''रामराव, जरा विचारानं बोला. मी सरदार नाही. मी मजूर आहे. माकडचेष्टा आणि पशुचेष्टा या गोष्टींवर सरदारांचा हक्क आहे. तुम्हा सरदारांचे पराक्रम दिसतच आहेत. 'लाळघोटया' याशिवाय तुम्हाला दुसरा कोणता शब्द लावावा? पै किमतीची तुम्ही सरदारी माणसं आहात हे मी जाणतो. स्वतःच्या पलंगावर पोलिसास बसवाल व त्याचे पाय चेपाल. त्याला सिगारेट शिलगवून द्याल. त्याच्या तोंडाशी चहाचा पेला धराल. कुळाच्या किमती सांगण्याचे दिवस गेले राव. मी शांताकडे एक थोर मनाची या नात्यानं बघतो. एका खानदानी घराण्यातील या नात्यानं बघत नसतो. शांतेशी मी लग्न करण्याचं मनात आणलं तर ते पाप नाही. आम्ही दोघं निष्कलंक आहोत.'' मोहन म्हणाला.

''ठीक. या गावात तुला राहणं अशक्य करतो.'' रामराव म्हणाले.

''दुनिया ओस नाही पडली रामराव.'' मोहन म्हणाला.

''नीघ येथून. पुन्हा तोंड दाखवू नको.'' ते म्हणाले.

''मी कधी आलो होतो दाखवायला? आपणच बोलावणं पाठवलंत सरदारसाहेब.'' मोहनने उत्तर दिले.

मोहन निघून गेला. गावात त्याच्याविरुध्द चक्रे सुरू झाली. ज्याच्या मळयात मोहन कामावर होता, त्याने मोहनला कामावरून काढून टाकले. 'अनीतीचा माणूस मला नको', असे त्या मालकाने सांगितले. गावच्या मुलकी व पोलीस पाटलांनी मोहनविरुध्द गावभर प्रचार सुरू केला. त्याला कोणी कामावर घेऊ नये, कामाला लावू नये म्हणून धाकटपटशे दिले. गोविंदरावांचे कारभारी गावात येऊन तोच प्रचार करावयाचे. निर्मळ नाचा मोहन निर्भयपणे वावरत होता. सत्याला कशाचे भय?

मोहनला एक चिंता होती शांतेला पैसे पाठवायचे. त्याने आपली सारी पुंजी तिला दिली होती. परंतु शांतेला मोठया शहरात ती कितीशी पुरणार? गावात कोणी कामाला बोलविना. पाटलाची भीती, सावकारांची तंबी.

मोहनच्याऐवजी दुसरे तरुण आता वर्ग चालवीत. आपल्यामुळे वर्ग बंद पडू नयेत अशी त्याची इच्छा होती. त्याला मोठेपणा नको होता. कोठूनही जनता साक्षर व्हावी, शहाणी व्हावी. स्वावलंबी व्हावी, जगातील हालचाली जाणणारी व्हावी एवढीच त्याला इच्छा. बायकांचा वर्ग आता बायका चालवीत. शांतीची एक मैत्रीण गीता पुढे आली व काम चालवू लागली. मोहनबद्दल तिला आदर वाटत होता. वर्गात शिकवताना अप्रत्यक्षपणे मोहनच्या निष्कलंक शीलाबद्दल ती बोले.

मोहनचे एक तरुण मंडळ होते. त्याचा सल्ला घेऊन एके दिवशी मोहनने शिवतर सोडले. तो धनगावला नोकरीसाठी गेला. धनगाव मोठे शहर होते. तेथे चार गिरण्या होत्या. कोठे तरी नोकरी मिळेल असे त्याला वाटले होते. परंतु काही जमेना.

धनगावला मोठी इंग्रजी शाळा होती. शाळेचे एक वसतिगृह होते. तेथे भांडी घासण्याचे काम मोहनला मिळाले. त्याने ते आनंदाने घेतले. भांडी घासण्याचे काम त्या प्रांतात कमी मानीत. दुसर्‍या प्रांतातील गरीब लोक येऊन ते काम करीत. परंतु मोहनला कोणतेही काम कमी वाटत नव्हते. प्रामाणिक श्रम पवित्र आहेत असे तो म्हणे. त्याला तेथे वसतिगृहात राहायला एक झोपडी मिळाली. तो भल्या पहाटे उठे. आसपासच्या इतर सुखवस्तू घरीही तो भांडी घासावयास जाई. तेथून आठच्या आत परत येई. मग वसतिगृहातील काम. अत्यंत निर्मळ असे त्याचे काम असे. मुले प्रसन्न झाली. पाण्याची भांडी व तांब्ये इतके स्वच्छ पूर्वी कधीच नसत. वसतिगृहातील खरकटी भांडी दुपारी घासल्यावर मुलांची धुणी तो धुवी; नंतर जेवी. दोन वाजता तो जरा मोकळा होई. त्या वेळेस आपल्या झोपडीत तो वाचीत बसे. रात्री भांडी-खरकटी, फरशी धुणे वगैरे झाल्यावर तो झोपडीत येई. जेवण आटोपी. नंतर वसतिगृहातील बाहेरच्या विजेच्या दिव्याखाली तो वाचीत बसे.

''मोहन, दिवसभर दमतोस, रात्री काय वाचतोस?'' वसतिगृहातील एका विद्यार्थ्याने विचारले.

''ज्ञानाशिवाय बुध्दीचं समाधान होत नाही. दिवसभर तो बिचारी उपाशी असते. तिला नको का थोडं खायला?'' तो म्हणाला.

''पाहू दे पुस्तक.'' विद्यार्थी म्हणाला.

मोहनने पुस्तक दाखविले. विद्यार्थी आश्चर्याने म्हणाला, ''हिंदुस्थान व समाजसत्तावद ! मोहन, समजतं रे तुला?''

''बरंचसं समजतं.'' तो म्हणाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel