आणि हरणीच्या लग्नाचा दिवस ठरला. लग्नाची तयारी करण्याची जरूरच नव्हती. बाळच्या आईनें हरणीला एक नवीन सुंदरसें पातळ घेऊन दिलें. विश्वास आपल्या एका मित्राचें नवीन धोतर नेसला. विश्वास व हरणी गाडींतून विश्वासच्या घरीं गेलीं. वडिलांनी वधूवरांचें स्वागत केलें. भटजी आले होते. हरणी व विश्वास यांना फुलांच्या मुंडावळया बांधण्यांत आल्या. विश्वासच्या तोंडावर आज सौम्य तेज होतें. हरणीचें तोंड रक्त कमळाप्रमाणें दिसत होतें. विश्वासचे कांहीं मित्र आले होते. त्याच्या वडिलांनीं कांहीं मंडळींना बोलावलें होतें. विश्वासच्या आईनें शेजारच्या बायकांना बोलावलें होतें. विश्वास लहानपणीं त्यांनीं पाहिलेला. दुधें काढणारा व वांटणारा विश्वास. तो आतां मोठा झाला होता, उंच झाला होता. त्या दोघांकडे आलेल्या बायका कौतुकांनें बघत होत्या.

रंगा, लक्ष्मण, सदोबा वगैरे मंडळी होती. प्रभुहि होता. एका बाजूला भाईजी बसले होते. मंत्र झाले; मंगळाष्टकेंहि सौम्य आवाजांत झालीं; आणि विश्वास व हरणी यांनीं परस्परांना माळा घातल्या. सर्वांना आनंद झाला. साखर वाटण्यांत आली. मंडळी गेली. विश्वासच्या वडिलांना खूप आनंद झाला होता. मुलगा शेवटीं माझ्याकडे आला, माझें लग्न तुम्ही लावा असें म्हणाला, यांत जणूं त्यांचा विजय होता. त्यांना एक प्रकारचें समाधान वाटत होतें. माझ्या मुलाचें लग्न मीं लावलें असें त्यांना अभिमानानें सांगतां आलें असतें. विधिपुरस्सर समंत्र लग्न; कोठें सरकारी कचेरींत नाहीं. हेंहि एक त्या जुन्या मनाला समाधान होतें. घरांतील तें पहिलें मंगल कार्य होतें.

भाईजींजवळ ते बोलत बसले.

“तुमचं विश्वासवर प्रेम आहे. विश्वास सारं सांगत होता. परवां आला होता तेव्हां. तुमच्यासारखीं माणसं त्याला लाभलीं, हें त्याचं भाग्य होय. तुम्ही आज इथं आलेत, मला आनंद झाला. नाहीं तर आमच्या घरीं तुम्ही कशाला येतेत !” वडील म्हणाले.

“तुमचा विश्वास उत्साही, ध्येयवादी आहे. कष्टाळु आहे. जे जे ध्येयासाठीं, मोठया ध्येयासाठीं, जातिधर्मनिरपेक्ष अशा मानवी ध्येयासाठीं धडपडतात, त्यांच्याबद्दल मला नकळत साहजिक आपलेपणा वाटतो. लोहचुंबकाप्रमाणं असे कार्यकर्ते मला ओढून घेतात व मी त्यांचा जणूं बंदा गुलाम होतों. असो. विश्वास व हरणी यांवर तुमची कृपादृष्टि असूं द्या.” भाईजींनीं सांगितलें.

“अहो, ती आहेच. विश्वास दूर होता. घरीं येत नव्हता; तरी त्याच्याविषयीं मला थोडं का वाटे ? तो चांगलं बोलतो असं लोक म्हणतं. एखादे वेळ मलाहि वाटे, कीं त्याचं भाषण ऐकायला जावं. परंतु अभिमान आड येई. वाटेंतून जातांना एखाद वेळेस आम्ही समोरासमोरून येत असूं. तर एकमेकांकडे न पाहतां आम्ही जरा लांबूनच निघून जात असूं; असं असलं तरी मूळची माया का नाहींशी होईल ? शेवटीं आंतडं आंतडयाला ओढतंच; आणि खरं सांगूं का, आज मला एक प्रकारची कृतार्थता वाटत आहे. हरणीचे वडील आज असते, तर त्यांना किती आनंद झाला असता ! “आमची एक तरी मुलगी तुमच्याकडे देऊंच असं ते नेहमीं म्हणायचे” “असें म्हणतां म्हणतां विश्वासच्या वडिलांचे डोळे भरून आले. विश्वासचे कठोर वडीलहि रडूं शकतात एकूण !

विश्वास व हरणी सर्वांचे आशीर्वाद घेत होतीं. विश्वासच्या आईला परम आनंद झाला होता. तिनेंच विश्वासला वाढविलें होतें. तिनें त्याला लहानाचें मोठें केलें होतें; तीच त्याला सदैव जपी. तीच त्याच्यावर सदैव मायेचें पांघरूण घाली; आणि विश्वास घरांतून गेल्यावरहि ती त्याच्याकडे कोणाला नकळत दूध पाठवी, कधीं आंबे पाठवी. विश्वासची आठवण येऊन ती रडायची. त्यानें खाल्लें असेल का, तो कोठें झोंपला असेल, त्याची प्रकृति कशी असेल, किती तरी गोष्टी तिच्या मनांत यावयाच्या. विश्वासचेंहि तिच्यावर फार प्रेम होतें. विश्वास आईजवळ जरा बसला. तिनें त्याच्या पाठीवरून हात फिरविला. विश्वास व हरणी यांच्या तोंडांत तिनें साखर घातली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel