''देत नाहीस? तुझा बाप देईल. बघतो कशी देत नाहीस ती. तुझी बोटएवढाली चामडी लोळवी...'' तो ओरडतो. तिला जमिनीवर आपटतो. तिला लाथा मारतो. ''टाक माझे पैसे.'' पुन:पुन्हा मारताना म्हणतो. ती काहीएक बोलत नाही. तो फार संतापतो. तो तिचा गळा दाबू पाहतो. डोक्याला जखम होऊन भळभळ रक्त येत असते. ते रक्त त्याच्या दृष्टीस पडते. कपाळार, गालांवर ते रक्त त्याला दिसते. तो थांबतो. तो गंभीर होतो. तिला सोडून देतो. तो थरथरत असतो. कसेतरी हेलखावे खात तो बिछान्यावर जाऊन पडतो.

असा हा प्रसंग यथार्थ व शहारे आणणारा आहे; फार घोर व भयंकर आहे. मोठा दु:खप्रद आहे तो. परंतु ग्रंथकाराचे दोघांवर प्रेम आहे. एक लहानसाच उल्लेख तो करतो. या उल्लेखाने एकदम अंधारांत प्रकाश येतो; निराशेत आशा येते; मरणांत जीवन येते. त्या उल्लेखाने वाचकाला त्या दोघांची कीव येते, करुणा येते, वाचकही त्या दोघांवर प्रेम करू लागतो, त्याला ती दोघे आवडू लागतात. त्या नवराबायकोचे वर्तन प्रथम क्रूरपणाचे, आडदांडपणाचे व असभ्य वाटते. परंतु त्या एका उल्लेखाने एकदम सहृदयता उचंबळून येते. ती घायाळ झालेली बायको उठते. ती कपाळावरचे रक्त पुसते. आपले केस वगैरे ती सावरते, तिचे आंग दुखत असते पण ती उठते. त्या खोलीत सारी मुले रडत असतात. ती त्यांच्याजवळ जाते, त्यांना जवळ घेते, त्यांचे डोळे पुसते. त्यांना शांत करते. ''उगी रडू नका. त्यांना झोप लागली आहे. तुम्हीसुध्दा अजून जरा झोपा. उजाडले नाही अगदी.'' असे ती त्यांना म्हणते. मुले पुन्हा अंथरुणांत गुरगुटी करून पडतात, ती त्यांना थोपटते. नंतर ती हळूच उठते व नवरा कोठे पडलेला आहे ते पाहाते; तो आपल्या अंथरुणावरच कसातरी पडलेला असतो. ती त्याच्याजवळ जाते, त्याचे डोके हळूच उचलून उशीवर ठेवते, त्याच्या अंगावर नीट पांघरूण घालते. मग ती आपले नेसण वगैरे नीट करते, तिचे केस तेथे पडलेले असतात. ते ती उचलून घेते.''

भाराभर पानांची संभाषणे दिली असती, तरी पत्नीच्या या शेवटच्या वर्तनांत जे कांही आहे ते दाखविता आले नसते. ह्या गोष्टी बोलून दाखविता येत नसतात. हे वर्णन वाचून दांपत्यनीतीची जाणीव, पतिपत्नीच्या कर्तव्याची जाणीव एकदम वाचकाच्या मनांत उत्पन्न होते. परंपरेने जो पतिपत्नीधर्म प्राप्त झालेला असतो, त्याचे दर्शन होते. ती पत्नी एकदम निश्चय करते व तो अंमलात आणते. निश्चयात्मिका कर्तव्यबुध्दीचा विजय होतो, पैसे न देण्याचाही निश्चय ती टिकविते, ते पैसे तिला नको होते. ते कुटुंबासाठी पाहिजे होते. त्या निश्चयाचाही विजय आहे. कर्तव्य व प्रेम या दोघांचा विजय आहे. या प्रसंगांत पतीचा अपराध आहे, परंतु येथे त्याला क्षमाही आहे. ते दुष्ट मारणे ती एका क्षणांत विसरते. पतीबद्दल कदाचित प्रेम नसेल आता मनांत, परंतु कीव आहे, करुणा आहे. तिला प्रेम न वाटले तरी दया वाटते. तिने एकेकाळी त्याच्यावर प्रेम केलेले असते व त्यानेही केलेले असते. त्या प्रेमाची स्मृति तर आहेच. त्या प्रेमाचा वास तिच्या हृदयांत आहेच. कसे झाले तरी तो तिचा होता व ती त्याची होती. तिच्या मुलांचा तो पिता होता. त्याचे डोके ती उशीवर ठेवते. किती सहृदय उल्लेख. या उल्लेखाने नवराबायकोच्या जीवनातील आंतरस्वरूप कसे मनोहरपणे दिसून येते. या एकाच जोडप्याच्या आंतरिक जीवनावर ह्या उल्लेखाने प्रकाश पडतो असे नाही तर जी कोटयवधी कुटुंबे खेडयापाडयांतून आहेत, त्यांच्याही जीवनावर याने प्रकाश पडतो. या एका उल्लेखाने श्रमाने चिरडून जाणारी जी लाखो कुटुंबे, त्यांच्याबद्दल प्रेम व आस्था, कळकळ व आदर वाचकाच्या हृदयांत जागृत होतात. ही अशी गोड माणसे, मोकळया वृत्तीची, शरीराने व मनाने धडधाकट, गुण्यागोविंदाने प्रेममय व क्षमामय जीवन चालविण्यास लायक अशा माणसांची आज समाजांत इतकी उपेक्षा का व्हावी? ही सोन्यासारखी माणसे श्रमभाराखाली का चिरडावी, अज्ञानांत खितपत का पडावीत? वाचकाच्या मनांत हा विचार येतो व तो गंभीर होतो.

या कादंबरीतील प्रत्येक प्रकरणांत असे सहृदय प्रसंग आहेत. ज्या कलावानाच्या हृदयांत कळकळ व प्रेम आहे त्याच्याच लिहिण्यांत असे खरे सहृदय व कलात्मक प्रसंग दिसणार.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel