अशा रीतीने कामास आरंभ होत आहे. आपला शिष्य कौन्सिलमध्ये झगण्यास योग्य झाला असे पाहन न्या. रानडयांनी आपला देह १९०१ च्या जानेवारी महिन्याच्या १६ तारखेच्या उत्तररात्री खाली ठेविला. रात्रंदिवस देशहिताची काळजी वाहणारा, धोरणी, विद्वच्छे्रष्ठ, असा महापुरुष इहलोक सोडून निघून गेला. सर्व चळवळींना जन्म देणारे, सर्वांस कार्यप्रवृत्त करणारे, टीकेचा पाऊस पडत असता हिमालयाप्रमाणे गंभीर राहणारे, कृतीने व मनाने थोर असे सत्पुरुष ईश्वराकडे गेले. मार्ग दाखविणारा गेला. काळयाभोर अंधारात चंद्राप्रमाणे  शीतल प्रकाश देणारा महात्मा मृत्यूराहूच्या मुखात पडला. सर्व देश हळहळला. कोण हळहळणार नाही? या मृत्यूने गोपाळरावांच्या मनाची स्थिती किती चमत्कारिक झाली असेल बरे? ज्याने नवीन दृष्टी दिली, नवीन सृष्टी दाखविली, संकटाच्या वेळी सदुपदेशाची वृष्टी केली त्या पितृतुल्य गुरूच्या मृत्यूने गोपाळराव क्षणभर स्तिमित झाले, परंतु क्षणभरच. रानडयांनी रडावयास शिकविले नाही, तर रडे गिळून काम करता करता पडावयास शिकविले. समर्थांच्या समाधीच्या समय त्यांचे शिष्य असे मुळुमुळू रडावयास लागले,  तेव्हा समर्थांनी काय सांगितले होते? 'आजपर्यंत शिकलात ते रडण्यासाठीच का ? मी चाललो तरी माझा दासबोध आहे. त्यात माझा आत्मा आहे. तो दासबोध समोर ठेवून बागा म्हणजे मी जवळ असण्यासारखेच आहे. यासमयी गोखल्यांसही रानडयांचाच उपदेश आठवला असेल. जीवित म्हणजे कर्तव्य आहे. येथे रडावयास वेळ नाही. आपला शोकावेग त्यांनी आवरला, डोळे पुसले आणि गुरूचा उपदेश जो अंतरी साठविलेला होता तदनुसार वागावयाचे ठरविले.

न्या. रानडयांची स्मारके सर्वत्र उभारण्यात आली. कोठे वाचनालय, कोठे ग्रंथालय; कोठे तसबीर, कोठे पुतळा; काही ना काही तरी या थोर पुरुषाचे स्मारक लोकांनी केले. आपल्या गुरूस आणि गुरुभक्तीस साजेसे स्मारक गोपाळरावांनी उभारावयाचे ठरविले. त्यांनी वर्गणीसाठी व्याख्याने दिली. एक लाख रुपये गोळा केले. या रकमेतून पुण्यास सर्व्हेंट ऑफ इंडिया सोसायटीच्या अग्रभागी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या जवळ स्मारकार्थ 'इंडस्ट्रिअल व एकॉनॉमिक इन्स्टिटयूट' स्थापण्यात आली. या इमारतीचा उदघाटन समारंभा १९१० मध्ये गव्हर्नरांच्या हस्ते झाला. येथे अर्थशास्त्रावरील निवडक पुस्तकांचा चांगला संचय आहे. प्रयोगशाळाही साधारण चांगली आहे, परंतु एक लाख रुपयांत ही कामे  यशस्वी कशी होणार? फक्त अर्थशास्त्राचा व्यासंग व अभ्यास करण्यासाठी ही संस्था स्थापिली असती तर बरे झाले असते. परंतु गोखल्यांच्या आशेस पारावार नव्हता. 'I know no limitations for the  aspirations of  my Countrymen' हे त्यांच वाक्य. प्रयोगशाळेत शोध लागून हिंदुस्थानची औद्योगिक उन्नती व्हावी, आपल्या देशाचा दर्जा वाढावा असे त्यांस वाटत होते. परंतु अशा गोष्टीस कोटयवधी रुपये लागतात. सरकार चा आश्रय लागतो. गोपाळरावांस वाटत होते की, म्युनिसिपालिटीमधून आणि सरकारमधून आपल्या संस्थेस साहाय्य मिळेल; परंतु ही आशा व्यर्थ ठरली. एक लाख रुपये म्हणजे नुसता कात आहे. परंतु पुढेमागे संस्था भरभराटेल असे वाटले असावे 'उत्पद्दन्ते विलीयन्ते दरिद्राणां मनोरथा:' हा नियम खरा आहे. परंतु आपण दरिद्री असलो तरी 'अल्पारंभ' करून मनातील कल्पना लोकांपुढे निदान आज मांडून तरी ठेवावी या हेतूने गोपाळरावांनी हे स्मारक उभारले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel