तुरुंगातील काळ : कर्मप्रेरणा

तुरुंगात काळही आपले स्वरूप बदलतो.  तेथे वर्तमानकाळ सद्य:काळ जणू नसतोच.  मृत अशा भूतकाळापासून अलग करणारी भावना संवेदना तेथे नसतेच.  धडपडणार्‍या, जगणार्‍या, मरणार्‍या त्या तुरुंगाबाहेरच्या जगाची जी बातमी समजते ती सुध्दा स्थिर, निश्चल असा भूतकाळातला खंड, एक पडलेले स्वप्न भासते.  बाहेरचा परिस्थितिसापेक्ष काळ जणू उतरतच नाही; आणि स्वत:ची आंतरिक व्यक्तिनिष्ठ अशी काळाची कल्पनाही तेवढीशी तीव्र नसते.  जेव्हा कधी विचारशक्ती वर्तमानकाळातून स्वत:ला बाहेर खेचून भूतकाळात किंवा भविष्यकाळात शिरते, तेव्हाच एक प्रकारचा यथार्थ सत्यमय असा अनुभव येतो.  तो फ्रेंच समाजशास्त्रज्ञ ऑगस्ट कॉम्टे म्हणतो त्याप्रमाणे आपण मृतांचे जीवन जगतो.  स्वत:च्या भूतकाळात घुसून तेथे रमतो.  विशेषत: तुरुंगात हा अनुभव येतो.  पिंजर्‍यात कोंडून भुकेल्या झालेल्या भावनांना भूतकाळात नेऊन सोडून त्या आठवणी किंवा भविष्यकाळात नेऊन तेथे कल्पनाचित्रांचा थोडाफार चारा घालून त्यांना कसे तरी जगवायचा प्रयत्न चालू ठेवतो.

भूतकाळात एक प्रकारची निश्चलता, एक प्रकारचे चीरजीवन असते.  भूतकाळ बदलत नाही.  एखादे रंगचित्र, एखादा संगमरवरी किंवा काशाचा पुतळा असावा, असे चिरशाश्वत रूप भूतकाळाला असते.  चालू घडीच्या वादळाचा, उत्पन्नाचा, घडामोडीचा त्याच्यावर परिणाम होत नाही.  धीर गंभीर अविचल असा तो भूतकाळ प्रशांतपणे समोर उभा असतो आणि आपल्या त्रस्त आत्म्याला, प्रक्षुब्ध अस्वस्थ मनाला इकडे माझ्या समाधीच्या गुहेत या अशी हाक मारतो.  तेथे शांती असते, सुरक्षितता असते.  तेथे आध्यात्मिकतेचाही थोडा सुगंध कोणाला केव्हा केव्हा मिळतो.

परंतु चालू तंटे नि भानगडी चालत असलेल्या या वर्तमानकाळाला त्या भूतकाळाशी जोडून अखंड सांधणारे जिवंत दुवे जर आपल्याला सापडले नाहीत, तर तो भूतकाळ मेलेला राहतो.  जिवंत राहात नाही.  ज्या भूतकाळाचा वर्तमानाशी संबंध नाही त्यात रमणे म्हणजे कलेसाठी कला म्हणतात त्याचप्रमाणे होईल.  जीवनाचा खरा आत्मा क्रियाशीलतेत आहे.  जेथे धडपड आहे, काही तरी करावे अशी उत्कट प्रेरणा आहे तेथे जीवन आहे.  ही प्रेरणा, ही भावना नसली तर आशा, उत्साह हळूहळू गळून जातील.  जीवनाच्या खालच्या पायरीवरचे पशुपक्ष्यांचे, वृक्षवनस्पतींचे जणू ते जगणे होईल.  हळूहळू आपण मृतवत, जडवत होऊ.  असून नसल्यासारखे—जिवंत असून मेल्यासारखे होऊ.  आपण भूतकाळाचे कैदी बनतो.  भूतकाळातील जडता, स्थाणुता आपल्यालाही चिकटते.  तुरुंगात कार्याला मोकळीक नाही.  रोजच्या ठरीव क्रमाचे आपण गुलाम होतो आणि म्हणून मनाला सहज निसटून जाणे सोपे जाते.

तथापि भूतकाळ सदैव आपल्याबरोबर असतोच.  जे काही आपल्याजवळ आहे, आपण जे काही आज आहोत तो सर्व भूतकाळाचाच परिणाम.  भूतकाळानेच आपणास बनविले आहे, आपण आंतर्बाह्य त्यात बुडालेले आहोत.  भूतकाळाचे हे स्वरूप समजून न घेणे, आपणामध्ये भूतकाळ प्रत्यक्ष जिवंत आहे, जगत आहे ही अनुभूती न येणे म्हणजे वर्तमानही न समजणे होय.  भूताची वर्तमानाशी सांगड घालून त्याला भविष्याकडे पुढे नेणे, जेथे भूताची वर्तमानकाळाशी सांगड घालता येणार नाही, तेथे तो झुगारून देणे, आणि या सर्वांतून विचारासाठी, कर्मासाठी प्राणमय, चैतन्यमय सामग्री निर्माण करणे, म्हणजेच जीवन होय.  कोणतेही जिवंत कार्य जीवनाच्या गाभ्यातून वर येते.  कर्माचा तो जो विवक्षित व मानसिक क्षण, त्याची तयारी सर्व दीर्घ असे गतजीवन करीत असते; व्यक्तीचेच नव्हे, तर तो ज्या जातिजमातीत, मानववंशात जन्मला, त्याचे जीवनही त्या विवक्षित क्षणासाठी तयारी करीत असते.  सगळ्या वांशिक स्मृती, वंशपरंपरागत झालेले परिणाम, भोवतालची परिस्थिती, संस्कार, शिक्षण अननुभूत आंतरिक प्रेरणा, विचार, स्वप्ने, लहानपणापासून केलेली कर्मे, करीत आलो ती कर्मे, या सर्वांचे मिळून एक विलक्षण व प्रचंड असे रसायन बनते आणि या रसायनाचा जोर आणखी पुढे नवे नवे काही कार्य करायला धक्के मारीत राहतो.  हे नवे कार्य पुन्हा पुढच्या भविष्याला आकार देणारे आणखी एक कारण बनते.  अशा रीतीने मागची कर्मे पुढच्या कर्मांना आकार देत असतात व त्याचे स्वरूप ठरवीत असतात; भविष्याचे सारेच स्वरूप ते निश्चित करतात असे जरी नसले तरी बर्‍याचशा अंशी स्वरूप निश्चित करतात.  परंतु असे असले तरी याला केवळ अटळ भविष्य असे म्हणता येणार नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel