एकावर एक तंबू उभारल्याप्रमाणें त्यांचें हें शिल्प दिसतें.  त्यांनीं वैद्यकीचा अभ्यास केला, काव्याची जोपासना केली.  तार्‍यांच्या गतींशीं त्यांनीं परिचय करून घेतला.  बहुजनसमाजाला शिक्षण मिळावें व राज्यकारभार नीट चालावा म्हणून पंडितवर्गाची, मांदारिनवर्गाची संस्था त्यांनीं स्थापिली.  या वर्गांत देशाला मान नसून ज्ञानाला मान असे.  येथें ज्ञानाची प्रतिष्ठा होती.  एकादा झाडूवाल्याचा मुलगाहि मांदारिन होऊं शकत असे.  अवश्यक असें ज्ञान त्यानें मिळविलेलें असलें म्हणजे झालें.  उलट एकादा मांदारिनाचा मुलगाहि जर त्याला विद्वेत्ता नसेल तर झाडूवाला होत असे.

हे मांदारिन म्हणजे आळशी लोक नव्हते.  ते सनदी नोकरींत शिरत.  राजाला देशाची व्यवस्था ठेवण्यासाठीं ते मदत करीत.  चीनमध्यें राजसत्ता होती, परंतु अनियंत्रित जुलूम नव्हता.  बहुतेक चिनी प्रांतांना प्रबुध्द अशा राजसत्तेचा अनुभव येई.

परंतु असें समजूं नका, कीं त्या काळांतील चीन म्हणजे निर्दोष भूमि होती.  राजाला मदत करणारे हे पंडित नेहमींच प्रामाणिक असत असें नाहीं.  राजाची मर्जी मिळविण्यासाठी खुशामतीचा वक्र रस्ताच अधिक जवळचा असतो असें त्यांना आढळून आलें होतें.  लांचलुचपतीस भरपूर वाव होता.  धनार्जन करण्याच्या संधी येत आणि तत्त्वज्ञानी असणारे हे मुत्सद्दीहि मोहाला बळी पडल्याशिवाय रहात नसत.  कधीं कधीं तत्त्वज्ञान्यालाहि स्वत:चे खिसे सोन्यानें भरलेले असावे असें वाटतें.  तसेंच हे तत्त्वज्ञानी जर कधीं प्रामाणिक निघाले तर राजे त्यांचा सल्ला ऐकतच, असें होत नसे.  म्हणून या प्राचीन चिनी लोकांत पूर्णता होती असें समजण्याचें कारण नाहीं.  कांहीं अतिरंजित इतिहासकारांनीं चीन म्हणजे जणूं स्वर्ग असें चित्र रंगविलें आहे तें बरोबर नाहीं.

चिनी लोकांमध्यें इतरत्र आढळणारा आणखी एक दोष होता.  ते फार अहंकारी होते.  जे जे परकी येत, ते त्यांना सैतानी वाटत.  परकीयांना ते सदैव तिरस्कारानें वागवीत.  त्यांच्या देशाचें प्राचीन नांव ''मध्यदेश'' असें होतें, ''मध्यराज्य'' असें होतें.  त्यांची अशी समजूत होती, कीं परमेश्वरानें आपणांस पृथ्वीच्या मध्यभागीं ठेवलें आहे.  इतर राष्ट्रांपेक्षां आपणच प्रभूचे अधिक लाडके असें त्यांना वाटे.  आपणच काय ते श्रेष्ठ असें मानण्याचा मूर्खपणा करण्यांत ते अर्वाचीनांच्या बरोबरीचे होते.

परंतु कितीहि दोष असले तरी चिनी लोक ख्रिस्तीशकाच्या नवव्या शतकांत उच्च संस्कृतीवर होते ही गोष्ट नाकबूल करण्यांत अर्थ नाहीं.  परंतु नंतर दुर्दिन आले.  हूणाशीं त्यांचा संबंध आला.  हे हूण चीनच्या पश्चिमेस होते.  ते शेळ्या-मेंढ्या पाळीत.  ते रानटी होते.  शांतताप्रिय चिनी लोकांत लष्करी सत्तेचें विष टोंचलें गेले.  हे पश्चिमात्य जंतू त्यांच्यांत शिरले.  चीनमध्ये आजहि पश्चिमात्य लष्करशाहीचे जंतू शिरतांना दिसत आहेत.  हूणांशीं संबंध आल्यामुळें सत्तालालसेचें जें विष चिनी राष्ट्रांत शिरलें तें नष्ट करावयास बरींच वर्षे लागली.  किती तरी यादवी युध्दें झालीं.  आणि नंतर अराजकतेचा काळ आला.  सारा देश जणूं वेडापिसा बनला.  सर्वत्र हाणामारी ! वाटेल त्यानें उठावें व लहान राज्य स्थापावें.  देशाचे शत खंड झाले.  अनेक छोटीं छोटीं राज्यें सर्वत्र निर्माण होऊन तीं परस्परांस नष्ट करूं पहात होतीं.  या वेळीं बाहेरचे रानटी लोक आले.  विस्कळित चीन या रानटी टोळधाडीपुढें टिकाव धरूं शकला नाहीं.

परंतु सुदैवानें याच सुमारास चीनमध्यें थोर विचारवंत जन्माला आले.  त्यांनीं लोकांना पुन्हा समतोलपणा दिला, विवेक दिला.

या ज्ञानी व चारित्र्यसंपन्न लोकांत दोन मुकुटमणी होते.  एक लाओत्से व दुसरा कन्फ्यूशियस.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel