१७. दीनबंधू

रामदासाची दत्तकसंबंधाची आई स्वतंत्र राहू लागली. तिला २५ रुपये दरमहा तो देणार होता. रामदासाने ज्या प्रॉमिसरी, जी खतपत्रे जाळली त्यांची त्याच्याजवळ नीट नोंद होती. त्याने सर्व कागदपत्रे नीट तपासून ठेवली होती. गरीब शेतकर्‍यांना त्याने मुक्त केले होते. श्रीमंताकडची कर्जे-ती नव्हती जाळली गेली. त्यांच्याजवळ तडजोडी करून वा एकदंर देवघेव प्रकरणातून तो मुक्त होणार होता. सोनखेडी, शिवतर वगैरे अनेक गावचे शेतकरी रामदासाने मुक्त केले. ते त्याला देव मानू लागले. किसानांनी त्याला 'दीनबंधू' हे नाव दिले.

रामदास एके दिवशी सोनखेडीला गेला होता. दयारामाच्या आश्रमात तो उतरला होता. पुढील आयुष्यासंबंधी बोलणे चालले होते. रामदासाच्या मनात  सोनखेडीला कोठेतरी एखादे लहानसे घर बांधून राहावे असे वाटत होते. आपला दिलरुबा खेडयातील दुःखी मायबहिणींस ऐकवावा असे त्याला वाटत होते. किसानांच्या संसारात प्रेमस्नेहाचे संगीत तो ओतू इच्छीत होता. दिवाणखान्यातील संगीत, राजांच्या राजवाडयांतील संगीत  तो चंद्रमौळी झोपडीत आणणार होता. भगीरथाचे ते काम होते. स्वर्गातून गंगेला भगीरथाने भूतलावर आणून मानवांना मोक्ष दिला. मानवांची अन्नाची ददात दूर केली. गंगेच्या काठी केवढी सुबत्ता !  जमीनदारांनी ही सुबत्ता आपल्या कुलपात पुन्हा आणून ठेवली ही निराळी गोष्ट! क्रांती होईल व पुन्हा दिवाणखान्यातील सुबत्ता आम जनतेची होईल. कलाही दिवाणखान्यात येऊन बसल्या आहेत- कोंडवाडयात त्या पडल्या आहेत. त्या जनतेच्या करावयाच्या आहेत. जनतेला मोक्ष देणार्‍या, दुःखांतून मुक्त करणार्‍या, सुखांचा स्पर्श करणार्‍या त्या झाल्या पाहिजेत. दीनबंधू रामदास ते करू इच्छीत होता.

''संगीतसे उध्दार होगा आपका और लोकका ।'' संगीताने आपलाही उध्दार होतो व लोकांचाही होतो. संगीत सर्वांना एका उच्च वातावरणात घेऊन जाते. संगीत चराचरात भरून राहिले आहे. संगीताने पशुपक्षी लुब्ध होतात. हरिणे वेडी होतात. गाई तटस्थ राहतात, नाग डोलू लागतात. संगीताने चराचरांचे ऐक्य होते. सर्वांचा एका दिव्य वृत्तीत लय होतो. म्हणून तर संगीताला वेद म्हणतात. म्हणून तर ''धन्य ते गायनी कळा।'' असे समर्थ रामदास म्हणतात.

''दयाराम, येथे येऊन मी राहणार आहे, तुमच्या आश्रमाच्या पावित्र्याच्या शेजारी येऊन राहणार आहे. येथे लहानशी झोपडी बांधावी म्हणतो.'' रामदास म्हणाला.
''आश्रमातच का नाही राहात?'' दयारामाने विचारले.

''मी आज एकटाच आहे. उद्या एकटाच राहीन असं नाही. समजलास ना? मी लग्न करणार आहे. संसारात पडणार आहे.'' रामदास म्हणाला.

''राहा येथे. आम्हाला आधार होईल. दीनबंधू जवळ असल्यावर आणखी काय पाहिजे?'' दयाराम म्हणाला.

''मी विश्वभारतीत ग्रामीण विकास वर्ग जोडला होता. खेडयांच्या पुनर्रचनेचा अभ्यास केला. तो अभ्यास मला इतरत्र काय कामाचा? तेथे खेडयातच राहून जे करता येईल ते करावं.'' रामदास म्हणाला.

''आणि आता तू म्हणशील ते लोक करतील; खरोखरच ते म्हणतात की, रामदास म्हणजे देव आहे. तू त्यांना कातायला सांगितलंस तर ते काततील. घाण करू नका सांगितलंस, तर ते तसं करतील. त्यांची संघटनाही होईल. मुकुंदराव किसानांची संघटना करत आहेत. तू त्यांना आता जाऊन मिळ. झपाटयानं संघटना वाढेल. रामदासानं शेतं परत दिली, बाकीच्या सावकारांनी का देऊ नयेत? ज्यांना मुदलाइतकी रक्कम व्याजाच्या रूपात मिळाली, त्यांची कर्जे संपली असं समजलं गेलं पाहिजे. वास्तविक शेतकर्‍यांचाच पैसा शेतकर्‍यांना कर्ज म्हणून देण्यात येतो. सावकारांनी का तो गादीवर लोळून निर्माण केलेला होता? शेतकर्‍यांचीच ती ठेव होती. शेतकर्‍यांची ती ठेव सांभाळून त्याला वेळच्या वेळी देणं या कामाबद्दल घ्यावा. त्यांनी थोडा मोबदला, त्यालाच व्याज म्हणावयाचं; परंतु शेतकर्‍यांच्या मानेला फास  लावणं हा झाला आहे सावकारीचा अर्थ. सर्वस्व गमावून बसले शेतकरी. सुताचा धागा किती तारणार? शेतकर्‍यांची मायमाऊली जमीन ती त्याला परत मिळाली पाहिजे. शेतकर्‍यांची प्रचंड संघटना त्यासाठी हवी. हे महान कार्य आहे. रामदास, तू आता त्या कामात पड. त्या कामात पडणं कठीण आहे. हातावर शीर घेणं आहे. सरकारचा रोष होईल. परंतु ते सारं केलं पाहिजे. तू नाही करणार तर कोण करणार?'' दयाराम म्हणाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel