कल्याण राहिला. दुपारचीं जेवणें झालीं. संध्या नि कल्याण विहिरीवर गेलीं होतीं. सभोंवती केळी होत्या. जवळच विशाल आम्रवृक्ष होता. त्यावर कोकिळा कुहू करीत होती.

“संध्ये, ठरलं ना एकदांचं ?”

“हो.”

“तुझा कल्याण गरीब आहे. साधं लग्न.”

“तुझं श्रीमंत जीवन मला मिळणार. आणखी काय हवं ? तुझं प्रेम पृथ्वीमोलाचं आहे. कल्याण, संध्या संपत्तीची पुजारीण
नाहीं. आणि लग्न लागल्यावर बरोबर लगेच मला ने. मी आतां तुझ्याशिवाय राहणार नाहीं. तुझ्याशिवाय मी जगूं शकणार नाहीं. सुखांत वा दु:खांत आतां एकत्र राहूं.”

“होय हो, संध्ये.”

“तूं मला लग्नांत काय देणार ?”

“काय देऊं ? तुला सुंदर लुगडीं घ्यायलाहि माझ्याजवळ पैसे नाहींत. कुठून आणूं कुडीं, कुठून आणूं आंगठी ? कुठून आणूं गळयांत घालायला साज, हातांत घालायला सोन्याच्या बांगडया.”

“कल्याण, मीं सहज विचारलं. तुझं प्रेम दे. तुझ्या प्रेमसमुद्रांत मी डुंबत राहीन. कधीं बुडी मारीन, कधीं लाटांशीं खेळेन.”

“संध्ये, तुला द्यायला एक पुस्तक मीं आणलं आहे.”

“कोणतं रे ?”

“जगांतील क्रांतिकारक स्त्रिया.”

“मी तें वाचीन. कल्याण, मी होईन का रे क्रांतिकारक ? तुला शोभेशी मी होईन का ? मी तुला धीर देईन, प्रेम देईन. मी स्वत: क्रांतिकारक न झालें, तरी तुझ्या क्रांतीच्या आड तरी येणार नाहीं.”

संध्या जरा खिन्न झाली. परंतु पुन्हां प्रेमळपणा तोंडावर फुलला. कल्याणच्या केसांवरून तिनें हात फिरवला. दोघांनीं एकमेकांकडे पाहिलें. संपूर्णपणें पाहिलें.

“डोक्याला रे काय लागलं, राजा ?”

“तो एक दु:खद इतिहास आहे.”

“सांग मला.”

कल्याणनें पुण्याची ती हकीगत सांगितली. थोडा वेळ थांबून तो म्हणाला, “संध्ये, ती मुलगी मर्च्छित पडली तरी तिनं झेंडा सोडला नाहीं. तूं असं दाखवशील शौर्य-धैर्य ?”

“तिच्या हातांत कोणता झेंडा होता ?”

“तिरंगी. परंतु आपला आहे लाल.”

“तुम्ही का तिरंगी झेंडा मानीत नाहीं ?”

“आधीं लाल मानतों, मग तिरंगी.”

“परंतु आधीं स्वदेशाचा नको का मानायला ?”

“संध्ये, श्रमणा-याला स्वदेश नसतो. पुढं तुला सारं समजेल.”

“कल्याण, झेंडा हातीं घेऊन निर्भयपणं लाठीमारांत वा गोळीबारांत संध्या उभी राहील कीं नाहीं तें काय सांगूं ? परंतु अशा धुमश्चक्रींत घुसणारा झुंजार वीर मला जीवनाचा सोबती मिळणार आहे, यांतच मला कृतार्थता वाटत आहे.”

संध्येनें हळुवारपणानें त्या जखमेवरून हात फिरविला. थोडया वेळानें दोघें वर गेलीं. कल्याण निरोप घेऊन आपल्या सुपाणी गांवीं निघून गेला.

एके दिवशी लग्नाच्या गाडया निघाल्या. आमराईजवळ एकत्र होऊन निघाल्या. परंतु वाटेंत मुसळधार पाऊस सुरू झाला. कांहीं गाडया पुढें गेल्या. कांहीं मागें राहिल्या. नवरीची नि नवरदेवाची गाडी पुढे गेली. त्या गाडयांचे बैल चांगले होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel