दुसऱ्या दिवशी रेल्वे विभागातर्फे चेकिंग होणार होते. त्यामुळे सिद्धरामय्या यांची महत्त्वाची ड्युटी होती. ते सकाळीच भरपूर नाश्ता करून स्टेशनवर निघून गेले आणि जाताना दोन डबे घेऊन गेले होते त्यामुळे रात्री उशिरापर्यंत ते परतण्याची शक्यता नव्हती. त्या दिवशीही पाऊस दिवसभर चालूच राहिला.
संध्याकाळ होताच मावळतीच्या आकाश पटलावर काळीज चर्र करणारी वीज चमकली. काळ्याकुट्ट आकाशात काही काही क्षण विजेने रोषणाई केली आणि त्या पाठोपाठ कानाचे पडदे फाडून टाकणारा ढगांचा गडगडाट ऐकू आला. नंतर कानाला असह्य होणारी निरव अशी शांतता पसरली. अशा प्रकारच्या शांततेमध्ये एखाद्याच्या काळजाला आता पुढे काय वाढून ठेवले असेल अशी हुरहूर लागते. परंतु राम मात्र समाधीच्या त्या अवस्थेत पोचला होता ज्यात त्याला तेच तेच दृश्य ज्याला तो एक स्वप्न म्हणत होता ते दिसू लागले होते. हे दृश्य रामने अनेक वेळा पहिले होते.
एका घनदाट अरण्यात एक विशाल सरोवर ज्यात काही कोमेजलेली कमळाची फुलं पडली होती. सोबतच कमळाची पानं, कमळाच्या बिया आणि काही अर्धवट फुललेल्या कमळाच्या कळ्या पडल्या होत्या. सरोवराच्या आग्नेय कोपऱ्यात जांभ्या दगडाच्या चिऱ्यानी बांधलेल्या मंदिराचे भग्न अवशेष होते. त्या भग्न देवालयाच्या आजूबाजूला त्याला सर्व दिशांनी घेरणारे प्रचंड मोठे वड, पिंपळ यांचे अवाढव्य वृक्ष होते. जे त्या मंदिराच्या संपूर्ण हयातीचे मूक साक्षीदार होते. मंदिराच्या मागे बेल, आवळा, उंबर, कडुलिंब, कदंब असे वृक्ष होते. मंदिराच्या चारही बाजूना जांभ्या दगडाने पक्की भिंत बांधलेली होती. त्या भिंतीची एक बाजू फोडून एका वटवृक्षाची मुळे एखाद्या मनुष्याच्या पाठीवर कुबड आल्याप्रमाणे बाहेर आली होती. मोडक्या भिंतींच्या दोन्ही बाजूना काळ्या पाषाणात कोरलेल्या दोन स्त्रियांच्या मूर्ती होत्या. त्यांना पाहून असे वाटत होते कि कोण्या माथेफिरू मूर्ती भंजकाने धारदार तलवारीने प्रहार करून त्यांना विद्रूप करून टाकले होते. मग त्याच्या दृष्टीसमोर एक ऐसपैस दगडी सिंहासन आलं. त्यावर उल्लाल गावाची विधवा जमीनदारीण श्रीमती वैजयंती हेब्बार बसली होती! ती प्रचंड थकलेली दिसत होती. तीची पापणी देखील लवत नव्हती आणि ती एकटक रामकडे बघत होती. गव्हाळ परंतु सतेज, सुंदर वर्ण आणि संमोहित करून टाकणारे ते नेत्रकटाक्ष! ते पाहून रामची खात्री पटली होती ती अनेक वर्ष रामच्या येण्याची वाट पाहत होती. रामवर नजर पडताच तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि निर्विकार डोळ्यांमध्ये अचानक ध्रुवतारा चमकल्याप्रमाणे चमक दिसली आणि क्षणात तिच्या ओठांवर मंद स्मित उमटले.
“ मी तुझीच वाट पाहत होते. मला माहित होतं कि तू एक न एक दिवस नक्की येशील.”
हे बोलून जमीनदारीण क्षणभर थांबली आणि मग अगदी मध्यम कोमल स्वरात म्हणाली,
“इकडे पंचक्रोषित कोणतेही गाव नाही. गेली ५०-६० वर्ष मी इकडे या निर्मनुष्य, सुनसान आणि भयाण परिसरात राहत्ये”
एवढे बोलून ती विचित्र प्रकारे हसायला लागली. तिचे ते हास्य भयंकर आणि काळजाचा ठोका चुकवणारे होते. मग ती काही वेळ एकदम मौन होती. ५-६ मिनिटे मौन राहिल्यानंतर तिची मुद्रा अचानक गंभीर झाली आणि ती म्हणाली,
“ऐकशील? माझी वेदनादायक व्यथा? माझ्या मनाला पिडा होते. तू कधी ऐकशील? माझी दारूण कथा हि एकमेव कारण आहे ज्यामुळे या विचित्र निर्मनुष्य भागात वर्षानुवर्षे भटकत्ये. इथे माझी कथा ऐकून घेणारे कोणीच नाही. तू नाही ऐकलीस तर मग अजून कोण ऐकून घेईल? तू मला समजून नाही घेतलेस तर माझी परिणीती काय होईल? माझ्या मनात इतक्या भावना इतके विचार दाटून आले आहेत. त्यांच्या ओझ्याखाली मी दबून संपून जाईन या विचाराने माझे मन विषण्ण झाले आहे. माझी हि विनंती तू ऐकशील का?माझे जीवन शून्य आहे. माझ्या आत्म्याला झालेल्या आघाताशिवाय दुसरे काहीही माझ्या आयुष्यात शिल्लक नाही. वैशाख मासातील वाळवंटी वादळाने जशी हिरवळ कोमेजून जाते तशी माझ्या आयुष्यातील दु:खाच्या वादळांमुळे माझ्या मनाच्या झालेल्या होलपटीत कितीकदा माझे अंतर्मन, माझ्या इच्छा आणि आकांक्षा होरपळून राख झाल्या आहेत.
सर्व बाजूने शून्य आणि केवळ शून्य! शून्याशिवाय इतर काहीच शिल्लक राहिले नाही. यातून कधी मी बाहेर पडेन अशी अपेक्षा सुद्धा मला वाटत नव्हती. तरीही मी या निर्जन ठिकाणी जीवन जगण्याचा संकल्प केला होता. माझ्या नशिबी आलेला ह्या अशा जीवनाचा शाप मी कोणताही प्रतिकार न करता स्वीकारला. पण नंतर अनपेक्षितपणे अशी एक घटना घडली, ज्यामुळे माझ्या विखुरलेल्या हृदयात एकाएकी हा:हा:कार उत्पन्न झाला.
तुला माहित्ये? हे शापित आणि दयनीय जीवन त्याचाच परिणाम आहे. माझ्या या शापित आणि दु:खी जीवनातून तू मला मुक्त करू शकतोस का? केवळ याच इच्छेने मी तुला पहिल्यांदा भेटले होते. आठवतय? मला सांग, माझी विनंती तू विसरला नाहीस ना?”
“नाही, मी विसरलो नाही. मी कसे विसरु शकेन त्या शोकाकुल आत्म्याच्या पवित्र आवाहनाला! त्या आर्त विनंतीला तुच्छ लेखण्याची ताकद मला कुठून आणि कशी मिळेल? त्या पुण्यात्म्याच्या हाकेमुळे माझे मन तिच्या मनाशी इतके समरस झाले होते कि माझे हृद्य हेलावून गेले.”
क्रमश: