- ३ -

सुसंस्कृत व सुधारलेल्या जीवनाकडे मानवप्राणी कसा चांचपडत जात होता त्याचे अत्यंत त्रोटक दर्शन आपण घेतलें.  हिमप्रपातामुळें मनुष्य एकमेकांच्या कसा जवळ येऊं लागला तें आपण पाहिलें.  हिमप्रपाताचे चार काळ होऊन गेले.  सामाजिक जीवनाची पहिली जाणीव त्या संकटसमयीं झाली.  विस्तवाचा शोध लागला.  कपडे करूं लागले.  हत्यारें बनवूं लागले.  भाषा निर्माण झाली.  देवदेवता उत्पन्न झाल्या.  चित्रकला, प्रार्थना व संहार या कलांत त्यांनीं बरीच प्रगति केली.  त्या अति प्राचीन काळाविषयींची आपणांस उपलब्ध झालेली माहिती अद्याप फारच अपुरी आहे.  सांपडलेलीं कांही हाडें, कांही कवट्यांचे अवशेष, जमिनींतून खणून काढलेलीं कांही हत्यारें, गुहांच्या व घरांच्या भिंतीवरून रंगविलेलीं कांही चित्रें; बस्, हीच आपली सामग्री.  या आधारावर त्या प्राचीन काळांतील इतिहास उभारावयाचा.  परंतु या तुटपुज्या साधनांतूनहि इतिहासाच्या अभ्यासकांनीं आपल्या त्या इतिहासकाळपूर्व पूर्वजांच्या जीवनाचें नीटनेटकें चित्र तयार केले.  माहिती नीट जुळवून त्या जीवनाची चांगली कल्पना येईल असें केलें.  बारीकसारीक तपशिलाचें बाबतींत मतभेद असूं शकतील.  परंतु त्या चित्रांतील मुख्य मुख्य गोष्टींसंबंधी साधारणत: सर्वांचे एकमत आहे.

वानरापेक्षां थोड्या उच्च भूमिकेवर तो पहिला मानव उभा होता.  त्या हिमप्रपातामुळें त्याची सुधारणा झाली.  सुमारें बारा हजार वर्षांपूर्वी त्या हिमवृष्टीनंतर ज्या भूमिकेवर मानव उभा होता, ती भूमिका आजच्या सर्वसाधारण मनुष्याच्या भूमिकेपेक्षां फारशी खालची नाहीं.  ख्रिस्तशकापूर्वी सुमारें दहा हजार वर्षे जे आपले पूर्वज होते, ते जरी फार सुधारलेले नसले, तरी बर्‍याचशा गोष्टी त्यांना अवगत झाल्या होत्या.  पाककला, कुंभारकाम, टोपल्या विणणें, वस्त्रें विणणें, इत्यादि बाबतींत त्यांनी बरीच प्रगति केली होती.  कुत्रीं, गायी-गुरें, शेळ्या-मेंढ्या, डुकरें इत्यादि प्राण्यांना माणसाळविण्यास ते शिकले होते.  मुंगीच्या मेंदूइतपत त्यांची प्रगति झाली होती.  मुंगी ज्या गोष्टी करूं शकते त्या ते करूं लागले होते.  बुध्दीची तितपत वाढ झाली होती.  मुंग्यासुध्दां आपला नातलग जो मानवप्राणी त्याच्याप्रमाणें खालच्या जीवजंतूंना माणसाळवितात.  त्यांना आपलें घरकाम करायला लावतात.  मुंग्यांचींसुध्दां गायीगुरें असतात.  कांही विशिष्ट जंतू मुंग्या पाळतात.  दुधासारखा द्रव ते जंतू देतात.  त्या जंतूंच्या पाठीवर थोपटून मुंग्या हा रस काढतात.  या आपल्या गायींसाठीं मुंग्या गवताचें व बारीक रेशमी धाग्याचे गोठे बांधतात.  या गोठ्यांत त्या गायींना मुंग्या दवडतात.  बारा हजार वर्षांपूर्वीचा मानवहि हें सारें करूं लागला होता व ओबडधोबड गोठ्यांत गायीगुरें ठेवूं लागला होता.

त्या इतिहासपूर्व काळांत ज्या गोठ्यांतून गायीगुरें रहात त्यांतच माणसेहि रहात.  जेथें गुरें तेथेंच गुरांचे धनी.  हे गोठे किंवा या झोंपड्या सरोवराच्या मध्यभागीं कांहीतरी उंच उभारून त्यावर बांधण्यांत येत.  किनार्‍याशीं लांकडी पुलाच्या योगानें या झोंपड्या जोडलेल्या असत.  हे पूल रात्रींच्या वेळेस काढून ठेवीत.  कोणी शत्रु येऊ नयें म्हणून.  या झोंपड्यांतील जागा शेणानें लिंपलेली असे.  शेण आधीं पायांखाली खूप तुडवीत.  घरांतील एका बाजूला गायीगुरें असत.  एका बाजूला माणसें, स्त्रिया, पुरुष, मुलें, गायीगुरें-सर्वांमिळून जणूं झालेलें कुटुंब.  जरा गोंगाट असे.  शांति नसे.  परंतु बरें होतें.  लोक जमिनीवरच खालीं बसत; तेथेंच खात. तेथेंच झोपत.  खु्र्च्या, खाटा, मेजें, इत्यादि प्रकार करावयास मनुष्य अद्याप शिकला नव्हता.  ताटें, चमचे, सुर्‍या, चाकू इत्यादि प्रकार अजून नव्हते.  ख्रिस्तशकाच्या पंधराव्या शतकापर्यंत जेवणाच्या कांट्यांचा शोध लागला नव्हता.  कांट्याचा शोध लावण्याइतपत हुशार मेंदू इसवी सनाच्या पंधराव्या शतकापर्यंत तयार झाला नव्हता.

बारा हजार वर्षांपूर्वीचें युरोपांतील हे आपले सरोवरनिवासी पूर्वज असें होते.  दहाबारा पिढ्यांपूर्वीच्या युरोपांतील शेतकर्‍यांची जी स्थिती होती, तीच त्या बारा हजार वर्षांपूर्वी युरोपांत वसाहत करणार्‍या त्या सरोवरवासीयांची होती.  केनट्की पर्वतांत रहाणार्‍या आजच्या डोंगरी लोकांचा जितपत मानसिक विकास आहे त्याहून त्या बारा हजार वर्षांपूर्वीच्या युरोपांतील सरावरवासीयांचा मनोविकास कमी नव्हता.  जीवनाच्या शाळेंतील मानवप्राणी हा अत्यंत गचाळ व मंदबुध्दि असा प्राणी आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel