विद्यासागर हे विनयाची मूर्ती होते. गर्वाची बाधा, वृथाभिमान ही त्यास शिवली नाहीत. डामडौल त्यांस माहीतच नव्हता. नम्रता हा त्यांचा अभिजात गुण. एकदा एक पूर्वबंगालमधील गृहस्थ पश्चिम बंगालमधील मोठे लोक कसे असतात हे पाहण्यास निघाला. त्यास या मोठ्या लोकांची परीक्षा घ्यावयाची होती. तो प्रथम एका मोठ्या गृहस्थाकडे गेला. आपण ऐकले त्याप्रमाणे हा पुरुष खरोखर मोठा आहे का हे त्यास पाहावयाचे होते. झाले; ते ह्या घरात गले. परंतु काय? तेथे त्यांची दादच लागेना. “आता वेळ नाही. पुन्हा केव्हा तरी या, सध्या फार काम आहे,” असा वरून त्या मोठ्या पुरुषाचा निरोप आला. तो गृहस्थ आल्या पावली माघारी गेला. नंतर दुस-या एका अशाच थोर समजले जाणा-या गृहस्थाच्या घरी हा मनुष्य गेला; तेथे पहिल्यासारखीच किंबहुना जास्तच कटुतर अशी त्याची संभावना झाली. तेथे अर्धचंद्र मिळाला व हे गृहस्थ निमूटपणे माघारे परतले. हा पूर्वबंगाली गृहस्थ आता संतापला. तो म्हणाला, ‘दोन श्यालक (या शब्दाचा अपभ्रंश त्याने वापरला) पाहिले; आता तिसरा पाहावयाचा राहिला आहे.’ हा गृहस्थ आता विद्यासागरांकडे आला. “विद्यासागर घरात आहेत का? आम्ही त्यांस भेटावयाच्या हेतूने आलो आहोत. आहेत का? भेटतील का? सांगा लवकर, नाही तर आपला चालता होतो.”

विद्यासागर तेथेच ओटीवर होते. ते म्हणाले, “या, बसा. पाय वगैरे तर धुवा. कपडे वगैरे काढा. तोंड वगैरे धुवून जरा अल्पोपहार करा; दूध वगैरे घ्या तो विद्यासागर येतीलच.”

“छेः छेः! मला बसावयास वेळ नाही. आधी ते असले तर पुढचा प्रश्न. वरती कोठे असतील नाही का? त्यांस खाली भेटावयास वेळ नसेल नाही? फार असतील बडी बडी कामे त्यांना?” असे हा परका गृहस्थ आवेशाने म्हणाला.

“असे काय करता? आल्यासारखे आता येथेच राहा. आंघोळ वगैरे सर्व घ्या करून. मी तुमची सर्व व्यवस्था करतो. येथे तुमची काडी इतके न्यून पडणार नाही. आपलेच घर समजा. विद्यासागर मग भेटतीलच तुम्हांस. विद्यासागर म्हणजे का कोणी राजे आहेत, का देव आहेत, तुम्हास न भेटण्यास? विद्यासागरांचे हे शब्द ऐकून तो मनुष्य जरा शांत झाला. येथे काही तरी निराळा आतिथ्य प्रकार दिसतो आहे असे त्याने पाहिले. शेवटी त्यांनी पोषाख काढला. स्नान वगैरे झाले. आत भोजनाची तयारी झाली. पाने मांडली. पाहुण्यांस पहिल्या पानावर नेऊन विद्यासागरांनी बसविले. जेवणाचा थाट चांगलाच होता. आलेले सद्गृहस्थ म्हणाले, “विद्यासागर नाही वाटते आमच्या पंगतीबरोबर जेवावयाचे? त्यांची मागाहून खाशांची पंगत व्हावयाची असेल?”

विद्यासागर म्हणाले, “तसे नाही परंतु आपण फार दुरून आलात; आपण भुकेले असाल; दमले असाल. तेव्हा आपण भोजन वगैरे करून विश्रांती घेतलीत म्हणजे आपणास आराम वाटेल. या हेतूने आपल्यासाठी लवकर जेवणाचा बेत केला आहे. निराळी पंगत वगैरे असले प्रकार येथे नाहीत.” भोजन झाले. विडेतांबूल झाले तरी विद्यासागर ही व्यक्ती त्या गृहस्थास पाहावयास मिळेना. विद्यासागर त्यांस म्हणाले, “आता आपण जरा वामकुक्षी करा. जरा आरामशीर पडा. तो विद्यासागर येतीलच.” शेवटी तो गृहस्थ जरासा लवंडलाच. दमल्यामुळे त्यास झोपपण लागली. वामकुक्षी झाली. निद्रा झाल्यावर पाण्याने मुखप्रक्षालन व नेत्रप्रक्षालन झाले. आता मात्र हा गृहस्थ संतापला. तो म्हणाला, “मी येथे विद्यासागरांस पाहावे म्हणून आलो, ती गोष्ट बाजूसच राहिली; आणि हे खाणे-पिणे-झोपणे कशासाठी?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel