तुम्ही येथेच राहाल का?’

‘कोणास माहीत? हद्दपारही करतील, काळया पाण्यावर पाठवतील, काहीही होवो. आनंद आहे.’

‘आणि तो मुलगा जिचा, ती कोण?’

‘ती एका लष्करी अधिकार्‍याची मुलगी आहे. या तुरूंगातच ती आहे. तिचे एका क्रांतिकारकावर प्रेम बसले. त्यांचा एक गुप्त छापखाना होता. एके रात्री पोलिसांची धाड आली. छापखाना चालू होता. एकदम दिवे मालवण्यात येऊन तेथून कागदपत्रे नेण्यास येऊ लागले. पोलीस आंत घुसले. त्यांच्याजवळ प्रकाशिका होत्या. तिने मुख्य अंमलदारांवर गोळी झाडली असा तिच्यावर आरोप. गोळी तिने झाडली नव्हती. तिने पिस्तूल कधी हातात धरले नव्हते. परंतु प्रियकरावरचा आरोप स्वत:वर घेतला. ‘मीच गोळी झाडली’ असे तिने सांगितले. तिला जन्मठेप काळया पाण्याची शिक्षा झाली आहे.’

‘थोर त्यागी मुलगी.’ तो म्हणाला.

‘त्या मुलाला घेऊन ती काळया पाण्यावर जाणार आहे. पाहा कसा तेजस्वी बाळ आहे! तो मोठा होईल तेंव्हा तरी देश स्वतंत्र झालेला असो.’

‘रूपा आली आहे. तुमची मुलाखत आटपा.’ अधिकारी म्हणाला.

त्या क्रांतिकारक स्त्रीने रूपाविषयी ऐकले होते. त्याने तिला थोडी हकीगत सांगितली.

‘तिला दवाखान्यात काम द्यायला सांगा. किंवा राजकीय स्त्रीकैद्यांत ठेवा अशी प्रार्थना करा, म्हणजे वाईट संगतीपासून दूर राहील. ती सुधारेल.’ तिने जाता जाता त्याला बाजूला बोलावून सूचना केली.

‘आभारी आहे तुमच्या सूचनेबद्दल.’ तो म्हणाला.

रूपा आणि तो थोडाच वेळ आज बोलली. तिच्या मनांतून अढी गेलेली नव्हती.

‘तू दवाखान्यात काम करशील?’ त्याने विचारले.

‘करीन. वेळही बरा जाईल. दुसर्‍यांची सेवा करता येईल.’

‘आणि गुन्हेगार बायांपासून दूर असशील. मी जेलरसाहेबांस सांगेन, त्यांना विनंती करीन.’

‘माझी शिक्षा कमी नाही झाली तर?’

‘तुला काळया पाण्यावर पाठवतील. मी तुझ्या बरोबर येईन.’

‘नको. माझ्यासाठी तुम्हांला त्रास नको.’

तो काही बोलला नाही. थोडया वेळाने तो निघून गेला. जाताना एक करूण दृश्य त्याने पाहिले. त्या क्रान्तिकारक तरूणीची आई, तिचे भाऊ सारे भेटायला आले होते. ती मुलासह दुसर्‍या दिवशी काळया पाण्यावर जायची होती. आजीने नातवाचा मुका घेतला. त्या तरुणीचे म्हातारे आजोबाही आले होते. ते दु:खाने तिचा हात धरून उभे होते.

‘आजोबा, वाईट नका वाटून घेऊ. मी सुटून येईपर्यंत तुम्ही नसाल. लौकर क्रांती झाली नि मी जिवंत असले तर भेटू. हा बाळ तेथे विरंगुळा आहे. मला वाटले होते की, त्यांनाही तेथेच पाठवतील. परंतु त्यांना दुसर्‍या परप्रांतीय तुरूंगात ठेवण्यात आले आहे. आई, तुम्ही त्यांची भेट घेता आली तर घ्या. सर्वांना सांभाळणारा तो प्रभू.’

‘आईने मुलीला पोटाशी धरले. आजोबांनी नातवाचा मुका घेतला. भावांचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. सर्वांपासून तिची ताटातूट होणार होती.

‘आटपा, आटपा’ जेलर म्हणत होता.

ते करूणगंभीर दृश्य पाहून प्रताप विरघळला. क्रांतिकारकांविषयी त्याचे अनुकूल मत नव्हते. तो त्यांना दहशतवादी म्हणे. बाँब वगैरे प्रकार त्याला पसंत नसत. परंतु त्यांचा त्याग, त्यांची धीरोदात्तता, ही प्रियजन-वियोगदु:खे हे पाहून त्याला निराळे वाटू लागले. विचार करीत तो घरी गेला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel