“आणि त्या तुरुंगांतून दुस-या तुरुंगांत स्वराज्यवाल्यांची तुकडी पाठवायची होती. त्यांत त्या मुलाचाहि नंबर होता. त्याची अंधारी संपली. त्या तुरुंगांतील तो त्याचा शेवटचा शब्द होता. तो मुलगा त्या म्हाता-याला भेटला. म्हाता-यानं त्याला कुरवाळंल, इतर कैदी गहिंवरले.

“बेटा, ही तसबी घे तुला.”

“नको बुढ्ढेबाबा, तुमच्याजवळच ती असूं दे. अल्लाचं नांव घ्या. तुमच्या वेळ जाईल. ती माळ तुमची दोस्त.”

“तुला मी काय देऊ दुसरं ?”

“तुम्हीं मला पित्याचं प्रेम दिलं. आणखी काय द्यायचं राहिलं ? मी सुटलों म्हणजे तुम्हांला भेटायला येईन. तुम्हांला साबण आणीन, दंतमंजन आणीन.”

“किती तरी वर्षांत माझी कोणाशी भेट नाहीं.”

“मी येईन हो.”

“तो मुलगा गेला. त्या दिवसापासून म्हातारा खिन्न झाला. तो आजारी पडला. त्याला दवाखान्यांत ठेवण्यांत आलं. तिथं तो म्हातारा त्या मुलाची आठवण करीत करीत एके दिवशीं देवाघरीं गेला. सरकारी बगीच्यांत त्याला पुरण्यांत आलं. किती तरी अनाथांची माती त्या बगीच्यांत पडली असेल. तेथील फुलाफळांना त्यांतून तजेला मिळत असेल, कोमलता व सरसता मिळत असेल.

“आणि तो मुलगा सुटल्यावर पुन्हां पकडला गेला. त्यामुळे तो लौकर भेटायला आला नाहीं. आणि मग एके दिवशीं आला. साबण, दंतमंजन घेऊन आला. परंतु तो म्हातारा मेल्याचं त्याला कळलं. तो मुलगा स्तब्ध उभा राहिला.

“दवाखान्यांत जिथं बुढ्ढेबाबा मेला, तिथं क्षणभर मला जाऊं देतां का ?” त्या मुलानं विचारलं.

“जा.” परवानगी मिळाली.

एका शिपायाबरोबर तो मुलगा दवाखान्यांत गेला. त्या म्हाता-याची खाट होती, तिथं तो उभा राहिला. त्यानं प्रणाम केला. त्याच्या डोळयांतून तिथं अश्रु गळले.

आई, अशा हो कथा. आतां एक गंमत सांगूं. आम्ही स्वराज्यवाले व क्रिमिनल त्या त्या कामांच्या जागीं एके ठिकाणींच जेवायला बसत असूं. जेवतांना जरा मोकळेपणा असे.

“एक कैदी एकदम उठे व म्हणे, “हा पाहा प्रेमवीर. प्रेमाच्या सट्टयांत तीन वर्षांची सजा खाणारा हा प्रेमवीर. प्रेम प्रेम ! प्रेमके लिये भी सजा ! अफसोस की बात है.”

“दुसरा एक कैदी स्वत:जवळच मोठयानं म्हणे, “कोणत्या रे मॅजिस्ट्रेटनं तुला सजा दिली ? होता तरी कोण तो ?”

“तिसरा हें ऐकून म्हणे, “मॅजिस्ट्रेटना अधिकार देण्यापूर्वी तुरुंगांतील शिक्षांची पूर्ण माहिती असायला हवी. तुरुंगांतील कांजी, दंडाबिडी, हातबेडी, खडीबेडी, आडाबेडी, गोणपाटी कपडे, फटके, सर्व शिक्षाहि त्यांना पाहायला मिळाल्या पाहिजेत.”

“आई, त्या कैद्यांच्या म्हणण्यांत का अर्थ नसे ? किती अर्थपूर्ण त्यांचे ते उद्गार असत ! तुरुंगांत मीं खूप पाहिलं, खूप ऐकलं. अनुभव मिळाला; जीवन संतुष्ट झालं. “

अशा गोष्टी चालल्या होत्या. शेजारच्या कुठल्या तरी घडयाळांत दोनाचे ठोके पडले.

“दादा, दोन वाजले !” रंगा म्हणाला.

“निजा आतां.” आई म्हणाली.

मित्र गेले. कल्याण व रंगा निघाले.

आणि दुस-या दिवशीं कल्याण संध्येकडे जायला निघाला. पुण्याला शिकावयास जाण्यापूर्वी तो संध्येला भेटला होता. त्या गोष्टीला चार वर्षे होऊन गेलीं होतीं. कल्याण आतां वीस-एकवीस वर्षांचा होता. संध्या अठरा वर्षांची. थोडी अधिकच. दोघें एकमेकांना भेटायला उत्सुक होतीं. कल्याणच्या मुखावर आज एक प्रकारची मधुरता व कोमलता फुलली होती. तो गाणीं गुणगुणत येत होता.

संध्येचें घर त्याला माहीत नव्हतें. विचारीत, विचारीत तो आला. सकाळची नवाची वेळ. शरद् व अनु शाळेंत गेलीं होतीं. संध्या कांहींतरी वाचीत होती. आई विहिरीवर होती. दार लोटलेलें होतें. कल्याणनें दारावर टक्टक् केलें.

“कोण आहे ? आलें हां” असें म्हणून संध्या आली. तों दारांत कोण ? कल्याण तेथें उभा होता. दोघें एकमेकांकडे पाहात राहिलीं. कोणी बोलेना. कोणाला बोलवेना.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel