विचार करता करता तो थकला. तो खाली बसला. तो शेवटी अंथरूणावर जाऊन पडला. बर्‍याच वेळाने त्याला झोप लागली. सकाळी तो उठला प्रातर्विधी आटोपून स्नान करून साधा सदरा घालून तो बसला होता. दिवाणजीही आले. एकेक शेतकरी करता करता बरेच जमले.

‘मी जमिनीची काही तरी नवीन व्यवस्था करायला आलो आहे. वाटले तरी सारी जमीन तुम्हांला देतो.’ तो म्हणाला.

‘आम्हांला नवीन काही नको. जुने आहे. ते ठीक आहे. आम्हांला बीबियाणे देत जा. त्याची फार अडचण पडते. आम्ही शिल्लक ठेवू शकत नाही. आणि ऐनवेळी भाव दसपट वाढतात.’ एकजण म्हणाला.

‘तुम्हांला जमीन नको?’ त्याने विचारले.

‘नको.’

‘तुमच्याजवळ पुरेशी आहे?’

‘नाही.’

‘मग, नको का म्हणता? विचार करा. विचार करायला हवा.’

‘मी उद्याचा दिवस येथे आहे. या विचार करून.’ ते उठले. दिवाणजी प्रतापला म्हणला, ‘यांच्यातील शहाण्या शहाण्यांना मी उद्या बोलावतो. म्हणजे काही तरी ठरेल. नाही तर सारा गोंधळ होईल.’

‘ठीक, तसे करा.’ तो म्हणाला.

ते शेतकरी आपसांत चर्चा करीत जात होते.

‘म्हणे फुकट जमीन घ्या. काही तरी मनात काळेबेरे असेल.’

‘घेईल अंगठा, सही आणि फसवील. नको म्हणावे जमीन.’ असे बोलत ते जात होते.

प्रतापने तो दिवस विश्रांतीत घालवला. तो आरामखुर्चीत पडून होता. मनात म्हणाला, ‘मला कर्तव्य करीत राहू दे. रूपाच्या बाबतीत मी शेवटपर्यंत श्रध्दा सोडणार नाही. ते पाप आणि ते जमीनदारीचे पाप, दोन्ही पापांचे मला क्षालन करू दे. एकाएकी आकाशात ढग जमून आले. काळे काळे ढग. विजाही चमचम करीत होत्या. पाखरे आपापल्या घरटयांत जाऊ लागली, निवार्‍याची जागा शोधू लागली. वारा सुटला. पाने सळसळत होती आणि पाऊस आला. टपटप पाणी पडू लागले. प्रताप उठून बाहेर आला. तो पावसाची गंमत पाहात होता.

‘पाऊस पडे टापुरटुपूर
नदीला आला पूर’

असा चरण तो गुणगुणू लागला. जणू तो एकदम बाळ झाला. निसर्गाचे लेकरू बनला. परंतु पुन्हा गंभीर झाला. त्याच्या हृदयावर ओझी होती. तो बाळ होऊ शकत नव्हता. तो पुन्हा विचारात रमला. ‘या जीवनाचा काय अर्थ? मी का जगतो? कशासाठी हा माझा जन्म? माझ्या मावश्या कशासाठी जगल्या? रूपा? का या सार्‍या ओढाताणी? आणि जगात नाना मोह, नाना युध्दे? मी पूर्वी कसा होतो? का बरे मी बेछूट वागू लागलो? कोण नाचवते? आपण का केवळ हेतुहीन बाहुली आहोत? नियतीच्या, नशिबाच्या हातांतील खेळणी, एवढाच का या जीवनाला अर्थ? आपल्या इच्छेनुरूप जीवनाला आकार नाही का देता येणार? इच्छा-स्वातंत्र्य. कर्मस्वातंत्र्य आहे का नाही? दुसर्‍याच्या हातातले का आपण पतंग आहोत? या सर्व जीवनाचा, या विश्वाचा हेतु काय? विश्वंभराची इच्छा समजणे कठीण आहे. परंतु माझ्या हृदयात त्याचा आवाज आहे. मला त्या आवाजानुरूप वागू दे. त्यानेच मनाला निश्चित शांती मिळेल. माझ्या हृदयातील आवाज काय सांगत आहे. ते मला नक्की कळून चुकले आहे.’ आता मुसळधार पाऊस पडू लागला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel