(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)

निरंजन झोपेतून  जागा झाला.अजूनही तो अर्धवट झोपेत होता .सवयीप्रमाणे त्याने शेजारी हाताने चाचपून पाहिले.सुषमाचा स्पर्श होईल असे त्याला वाटत होते.शेजारी सुषमा नव्हती.  सुषमा त्याला सोडून गेल्यापासून गेले चार महिने असेच होत होते.  मध्यरात्रीनंतर केव्हातरी  तो झोपेतून जागा होत असे.सवयीप्रमाणे त्याचा हात शेजारी जात असे .नंतर तो दचकून पूर्ण जागा होतो असे. त्यावेळी पहाटेचे कधी तीन कधी चार वाजलेले असत .नंतर त्याला झोप येत नसे.पूर्ण व्यवस्थित झोप गेल्या चार महिन्यात त्याने क्वचितच घेतली असेल. सुषमाच्या आठवणीवर आठवणी त्याला येत रहात.आणि त्यातच तो बुडून राहात असे .

सूषमा तू मला कां सोडून गेलीस?मी असा काय अपराध केला होता?असे म्हणत त्याचे मन आक्रंदत असे .

तो दिवा लावीत असे.टेबलाचा खण उघडून त्यातून तिने लिहिलेले शेवटचे पत्र काढीत असे. तो ते पत्र वाचायला सुरुवात करीत असे.आतापर्यंत त्याने त्या पत्राची असंख्य पारायणे केली होती.त्याला ते पत्र जवळजवळ पाठ झाले होते. पत्र पुढीलप्रमाणे होते .

प्रिय निरंजन ,

तुला पत्र लिहिण्याची वेळ कधीच आली नाही.आपले संभाषण नेहमी प्रत्यक्ष किंवा मोबाइलवरच होत असे . आपल्या भावना परस्परांना व्यवस्थित समजाव्यात म्हणून आपण क्वचित पत्राचा आधार घेतला असेल.बहुतेक वेळा एकमेकांना परस्परांच्या  भावना सांगितल्याशिवाय कळत असत.

लग्न झाल्यापासून गेली पंधरा वर्षे तू मला भरभरून सुख दिलेस.आपल्या संसारवेलीवर दोन गोंडस मुलेही फुलली.दिसामासानं ती वाढत असताना त्यांची वाढ पहाणे म्हणजे एक आनंद होता.ती आता मोठी झाली आहेत.अजून त्यांचे शिक्षण व्हायचे आहे .पुढे नोकरी व्यवसाय लग्न संसार या आणखी आणखीला कधीच  अंत नाही .

तुझ्या स्वभावाप्रमाणे सर्व जबाबदाऱ्या तू व्यवस्थित पार पाडशील याची मला खात्री आहे.सुहास व सौदामिनी दोघेही समंजस आहेत.

माझा तुझ्या सहवासातील काळ संपला आहे .मला आता गेलेच पाहिजे.आपली भेट पुन्हा कधीही होणार नाही .मी जात आहे .मी मजबूर आहे.

तुझी

सुषमा    

आणि ती अकस्मात सोडून गेली. पत्र सुद्धा ती गेल्यावर मिळाले.त्याला काही अंदाज आला असता तर त्याने तिला थांबवण्याचा  प्रयत्न केला असता .तिच्या स्वभावाप्रमाणे तिने व्यवस्थित घडी करून ते तिपाईवर पेपरवेट खाली  ठेवले होते.

त्याला तिच्या सारख्या आठवणींवर आठवणी येत असत .तिच्या सहवासात घालवलेले क्षण अन् क्षण त्याला आठवत असत.सुषमा त्याला सोडून गेल्यापासून तिच्या आठवणीत रमणे हाच त्याचा विरंगुळा  होता.

आपली अशी काय चूक झाली की तिला सोडून जावे असे वाटले तेच त्याला कळत नसे.आता त्यावर विचार करण्यात अर्थ नव्हता तरीही विचार थांबत नसे .

त्यांचा प्रेमविवाह नव्हता .प्रेमोत्तर विवाह असे नसून विवाहोत्तर प्रेम असा साधा सरळ सोपा साचा होता. चारचौघांसारखे दाखवून लग्न झाले होते.

त्या दिवशी रविवार होता .संध्याकाळचे चार वाजले होते.तो वाचनात गुंग झाला होता . त्याला वाचनाची आवड होती .जरी तो सर्व प्रकारची पुस्तके वाचीत असला तरी त्याला रहस्यकथांची जास्त आवड होती .शेरलॉक होम्सचे एक पुस्तक तो वाचीत होता. एवढ्यात बेल वाजली .वाचनात, रहस्यात, गुंग झाल्यामुळे तो बेलच्या आवाजाने एकदम दचकला होता. तो घरात एकटाच होता .आई वडील कोणत्यातरी स्नेह्यांकडे षष्ठ्यब्दपूर्ती समारंभासाठी गेले होते .त्यालाही तिकडे जायचे होते . तो जरा वेळाने निघणारच होता .एका हॉलमध्ये समारंभ आयोजित केला होता .तो एकदम जेवायला जाणार होता .

त्याने दरवाजा उघडला .दारात त्याच्या वडिलांपेक्षा  थोडे तरुण दिसत असलेले गृहस्थ उभे होते. तो लग्नाचा होता.तो डबल पदवीधर होता .त्याला भक्कम पगाराची नोकरी होती .उच्च मध्यमवर्गीय स्तरात तो मोडत होता .त्याचे स्थळ आकर्षक होते .त्याच्याकडे अशा वयाच्या गृहस्थांची रहदारी वाढली होती.त्याने आदराने आलेल्या गृहस्थाना आंत येण्यास सुचविले .ते त्यांच्या मुलीसाठी आले होते.

हे कशाला आले आहेत ते त्याच्या लगेच लक्षात आले होते.त्याने आदराने त्यांना बसण्यास सुचविले.ते बसल्यावर त्याने आई वडील घरात नाहीत म्हणून सांगितले. तात्यासाहेब गमतीशीर  स्वभावाचे होते.ते म्हणाले ,मी कशाला आलो आहे ते तुम्ही ओळखले असेलच.

थोड्याच दिवसात मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला .त्यांची मुलगी सुषमा सर्वांनाच पसंत पडली .

कां कोण जाणे?कशी कोण जाणे?एखादी व्यक्ती भेटल्यावर आपल्याला तिच्याशी आपले जुने संबंध आहेत असे आतूनच वाटते .सुषमाला पाहिल्यावर त्याला आंतून तशीच जाणीव झाली .पुढे सर्व गोष्टी भरभर होत गेल्या .आणि एक दिवस सुषमा त्याची पत्नी बनून घरी आली. संसार म्हटला की भांडय़ाला भांडे लागणारच .थोडा बहुत अावाज येणारच.पण ती भांडणे संसारातील गोडी वाढवणारी असत.कटुता निर्माण झालीच तर ती चौवीस तासांपेक्षा जास्त टिकत नसे.दोघांचे परस्परावर विलक्षण प्रेम होते .एकाच्या पायात काटा टोचला तर दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहत असत.आपण परस्परांसाठीच निर्माण केले गेलो ,याची दोघांनाही मनोमन खात्री पटली होती.

त्यांनी गेल्या पंधरा वर्षांत आय लव्ह यू असे केव्हाही परस्परांना म्हटले नव्हते .तरीही प्रत्येकाला दुसऱ्याचे आपल्यावर नितांत प्रेम आहे याची शंभर टक्के खात्री होती .प्रेम हे बोलून दाखवायचे नसते .ते दोघांना उमजले पाहिजे .दिसण्यापेक्षा असण्याला महत्त्व आहे .दिखाव्यापेक्षा परस्परांना अंतर्यामी जाणीव असणे याला महत्त्व आहे .याची दोघांनाही पूर्णपणे  जाणीव होती.

वडील माणसांसमोर, समवयस्कांसमोर त्यानी कधीही प्रेमाचा दिखावा केला नाही .आपण अनंत काळापर्यंत  असेच जोडीने राहणार असे दोघांनाही वाटत होते.साध्या साध्या गोष्टीतून दोघांचे परस्परांवरील प्रेम दिसत असे .एखादा पदार्थ खाताना, एखादे निसर्गरम्य दृश्य पहातांना, प्रत्येक आनंदाच्या व दुःखाच्या क्षणी एकाला दुसर्‍याची आठवण आली नाही असे कधीही होत नसे .हे सर्व स्वाभाविक होते. ते दोघांच्या अंत:करणातून आले होते.  अशी पंधरा वर्षे केव्हा गेली ते त्याचे त्यालाच कळले नव्हते.

आणि एक दिवस त्याच्यावर आकाश कोसळले .मुले खेळायला गेली होती .तो ऑफिसातून आला तेव्हा नेहमीप्रमाणे त्याच्या स्वागतासाठी ती नव्हती .असेल कुठेतरी मागे पुढे,येईल जरा वेळाने  म्हणून त्याने तिकडे दुर्लक्ष केले.स्वत:च चहा करून तो प्यायला.आई वडील कुठच्या तरी टूर कंपनीबरोबर फिरायला गेले होते .

सकाळी घाईघाईत वाचलेला पेपर पुन्हा बघण्यासाठी तो सोफ्यामध्ये बसला. तिपाईवरील पेपर उचलताना त्याला तिथे एक पेपरवेट खाली ठेवलेली चिठी दिसली .त्याने ती सहज काय आहे म्हणून उचलली .ती चिठी नव्हती . तो बॉम्ब होता.चिठी वाचून तो इतका सुन्न झाला की त्याला काय करावे तेच कळत नव्हते.

ती कुठे गेली ?कां गेली? त्याचा काहीच उलगडा होत नव्हता.आपली भेट पुन्हा कधीही होणार नाही .मी जात आहे .मी मजबूर आहे.ही तिच्या पत्रातील शेवटची वाक्ये  धारदार सुरीसारखी त्याच्या काळजात शिरत होती . 

तिच्या प्रेताची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी बोलावल्यावर त्याला ती कुठे गेली ते कळले होते.

आणि आज तो एकटा पडला होता.त्याची सुषमा त्याला एकटे सोडून गेली होती.सर्व काही सुरेख चाललेले असताना असे काय झाले कि तिला सोडून जावेसे वाटले.त्याला काहीच उलगडा होत नव्हता.सोन्यासारखा नवरा, सोन्यासारखा संसार, सोन्यासारखी मुले, सोडून जाताना तिला काहीच कसे वाटले नाही.ती अशी कशी निष्ठूर झाली.ती गेली तिकडे असे काय मोठे आकर्षण होते की तिला हे सर्व सोडून जावे असे वाटले.

एक दिवस सर्व रहस्याचा उलगडा झाला .ती कां सोडून गेली? ते समजले होते.तो एक दिवस त्यांच्या फॅमिली डॉक्टरांकडे गेला होता .बोलता बोलता ती कां सोडून गेली ते निरंजनला माहीतच नाही असे त्यांच्या लक्षात आले.

निरंजनचे दुःख त्यांना पहावत नव्हते .त्याला काहीच माहित नाही हेच त्यांना माहीत नव्हते . सुषमा सर्व काही निरंजनजवळ बोलली असेल अशी त्यांची समज होती .

तिला बरा न होणारा कॅन्सर होता .

तिला केमोथेरपी घ्यायची नव्हती.

त्याचाही उपयोग होण्याची शक्यता  पन्नास पन्नास टक्के होती.

तिने सर्व नामांकित डॉक्टरांना दाखविले होते .त्यांचे त्याबाबतीत एकमत होते .

केमोथेरपीने केस जातील .विद्रूपता येईल. तशी विद्रुपता तिला नको होती .सर्वांनी मानसिक,शारीरिक, आर्थिक, त्रास दुःख सोसावे असे तिला वाटत नव्हते.

* तिला ऑपरेशन करायचे नव्हते.*

*कर्करोग हळूहळू सर्वत्र पसरला.*

*तिने जीवनाचा शेवट करण्याचे ठरविले होते.*

*त्याप्रमाणे तिने जलसमाधी घेतली.* 

*या सर्व तपासण्या तिने निरंजनला काहीही कळू न देता केल्या  होत्या.*

*त्याला या सर्वाचा त्रास व्हावा असे तिला वाटत नव्हते.*

*वरवर ती सुखी आनंदी आहे असे दाखवत असे परंतु अंतर्यामी ती उद्ध्वस्त होत होती.* 

*तिने जीवनाचा शेवट करण्याचे ठरविले होते.*

*त्याप्रमाणे तिने जलसमाधी घेतली.*  

*तिच्या स्मृत्यर्थ  त्याने एक तुळशीवृंदावन  बंगल्यासमोर अंगणात उभे केले आहे .

* हल्ली निरंजन त्या तुळशीवृंदावनासमोर निरांजन लावून स्तब्धपणे उभा राहतो .*  

१७/५/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel