तिघे मित्र जेवायला बसले. प्रद्योत मायेचे लग्न झाल्यापासून कसा बेपत्ता झाला आहे, 'तुला मी मरेपर्यंत त्रास देईन' वगैरे मायेला कसे म्हणे- सार्‍या गोष्टी जेवताना दोघा मित्रांनी आनंदमोहनास सांगितल्या.

''वाचवावं पोरीच्या नवर्‍याला वाचवता आलं तर.'' पत्नी म्हणाली.

''तू नको सांगायला. तुझी बुध्दी चुलीजवळ ठेव. बाहेरून आलो तर हॅट ठेवावी, हातातील काठी ठेवून द्यावी, ही कामं तू आपली करत जा. पुरुषांना अक्कल शिकवू नये विचारल्याशिवाय.'' साहेब रागाने बोलले.

तिघे मित्र बाहेर आले. साहेब धूर सोडीत बसले. मित्रद्वयाने पान घेतले.

''हे पाहा, मी त्या धनगावला जातो.  तुम्हाला मी तार करीन. नाही तर पत्र लिहीन. मी बोलावलं म्हणजे तुम्ही यायचं. घाबरू नका. मजेदार दिसते केस.'' आनंदमोहन म्हणाले.

''माझा जावईही वाचवा व यांचा प्रद्योतही वाचवा.'' रमेशबाबू म्हणाले.

''बरं, बरं. बघतो मी सारं. तुम्ही येथेच झोपता का?'' त्यांनी विचारले.

''आम्ही आता जातो. आम्हाला गाडी आहे. घरीही काळजीत आहेत सारी.'' रमेशबाबू म्हणाले.

''तेही खरंच. मग तुमची निघण्याची वेळ झाली. चिंता नका करू. तुमच्या प्रद्योतला माझी बहीण देऊन टाकू. ती आज येथे नाही. या मित्राची मुलगी नाही तर या मित्राची बहीण. माझी सर्वांत धाकटी बहीण मोठी सुरेख आहे बरं, ते पुढे पाहू.''

दोघे मित्र गेले. साहेब थोडे पोचवायला जाऊन परत आले. बराच वेळ ते तो पत्रव्यवहार न्याहाळीत होते. शेवटी ते उठले. ''मला आताच्या आता जायचं आहे, समजलीस का? माझी तयारी करून दे. ऐकलंस का गं? निजली की काय? हिला सतरांदा बजावलं आहे की, मी निजल्याशिवाय निजत जाऊ नको म्हणून.'' असे ते रागाने मोठयाने बोलू लागले. पत्नी डोळे चोळीत जरा घाबरत बाहेर आली.

''निजली होतीस ना? तडाखे हवेत तुला त्या दिवसासारखे? तयारी कर माझी. मोठी गमतीची केस आहे. मी आताच निघतो. बघतेस काय अशी? छडीहवी आहे वाटतं? जांभया देत आहे; आळशी कुठली,'' ते बडबडत होते.

पत्नीने सारी तयारी करून दिली. आनंदमोहन निघाले.

''परत कधी येणार?'' तिने भीत भीत विचारले.

''आमचा नेम नसतो कशाचा म्हणून शंभरदा सांगितलं आहे. अगदी मठ्ठ आहेस. नुसती मठ्ठ. फटके हवेत.'' ते म्हणाले.

बिचारी पत्नी, ती काही बोलली नाही. होता होईतो ती कधी विचारीत नसे. उणाअधिक शब्द बोलत नसे. परंतु एखादे वेळेस चुकून तोंड उघडले जाई व शिव्या खाव्या लागत.

आनंदमोहन निघून गेले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel