तिघांची त्रेधा
मंगा घरातून बाहेर पडला. बरेच दिवस तो कोणाला दिसला नाही. परंतु एके दिवशी तो टेकडीवर बसला होता. आकाश अभ्राच्छादित झाले होते. गार वारा होता. दुपार होत आली होती. मंगा तेथे जरा लवंडला. समुद्राकडे पहात झोपी गेला. त्या विश्वसंगीतात बाळ झोपले. सागराचे व वा-याचे संगीत, गंभीर, गूढ संगीत. त्या नादब्रह्मात मंगा झोपी गेला. उशाला हात घेऊन तो झोपी गेला. परंतु जागा झाला तो त्याचे डोके कोठे होते? डोक्याखाली कोठली उशी होती? मधुरीच्या मांडीवर त्याचे डोके होते. मधुरीच्या हातात त्याचा हात होता. आपण स्वप्नात आहोत की जागृतीत ते त्याला कळेना. तो पुन्हा डोळे मिटून पडला. त्याच्या मुखावर अपार आनंद होता. तेथे शत कोमल भाव फुलले होते. तो सुखावला होता, मंदावला होता. मधुरी गाणे म्हणू लागली.

‘नीज राजा नीज
माझ्या मांडीवरती डोके ठेवून नीज ॥ नीज०॥
खंत नको करु राजा
चिंता नको करु राजा
क्षणभर आकाशीची कडाडते नीज॥ नीज०॥
चिंता सरे दु:ख हरे
अंधार सरे प्रकाश भरे
अंवस जाऊन सोनियाचा उजळते नीज॥ नीज०॥
सदा नसे उन्हाळा
येतोच पावसाळा
आशेचे प्रेमवृष्टीत अंकुरेल बीज॥ नीज०॥
जगी किती कटकटी
जगी किती ताटातुटी
कष्टाचे अंती परी होते गडया चीज॥ नीज०॥’

मधुरी गाणे म्हणत होती, मंगाला ती थोपटीत होती. शेवटी ती मुकी झाली. शब्दमय गाणे संपून मूक गान सुरु झाले. मौनाचे अपरंपार गान, अनंत अर्थाचे भावनाकल्लोळाचे उत्कट गान. ते मुके गीत गात मधुरा मंगाला थोपटीत होती.
‘मधुरी!’
‘काय राजा?’
‘मी का राजा? बाबा मला राजा करु पहात होते. परंतु राज्य मी भिरकावले. मी भिकारी झालो. घराबाहेर पडलो. मी का राजा? कोठल्या देशाचा मी राजा? कोठे आहे माझे राज्य? कोठे आहे धनदौलत?’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel