रक्ताचे, रंगाचे किंवा भौगोलिक भेद त्याच्या स्वातंत्र्यप्रेमास शिवले नव्हते. मॅझिनीच्या ठायीं अहंकाराचा लवलेशहि नव्हता, ऐहिक आकांक्षेचा अणुरेणूहि नव्हता. कोणत्याहि देशाविषयीं संकुचितपणाची थोडीहि जाणीव त्याच्या ठायीं नव्हती. स्वत:च्या मायभूमीचें प्रेम त्याच्या मनांत एकाद्या ज्वालेप्रमाणें पेटत होतें; पण दुसर्‍या राष्ट्राच्या व्देषांत पर्यवसान पावणारी देशभक्ति मात्र त्याच्या ठायीं नव्हतीं. कार्लाइलचें बौध्दिक क्षितिज फार संकुचित असल्याबद्दल मॅझिनीनें टीका केली आहे. तो केवळ आपल्या देशापुरताच जगतो, तो त्याच्या मतें मानवजातीचा द्रोही होय. तो म्हणतो, ''जगाच्या ऐक्याचा खरा भाव कार्लाइलला कळलाच नाहीं. सर्व मानवांचें एक कुटुंब करण्यासाठीं आपण प्रयत्न केला पाहिजे.''  या तत्त्वावर 'तरुण इटली' या पक्षाची संघटना करून पुढें तींतूनच 'तरुण युरोप' ही संघटना त्यानें काढली. राजशाही व आंतरराष्ट्रीय झगडे नष्ट करण्यासाठीं सदैव व सर्वत्र धडपडणें हें एकच ध्येय या दोन्ही संस्थांनीं आपल्यापुढें ठेवलें होतें. त्याचे सभासद युरोपांतील सर्व देशांत स्वातंत्र्य, समता व बंधुता स्थापण्याचा ध्येयाचा स्वत:स वाहून घेत. ''समान व मुक्त लोकांतच खरी मैत्री होऊं शकते.''  विशिष्ट वतनदारी हक्क, जुलूम व आक्रमणशील स्वार्थ या सर्व गोष्टी भूतकालीनच करून टाकावयाच्या. ''विशिष्ट हक्क म्हणजे समानतेचा भंग, जुलम म्हणजे स्वातंत्र्याचा भंग व स्वार्थाचें प्रत्येक काम म्हणजे बंधुतेचा भंग होय.''  प्रत्येक राष्ट्रानें आपआपल्या विशिष्ट गुणांचा विकास करून मानवी प्रगतीच्या सागरांत आपला विशिष्ट सुंदर प्रवाह घेऊन यावें. यासाठींच राष्ट्रें असावीं. वैचित्र्यांतहि आनंद असतो; मात्र तें वैचित्र्य अविरोधी असावें. तो लिहितो, ''त्या त्या लोकांचे विशिष्ट कार्य आहे. मानवजातीच्या सर्वसामान्य ध्येयाच्या पूर्ततेसाठीं तें तें राष्ट्र सहकार्य करील. त्या त्या राष्ट्राचें विशिष्ट ध्येय म्हणजेच त्या त्या राष्ट्राची राष्ट्रीयता. राष्ट्रीयता पवित्र आहे.''  पण राष्ट्रीयतेचें ध्येय मोठ्या संयुक्त मानवतेच्या ध्येयाला पूरक मात्र असलें पाहिजे. मोठ्या ध्येयाच्या पूर्ततेसाठीं छोटें ध्येय. शांततामय जगाच्या प्रेमसंगीतांत स्वतंत्र असणार्‍या त्या त्या राष्ट्राची विशिष्ट तान सुसंवादीपणानें मिसळेल व मुधर असें महासंगीत निर्माण होईल. ''ज्या वेळेस सर्व लोक व सर्व राष्ट्रें-- ज्यांची ही मानवजात बनली आहे--स्वतंत्र होतील, त्यांच्या देशांत जनतेची खरी सत्ता स्थापन होईल, तेव्हांच अशा या स्वतंत्र व मुक्त राष्ट्रांचें एक मोठें रिपब्लिकन कॉन्फेडरेशन करणें शक्य होईल. सर्वांना समान अशा तत्त्वांच्या घोषणेप्रमाणें हें जागतिक फेडरेशन चालेल. सर्वसंमत असा एक कार असेल, तदनुसार सर्व जण वागतील. सारे एका ध्येयाची पूजा करतील. कोणतें ते ध्येय ? --विश्वव्यापक अशा नैतिक कायद्याचें संशोधन व तदनुसार सतत वर्तन.''

'सर्व मानवजातीचें संयुक्त रिपब्लिक' हें मैझिनीचें ध्येय होतें. हें स्वप्न प्रत्यक्षांत यावें म्हणून तो फ्रान्समध्यें गेला. त्या काळीं फ्रान्स हें सर्वांत जास्त स्वतंत्र राष्ट्र होतें. पण जगांतील इतर राष्ट्रांना स्वातंत्र्याचा, समतेचा व बंधुतेचा हात द्यावयास फ्रेंच लोक अद्यापि तयार नव्हते. जागतिक सहानुभूतीचा मॅझिनीसारखा विश्वात्मक पुरुष अद्यापि धोक्याचा समजला जाई. त्याला पुन: एकदां फ्रान्स सोडून जाण्याबद्दल बजावण्यांत आलें. पण त्यानें आज्ञा मोडली; जाण्याऐवजीं तो मार्सेलसमध्यें एका अज्ञात कोंपर्‍यांत लपून राहिला. वीस वर्षे एका लहानशा खोलींत त्यानें स्वेच्छेचा बंदिवास काढला. पवित्र राष्ट्रांचे दूत व गुप्त पोलिस त्याचा जगभर शोध करीत होते, तरी तो या लहानशा खोलींत निर्वेधपणें राहून व मित्रांची आणि समविचाराच्या सहसकारी बंधूंची भेट घेऊन दुसर्‍या शहरांतील सहकार्‍यांना सूचना पाठवी व सल्ला देई. येथेंच तो अधिक चांगल्या जगाची आपली योजना पूर्ण करीत होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel