी आणखी थैल्या भरुन आणल्या. लॉरेन्स समक्ष त्या ठिकाणीं गेला. ती जागा म्हणजे ट्यूडर व स्टुअर्ट राजांची जवाहीरखान्याची जागा होती असें उघडकीस आलें. केवढा अपूर्व लाभ ! तो सर्व जवाहीरखाना म्युझियममध्यें ठेवण्यांत आला. या जमादारखान्यांतील वस्तूंनीं ब्रिटिश म्युझियममधील एक स्वतंत्र खोली भरुन गेली आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel