वसंता : तें पहा ओरडूं लागलें. विठीनें डोळे उघडले. कुत्र्याला आनंद झाला. तो तुकडा विठीच्या पदरांत टाकून विठीच्या तोंडाजवळ कुत्रा आपलें तोंड नेत आहे, बोलत आहे. माणसानें प्रेम दिलें नाहीं तर आम्ही देऊं असें का तें सांगत आहे ?

वेदपुरूष : गेंलें! कुत्रें गेलें. तें तेथून भुंकत आहे. कोणाला हांक का मारीत आहे ? होय. ते पहा दोन कुत्रे आले. भाकरीचे तुकडे त्यांच्या तोंडांत आहेत. हांक ऐकून इकडे आले. वाघ्यासमोर तुकडे ठेवून ते पुन्हा गेले.

वसंता : ते पहा वाघ्या तुकडे धरीत आहे. एकेकच घेतां येईल. शहाणा आहे. एकेक तुकडा विठीजवळ नेऊन देत आहे.

विठी : वाघ्या! कोठून आणलीस भाकर ? चोरून नाहींना आणलीस ? कोणाच्या घरांत शिरून नाहींना आणलीस ? परंतु तूं आमच्यापेक्षां पवित्र आहेस हो वाघ्या. तूं घरांत गेलास तरी चालेल. परंतु आम्हीं अंगणांतहि नाहीं जातां कामा! वाघ्या! पुढचा जन्म तुझ्याच जातींत घेईन हो. माझ्यासाठीं भाकर आणलीस ? वाघ्या! तूं खा थोडी. तूं खा. मग मी खाईन. तुझ्या हृदयांतील प्रेम या भाकरींत ओतलें असशील. तुझी लाळ गळली आहे. वाघ्या, तूप आहे होय ना तें ? वाघ्याच्या घरचें तूप.

वेदपुरूष : वाघ्यानें तुकडा खाल्ला. विठीच्या पायाजवळ तो बसला, किती प्रेमानें बसला आहे !

वसंता : विठी भाकर खात आहे! वाघ्यादेवाची केवढी दया !

वेदपुरूष : तो कोण येत आहे ? कांहीं तरी गुणगुणत येत आहे.

वसंता : हरिजनाचा मुलगा दिसतो. किती गोड आहे गळा!

वेदपुरूष : किती मोहक आहे मूर्ति !

वसंता : कूश झालेली मूर्ति आहे.

वेदपुरूष
: देह कूश झाला आहे. परंतु आत्मा वाढला आहें.

''अंवसेला वरी            चंद्र नाही जरी
लाखों तारा तरी         चमकती
अंधारींहिं आहे            प्रकाष देवाचा
म्हणून श्रध्देचा          नसो लोप
अंवस असो वा          असो वा पुनव
अंतरी राघव             आळवावा
वानरांचा हात           घेईल राघवा
उठेल मानव            मातीतील
मातीतील किडे         होतील हो हिरे
होईल हें खरें            माझें वाक्य''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel