१९०४-५ सालापर्यंत काँग्रेसनें प्रत्यक्ष अशी चळवळ कधीं केली नव्हती. परंतु कर्झन साहेबांनी बंगालचे तुकडे केले. आणि या वंग-भंगामुळें बंगाल जनता जागृत झाली. रवीन्द्रनाथांसारखे महाकवि राष्ट्रगीते निर्मू लागले. वंदे मातरमचा मंत्र घोषिला जाऊं लागला. १९०५ मधल्या बनारस येथे भरलेल्या काँग्रेसचे नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे अध्यक्ष होते. गोखले नेमस्त पक्षाचे. परंतु त्यांनीहि आपल्या भाषणांत करवंदीची चळवळहि सनदशीर असते अशी घोषणा केली ! त्यामुळें टाइम्स गोखल्यांच्यावर रागावला होता. आणि पुढें १९०६ साली कलकत्ता काँग्रेस झाली. महर्षि दादाभाई नौरोजी अध्यक्ष होते. आणि 'स्वराज्य ' हा शब्द जन्माला आला. कलकत्ता काँग्रेसनें ध्येय दिले व साधनें दिली. स्वराज्य हें ध्येय; आणि स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार ही साधनें. या चार गोष्टींना चतु:सुत्री असें म्हणतात, स्वदेशीची प्रचंड लाट उसळली. परंतु बहिष्काराचें काय? बहिष्कार म्हणजे परकी मालावर बहिष्कार एवढाच का अर्थ? तो अर्थ तर स्वदेशींत येतोच. बहिष्कार म्हणजे सरकारवर बहिष्कार म्हणजे संपूर्ण असहकार. महात्मा गांधींनीं पुढें जो असहकार सांगितला तोच लोकमान्य टिळक बहिष्कार या शब्दांत पहात होते. सरकारी गाडा संपूर्णपणें बंद पाडणें. परंतु लोकमान्यांचा हा अर्थ पुष्कळांना मानवेना, रुचेना, पचेना. कोणी म्हणूं लागले बंगालच्या बाबतींत सरकारने अन्याय केला आहे तर बंगालनेंच फक्त बहिष्कार हातीं घ्यावा. परंतु ही संकुचित दृष्टि लोकमान्यांना कशी सहन होणार? त्यांनीं खणखणीतपणें सांगितले कीं, ' बंगालचें दु:ख सर्व हिंदुस्थानचे आहे !' हिंदुस्थानांत सरकारी अन्याय कोठेंहि होवो, त्याची सर्व हिंदी राष्ट्रास चीड आली पाहिजे. पायाला कांटा बोंचला तर डोळयांना टचकन् पाणी येतें. डोळा असें म्हणत नाहीं कीं खाली वांकून आम्ही तो कांटा कशाला काढूं? सा-या देहांत एकच प्राण असतो. एकच रक्त खेळत असतें. त्याप्रमाणे सर्व राष्ट्रांत एकात्मतेची खरी जाणीव हवी. लोकमान्य अशा व्यापक अर्थानें पहात होते. 'अशा व्यापक दृष्टीनें पहा, ख-या राष्ट्रीय दृष्टिनें पहा. ' अशी शिकवण ते देत होते.

बंगालचें दु:ख दूर होईना. त्यामुळें तरुण लोक दहशतवादाकडे वळले. बाँब, पिस्तुले यांचे आवाज होऊं लागले. हुतात्मे फांशी जाऊं लागले. लोकमान्य टिळकांनाहि सहा वर्षाची काळया पाण्याची शिक्षा झाली ! काँग्रेसमध्यें चैतन्य राहिलें नाही. दहशतवादहि थंड पडला. आणि १९१४ मध्यें तें महायुध्द आलें. त्या वेळेस देशांत गदर चळवळ झाली. गदर म्हणजे बंड, देशाला स्वतंत्र करण्याचा, कांही उत्कट वृत्तींच्या देशभक्तांचा तो प्रयत्न होता. अनेक तरुण हुतात्मे झाले. महाराष्ट्रांतील समर्थ विद्यालयाचा विद्यार्थी श्री. विष्णु गणेश पिंगळे या गदर चळवळींतच फांशी गेला !

आणि लोकमान्य टिळक सुटले. त्यांनी व डॉ. अ‍ॅनी बेझंट यांनी स्वराज्याची चळवळ सुरू केली. सरकार अडचणीत होतें. 'लौकरच सुधारणा देणार आहोंत ' असें सरकारनें जाहीर केलें. काँग्रेस व मुस्लीम लीग यांचे ऐक्य झालें. काँग्रेसचें शिष्टमंडळ विलायतेस गेलें. परंतु सुधारणेचें असे वातावरण सर्वत्र असतांनाच सरकारनें एक नवीन कायदा केला. त्याला रौलट बिल असें म्हणतात. महायुध्दाच्या काळांत बंगालमधील शेंकडों तरुण सरकारनें विनाचौकशी डांबून ठेवले होते. शेवटीं सरकारनें एक चौकशी कमिटी नेमली. या कमिटीचे अध्यक्ष रौलेट साहेब होते. देशांत कट करणारें तरुण सर्वत्र आहेत 'असा त्यांनी शोध लावला ! आणि सरकारनें या रौलट साहेबांच्या सूचनांनुरुप एक नवीन बिल पास केलें. म्हणून याला रौलट बिल म्हणतात. महायुध्दांत हिंदुस्थाननें मर्यादेबाहेर मदत केली. रौलट बिल हें बक्षीस मिळाले ! या बिलामुळें व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येत होती. पोलीसांना वाटेल ते अधिकार देण्यांत आले होते. राष्ट्राचा हा अपमान होता. स्वातंत्र्य मिळणें तर दूर राहिलें. अधिकच बेडया घट्ट झाल्या. लोकमान्य इंग्लंडांतच होते. आणि इकडे महात्मा गांधी उभे राहिले. दक्षिण आफ्रिकेंत सत्याग्रहाचा मोठा लढा त्यांनी लढविला होतो. १९१४-१५ मध्यें ते हिंदुस्थानास परत आले. साबरमतीस आश्रम काढून तपस्या करीत होते. मधून मधून सत्याग्रहाचे प्रयोग करीत होते. चंपारण्याचा सत्याग्रह त्यांनी केला. खेडा जिल्हयांतील शेतक-यांचा सत्याग्रह चालविला. विरमगांव येथें जकातीचा फार त्रास होई, तेथे जाऊन तो त्यांनी बंद पाडला. असे प्रयोग ते करीत होते. आणि आतां अखिल भारतीय प्रयोग त्यांनी आरंभिला. या रौलट  बिलाविरूध्द त्यांनी सत्याग्रह सुरू केला. देशभर हरताळ, मिरवणुकी, उपवास याचा त्यांनी कार्यक्रम दिला. आणि सरकारनें निरपराधी जनतेचें रक्त सांडले. दिल्लीत गोळीबार झाले. हुतात्मा श्रध्दानंद यांनी गुरख्याच्या बंदुकीसमोर आपली विशाल छाती उघडी केली ! आणि जालियनवाला बागेंतील तें पाशवी हत्याकांड झालें. लष्करी कायदा पुकारला गेला. विटंबनेस सीमा राहिली नाही. लोकांचें पाणी बंद केलें गेलें. उजेड बंद केला गेला. उघडयावर शेंकडोंना फटके मारण्यांत आलें. रस्त्यावरुन सरपटत जायला लावण्यांत आलें. नको, ती आठवण नको !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel