येथे मन्सारामासारखे वीर झाले. देवी अहिल्याबाईचें खानदेशांत राज्य. शिरपूरजवळील खेड्यांत पाणी नव्हते म्हणून तेथे अहिल्यादेवी मुक्काम करून राहिली, पाणी लागेपर्यंत राहिली; आणि मुसळासारखा झरा लागला. जणुं देवी अहिल्येच्या ह-दयांतील अनंत करुणा व धर्मताच तेथे प्रकट झाली! ज्या तव्यावर अहिल्याबाई भाकरी भाजी तो तवा तेथे साक्ष देत आहे!

खानदेशांतील इतिहास अनंत आहे. खानदेश म्हणजे अनेक क्रांत्यांचे स्थान. येथे शेकडो पडक्या राजधान्या आहेत. कोठे नाणी सापडतात, कोठे मूर्ति सापडतात. खानदेशचा इतिहास अद्यापि जमवावयाचा आहे. ठायी ठायी तो पडलेला आहे. झुलत्या मनो-यांतून, हत्तीच्या पोटातून तो बोलून राहिला आहे. मडगावचा लाडकुबाईचा भव्य वाडा शनिवार वाड्यातून भव्य होता असे इतिहासवेत्ते तात्यासाहेब केळकर म्हणाले! बांडे, देशमुख, कदम, पवार शेकडो सरदार येथे चमकले. मल्हारीचा जो मल्हाराव झाला तो खानदेशचाच. तळोद्याजवळ मामच्या शेतांत काठी घेऊन बाजीरावाच्या घोड्यास त्याने अडविले! येथेच ते झाड ज्याच्या खाली मल्हारी झोपला असता, त्याच्या तोंडावर सापाने फणा धरिला! किती या खानदेशच्या कथा, रोमांचकारी कथा! आणि महर्षी सेनापति बापटांना अज्ञातवासांत खानदेशनें सांभाळले!

खानदेश म्हणजे हिंदुस्थानचे मीलनस्थान. येथे हिंदी, गुजराती, मराठी भाषा मिसळल्या. येथे रजपुत आले. काठेवाडांतून लोक आले. शेकडो जाती जमाती या खानदेशांत. सारे गुण्यागोविंदाने नांदू लागले.

खानदेशांतील संपत्तीला सीमा नव्हती. पहिले बाजीराव नंदुरवारबर स्वारी करणार तर व्यापारी म्हणाले, “स्वारी कशाला? काय पाहिजे ते कळवा.” बाजीरावाने एक लाख रुपये मागितले. व्यापा-यांनी एका शिक्क्याचे रुपये खटा-यांतून भरले व बाजीरावांकडे पाठवले. चिठ्ठी लिहिली की, “एक लाख मोजून घ्या, बाकी परत करा!” हत्ती विकायला आले तर अघोल्यांनी पैसे मोजीत व हत्तीची किंमत देत.

गुणाच्या डोळ्यांसमोर हा सारा इतिहास उङा राहिला. पूर्वीचा इतिहास! तेजस्वी इतिहास! पुन्हा नाही का मी खानदेशांत येणार? पद्मालयाच्या तळ्यांत डुंबणार? झाशीच्या राणीचे पारोळे पाहणार—ज्या पारोळच्या विणकरांची कला सर्वत्र गाजली होती! इकडून पहावे तो एक छटा, तिकडून पहावे तर दुसरी छटा! अशी अपूर्व विणाई! नाही का ही ठिकाणे तो पुन्हा पाहणार!

नवीन इतिहास निर्मायला तो नाही का खानदेशांत येणार? खानदेश नवीन इतिहास निर्मीत आहे! महाराष्ट्रांत प्रथम खानदेशांतच महात्माजींच्या पद्धतीचे आश्रम सुरू झाले. प्रथम खानदेसांतच खादी निर्माण होऊ लागली. खांद्यावर खादी घेऊन तरुण त्यागी सेवक खानदेशांतूत हिंडू लागले. झाडू घेऊन खेडी साफ करू लागले. खानदेशांतीलच स्वयंसेवक ३० साली आधी महाराष्ट्रभर गेले. घणसोळीला गेले. रत्नागिरीकडे गेले. हिंदुमुस्लिम ऐक्याची मूर्ति ते प्रेमसिंधु मीर शुक्रल्ला रत्नागिरी जिल्ह्याला वेड लावते झाले. त्यांची आठवण तिकडे अद्याप सुवास देत आहे! खानदेशांतून जितकी लहान मुले तुरुंगात गेली, तितकी कोणत्या जिल्ह्यांतून गेली असतील? तो १२ वर्षांचा मधु मदाने धुळे तुरुंगात होता! कशी तो उत्तरे देई, किती तेजस्वी! तो सुमान, तो प्रल्हाद, तो शिवराम, तो जयराम! गव्हर्नरला काळी निशाणे दाखविण्यासाठी तो शरीराने तीन फूट उंच परंतु मनाने हिमालयाच्या हिमतीचा नांदेडचा शिवराम नाशिकला पायी गेला. आणि यावल येथे त्याला साम्राज्य सरकारने फटके मारले! खानदेशांतील मुलांनी वंदे मातरम् व महात्मा गांधी की जय असा घोष करीत फटके खाल्ले! आणि खानदेशातील भगिनी! काँग्रेसच्या प्रचारासाठी त्यांनी घरेदारे सोडली. काँग्रेसचा प्रचार म्हणजे जणुं पवित्र यात्रा. पायांत काही न घालता त्या उन्हातून हिंडत, थंडीतून हिंडत! ओठावर देशभक्तीची गाणी, खांद्यावर राष्ट्रपताका! मासिक झेंडावंदनासाठी भगिनी गीताबाईसारख्या शेतकरी स्त्रिया चिखलातून, पावसांतून सहा सहा कोस जात! आणि मुळशीच्या सत्याग्रहांत खानदेशांतील स्त्रिया गेल्या होत्या!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel