झोला, बर्गेट, हुइसमन, किप्लिंग व इतर प्रसिध्द कादंबरीकारांच्या त्या कादंब-या व त्यातील गोष्टी, त्यांमधील ते भीषण प्रसंग, त्यांनी माझे हृदय एक क्षणभरही हलले नाही. थोडासुध्दा परिणाम त्यांचा माझ्यावर झाला नाही. वाचीत तर होतो त्यांची ती पुस्तके व वाचताना त्यांच्यावर संतापत होतो. एखाद्या माणसाने आपली थट्टा किंवा खोडी करावी, आणि वर पुन्हा ती थट्टा आपणांस समजत नाही असे गृहीत धरून, इतके मूर्ख आपण  आहोत असे समजून त्या गृहस्थाने ती थट्टा समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा, त्यावेळेस जसा त्याचा आपणास राग येतो व आपण त्याला म्हणतो ''अहो, इतकीही अक्कल आम्हांस नाही का?''-तसेच या कादंबरीकारांबद्दल मला वाटे. पहिल्या पात्रांतील पहिल्या ओळीवरूनच कादंबरीकाराचा हेतू लक्ष्यात येतो. मग बाकीची सारी वर्णने नीरस वाटतात; त्यांचा कंटाळा येतो. वाचताना पदोपदी असे वाटत असते की, हे भारूड लिहून काढण्यापलीकडे या ग्रंथकाराचा दुसरा हेतूच नसावा. वाचणा-याच्या मनात कोणतीही भावना उत्पन्न होत नाही. कारण भावनादान हे या कादंबरीकारांचे ध्येयच नसते. परंतु वरती सांगितलेली ती साधीच गोष्ट-ती लहानशीच गोष्ट-परंतु तिने मला चटका लावला, वेड लावले. ती गोष्ट मला सोडवेना. फिरून फिरून ती गोष्ट मी वाचली. अज्ञात लेखकाची ती छोटीशी गोष्ट-ती माता व तिची मुले आणि ती कोंबडी बया व तिची पिले! लेखकाने स्वत: जो अनुभव घेतला, ज्या भावना त्याने स्वत: अनुभवल्या होत्या. त्याच त्याने माझ्यामते पुन्हा जागृत केल्या, मला तद्रूप केले. मी त्या लेखकाशी समरस झालो.

रशियन चित्रकारांत वॅस्नट्सॉब हा एक आहे. खीव्ह येथील धार्मिक मंदिरांत त्याने धार्मिक प्रसंग चितारले आहेत. उदात्त, गंभीर व सुंदर अशा नवीन धार्मिक कलेचा जनक म्हणून त्याची सर्वजण स्तुती करतात. दहा वर्षे ते काम तो करीत होता. लक्षावधी रुपये त्याला त्याबद्दल देण्यात आले. परंतु त्याची ती चित्रे म्हणजे नकलांच्या नकला अशीच खरोखर आहेत. त्या चित्रांत भावना नाही, प्राण नाही, परंतु याच चित्रकाराने टर्जिनाव्हच्या एका गोष्टीसाठी एक चित्र काढले होते. बाप एका पक्ष्याला मारतो व मुलाला त्या पक्ष्याची कीव येते. मुलाला फार वाईट वाटते. त्या गरीब पाखराबद्दल तो हळहळतो. चित्राची कल्पना अशी आहे की, मुलगा झोपला असून स्वप्नांत आहे. त्याचे ओठ अर्धस्फुट असे आहेत. तो वर पक्षी पाहतो आहे. झोपलेल्या, स्वप्नांत असलेल्या त्या मुलाच्या समोर तो पक्षी असे ते चित्र आहे. ते चित्र अति सुंदर आहे. ती खरी बहुमोल कलाकृती आहे. ती सजीव, भावनामय आहे.

इंग्लंडमध्ये १८९७ च्या प्रदर्शनांत जो चित्रसंग्रह होता, त्यांत दोन चित्रे पुढीलप्रमाणे होती : ही दोन्ही चित्रे जवळजवळ होती. एक चित्र जे.सी. डालमन याने काढलेले होते. साधु ऍंथनीचा मोह हे त्या चित्राचे नाव. साधु ऍंथनी गुडघे टेकून प्रार्थना करीत आहे. त्याच्या पाठीमागे नग्न स्त्री उभी आहे. दुसरेही काही प्राणी तेथे काढलेले आहेत. या चित्रकाराला त्या चित्रातील नग्न स्त्री फार आवडत होती असे दिसते. ऍंथनीकडे त्याचे फारसे लक्ष नव्हते. त्याने आपली कला त्या स्त्रीत ओतली होती. ऍंथनीच्या मोहाचा प्रसंग पापमय व भयानक असे चित्रकाराला वाटत नाही. तो मोह त्याला अंतरी सुखमय वाटत असावा. त्या चित्रांत कला असलीच तर ती ओंगळ कला आहे. भावनास्पर्श झालाच तर तो असत् भावनेचा होईल. त्या चित्राजवळच त्याच्या शेजारीच दुसरे एक चित्र होते. लँग्ले या चित्रकाराने ते काढले होते. एका बाईने रस्त्यात भीक मागणा-या मुलाला दयेने बोलावले आहे. तो मुलगा त्या बाकावर बसला आहे. त्याने आपले उघडे पाय लाजेने हळूच बाकाखाली लपविले होते. तो मुलगा त्या बाईने दिलेले खात असतो. ती बाई ''याला आणखी लागेल का'' हे जाणण्यासाठी त्याच्या तोंडाकडे कनवाळूपणाने व जिज्ञासेने पहात आहे. एक सात वर्षांची मुलगी आपल्या बाहूंवर मान टेकून त्या मुलाकडे सारखी गंभीरपणे पहात आहे. त्या भुकेल्या मुलावरून आपली दृष्टी काढून घेऊ नये असे जणू त्या मुलीला वाटते. जगातील दारिद्रय म्हणजे काय, जगातील असमानता, विषमता म्हणजे काय, याचे प्रथम दर्शन जणू तिला होत होते. आपल्याला ना कसली वाण, ना कसली ददात, ना चिंता; खायला आहे प्यायला आहे, ल्यायला आहे राहायला आहे; आणि हा मुलगा असा का? त्याचे आईबाप त्याला देत नाहीत का? त्याच्या पायांत बूट नाहीत, पोटांत अन्न नाही, अनवाणी व उपाशी पोटी तो वणवण करीत आहे-असे का व्हावे-असा प्रश्न जणू  ती मुलगी स्वत:ला करीत आहे असे वाटते. तिला दु:ख होत आहे व आनंदही होत आहे. त्या मुलाच्या स्थितीबद्दल दु:ख होत आहे, परंतु त्याला पाहून तिला आनंद होत आहे. तिला तो मुलगा आवडतो व तिला चांगुलपणाही आवडतो. तिला सद्भाव आवडतो व तो मुलगाही जणू आवडतो. तिला भाऊ का हवा होता? काय होती तिची भावना? संमिश्र तिची भावना असेल. लहान मुलीची संमिश्र भावना! ते चित्र पाहून असे वाटते की चित्रकाराला ती मुलगी आवडत असावी. मोठी गोड प्रेमळ मुलगी! हा चित्रकार फारसा काही प्रसिध्द नाही. परंतु त्याचे ते चित्र फार सुंदर होते, ख-या सत्कलेचा तो नमुना होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel