परंतु महात्माजींना धर्मबुडव्ये म्हणून, मुसलमान धार्जिणे म्हणून नांवें ठेवणारे, हिंदु समाजाची महात्माजींनीं केवढी सेवा केली आहे ते विसरुन जातात. परधर्मांत गेलेला  एक मनुष्य स्वधर्मात आणला म्हणजे आमचे कांहीं लोक टि-या बडवतात. परंतु महात्माजींनीं परधर्मात हजारों हिंदु जात, त्याला त्यांची सेवा करुन आळा घातला. गुजरातेंतील भिल्ल समाजांतच ठक्करबाप्पासारखे सेवक वर्षानुवर्षे सेवा करीत बसले. महाराष्ट्रांतील मामा फडके गुजरातेंत नडियादचे बाजूस भंगीसमाजांत काम करीत आहेत. खानदेशांत श्री. नानासाहेब ठकार भिल्लांत काम करीत आहेत. हिंदुस्थानभर महात्माजींचें श्रध्दादान अनुयायी या उपेक्षित बंधूंची सेवा करीत आहेत. त्यांना प्रेम देत आहेत. यामूळें मिशनरी चळवळीस केवढा तरी आळा बसला आहे. महात्माजींची ही सेवा थोर नाहीं का? निरभिमानपूर्वक केलेली, परधर्मास शिव्याशाप न देतां केलेली ही स्वधर्मींयाची सेवा देवाघरी रुजूं नसेल का?

ब्राह्मण-ब्राह्मणेंतर वादाचा काळ संपला. आतां स्पृश्यास्पृश्यवाद सुरू होईल, अशी भीति वाटते. पण स्पृश्यांना हळूहळू त्यातील वैय्यर्थ कळेल. सार्वजनिक ठिकाणी शिवाशिवी मानणें अन्याय आहे, हें स्पृश्य शेतक-यासहि कळेल. कांही दिवस विरोध होतील. परंतु ते जातील. महाराष्ट्रांत भाऊराव पाटलांसारख्यांनी जीं बोर्डिगे चालविली आहेत, त्यांतून सर्व जातीचीं मुलें एकत्र शिकत आहेत. मराठे, माळी, कुणबी, मांग, चांभार, महार, कैकाडी, वडारी सर्व मुलें शिकत आहेत. हे तरुण उद्यां आपआपल्या जातींना सांगतील की ''ही शिवाशिव काढून टाका. खोटे धर्म नष्ट करा.''

हरिजनांनी आपली लग्नाची मिरवणूक घोडयावरुन नाही काढतां कामा. त्यांच्या बायकांनी अंगावर  दागिने नाही घालता कामा. त्यांनी स्पृश्यांसारखा पोषाख नाही करतां कामा. त्यांनी गव्हाची पोळी वैगरे नाहीं खातां कामा. एक का दोन, शेंकडों प्रकारचे अन्याय हिंदुस्थानच्या निरनिराळया भागांत चालू आहेत. देवास वगैरे संस्थानांतून तर पूर्वी फार भयंकर चाली असत. कोणाकडे समारंभ वगैरे असला तर हरिजन स्त्रियांच्या पोटावर वाद्यें वाजवावयाची ! असे प्रघात होते. एकदां एक गरोदर हरिजन भगिनी अशामुळें मरण पावली. ही रुढि आतां बंद झाली आहे. आम्ही हीं पापें कोठें फेडणार?

हरिजन म्हणजे जणुं स्पृश्यांच्या हातांतील हरकाम करणारी गुलामांची जात. हरिजन जर सुशिक्षित झाले, ते स्पश्यांप्रमाणे जर वागूं लागले, त्यांची माणुसकी जर जागी झाली तर हे हातचे कायमचे बंदे नोकर नाहीसे होतील, अशी स्पृश्यांना भीति वाटत आहे. अस्पृश्यता म्हणजे धर्म नाही, हें कां त्यांना समजत नाही? परंतु हातांतील सत्ता जाईल, हांक मारतांच जोहार करीत येणारा, ' भाकरी वाढाहो माई ' म्हणणारा नोकर नाहींसा होईल, ही भीति स्पृश्यांस वाटत आहे. आर्थिक पिळवणूक त्यांना कायम ठेवायची आहे. हा धर्म नसून आर्थिक प्रश्न आहे.

परंतु आतां हरिजनांचा आत्मा जागा झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीं स्वाभिमानाची ज्योत त्यांच्यांत पेटविली आहे. ज्या स्मृतीमुळें आम्ही अस्पृश्यता मानतो, त्या स्मृतींचा येथें अभ्यास होतो, त्या कॉलेजचे डॉक्टर आंबेडकर प्रिन्सिपॉल होते ! हरिजन कोणत्याहि बौध्दिक गोष्टींत मागें राहणार नाहींत, हे डॉक्टरसाहेब दाखवित आहेत. हरिजनांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. आम्हां पांढरपेशांचीच बुध्दि आतां निकस होत चालली आहे. हजारों वर्षे आमच्या बुध्दिचा कस जात आहे. परंतु हरिजनांची मनोभूमि पडित आहे. तिच्यातून आजवर पीक घेतलें नाही. या पडित वावराची आतां मशागत होऊं लागली आहे. बुध्दिचें भरपूर पीक निघेल. मागे एकदां मनमाडच्या रेल्वेंच्या हायस्कुलांत हरिजन विद्यार्थ्यांनीं संस्कृत घेतलें, परंतु ब्राम्हण वग्ैेरे विद्यार्थ्यांनी संस्कृत कठीण म्हणून सोडून दिले, असे तिथलें एक शिक्षक मित्र मला सांगत होते. हरिजन विद्यार्थी सर्व क्षेत्रांत जातील. त्यांची बुध्दि सर्वत्र चमकेल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel