सत् व असत् यांच्यातील फरक ज्यांना कळला नाही, नीती व कला यांची तोंडओळखही ज्यांना कधी झाली नाही, असे लोक तुम्हाला कोठेही सापडणार नाहीत. रानटीपणा जितका प्राचीन आहे, तितकाच सुसंस्कृतपणाही प्राचीन आहे. एस्किमो, रेड इंडियन, बसूटो किंवा फिजी बेटातील लोक यांना आपण रानटी समजतो. कारण एवढेच की, सुधारलेल्या समाजाची आपली जी कल्पना, ती अद्याप त्यांच्यात आढळत नाही. शाळा, दवाखाने, न्यायमंदिरे, पोलिसचौक्या वगैरे सुधारणेच्या खुणा त्यांच्यात दिसून येत नाहीत.

(* हिंदूंची परिभाषा वापरायची झाली तर असे म्हणता येईल, की केवळ पाशवी शक्तीची पूजा करणारा समाज हा तमोगुणी समाज, स्वतःची इंद्रियसुखे तृप्त करु पाहणारा व तदर्थ धडपडणारा तो राजस समाज आणि आत्मिक स्वातंत्र्य व आत्मविकास यांचे ध्येय ठेवून चालणारा तो सात्त्विक समाज.)

परंतु या संस्था नसल्या तरी त्यांच्याही जीवनात स्वतंत्र विशिष्टत्व दिसून येते. पुढारलेल्या ग्रीक व रोमन लोकांत किंवा आजच्या इंग्रज व जर्मन लोकांत ज्याप्रमाणे त्यांचे वैशिष्ट्य प्रकट होते, त्यांच्या विशिष्ट चालीरीती, विशिष्ट कल्पना दिसून येतात, त्याचप्रमाणे ज्यांना आपण रानटी म्हणतो त्यांच्यातही दिसून येतात. सामाजिक व्यवस्था निराळ्या स्वरुपाची असली, सृष्टीचे ज्ञान जरा कमी असले, हत्यारे व अवजारे प्राथमिक अवस्थेतील असली, तरी एवढ्यावरुनच एखाद्या समाजाला रानटी म्हणणे बरोबर नव्हे. आजकाल राजकीयदृष्ट्या मागासलेल्या राष्ट्रांनाही अर्धवट रानटी असे म्हणण्याची प्रथा पडली आहे. जणू काय राजकीय वर्चस्व हीच सुधारणेची कसोटी ! आर्थिक प्रगती, दुस-याची पिळवणूक व मानवांचा संहार करण्यातील अभिज्ञता म्हणजेच संस्कृतीचा आत्मा ! जपानने रशियाचा पराजय करताच त्याला एकदम सुसंस्कृत पदवी मिळाली. परंतु हीच कसोटी लावावयची असे ठरले, तर ज्या तार्तरांनी चीनचा पराजय केला व शृंग घराणे उधळून लावले, ते तार्तर चिनी लोकांपेक्षा अधिक सुधारलेले होते असे मानावे लागेल ! आणि ज्या रानटी टोळ्यांनी रोमन साम्राज्य खिळखिळे केले, त्यांना सुसंस्कृत मानवजातीचे आदर्श म्हणून वंदावे लागेल !

अत्यंत प्राचीन जाती-जमातींतही संस्कृतीचे स्थूल का होईनात आरंभ दिसून येतात, तर आजच्या सुधारलेल्या समाजात पुष्कळसा जंगलीपणा दिसून येतो. पूर्वींच्या हून, गॉथ, व्हॅन्डाल, तुर्क वगैरे लोकांना आपण रानटी मानतो. परंतु अधिक सुसंस्कृत अशी भावी काळातील एखादी पिढी आजच्या विसाव्या शतकातील आपल्या संस्कृतीलाही रानटी मानणार नाही, असे नाही. ही आपली संस्कृती त्यांना राक्षसी, भ्रामक कल्पना उराशी घेऊन बसणार, अशी वाटेल. त्यांना या आपल्या संस्कृतीचा वीट येईल व अशी कशी ही संस्कृती असे आश्चर्याने व तिरस्काराने ते म्हणतील. आपण प्राचीन रोमन लोकांतील परस्परांस ठार मारु पाहणारे खेळ रानटी समजतो, तद्वतच आपल्या आजच्या साठमा-या, मस्तावलेल्या प्राण्यांच्या झुंजी, मुष्टियुद्धाच्या शर्यती वगैरे ज्या आपल्या आनंदाच्या व करमणुकीच्या गोष्टी, त्या पुढील काळातील पिढ्यांस रानटीपणाच्या वाटतील आणि आपण ज्याला युद्ध म्हणतो त्यातील सुसंस्कृत खाटीकपणासंबंधी तर बोलायलाच नको!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel