श्री. अरविंद घोष यांनी चालू क्षणाला शुध्द 'कौमार्याचा क्षण' असे म्हटले आहे.  दीर्घ काल घ्या किंवा जीवन घ्या. 'क्षुरस्य धारा' सारखी ही चालू क्षणाची धारा भूतकालाला भविष्यापासून तोडून टाकते व पाहता पाहता नाहीशी होते. श्री. अरविंदांनी दिलेली उपमा सुंदर आहे. परंतु त्यांच्या म्हणण्याचा भाव काय ?  भविष्याच्या पडद्यातून आलेला हा विशुध्द कौमार्याचा चालू क्षण आपल्याशी संबंध होताच वापरलेला शिक्का होऊन जातो.  त्या पवित्र क्षणाला का आपण अपवित्र केले ?  त्याचे पावित्र्य आपण का भंगून टाकले ? का तो येणारा क्षणच तितका पवित्र नव्हता ? भूतकालीन सर्व कुकर्माशी सर्व सरमिसळीशी तोही बांधलेला नाही का ?  जोडलेला नाही का ? तत्त्वज्ञानात ज्याला कर्मस्वातंत्र्य म्हणतात त्या अर्थाने मनुष्य स्वतंत्र आहे, की त्याच्या कपाळी ठरलेले भविष्य अटळ आहे हे मला माहीत नाही.  भूतकालीन कर्मांचे भूत आपल्या मानगुटीस बसते व आपल्याला खेचीत लोटीत नेते हे पुष्कळसे खरे आहे. पुष्कळशा गोष्टी भूतकालीन घडामोडींनीच ठरून जातात.  कधी कधी माणसाला आंतरिक प्रेरणा, सहजस्फूर्ती यांचा अनुभव येतो. या प्रेरणेलाच कोणी कदाचित इच्छास्वातंत्र्य, कर्मस्वातंत्र्य म्हणतील.  परंतु ही अंत:प्रेरणाही दुसर्‍या शक्तींनी मर्यादित असते. शोपेनहारने म्हटले आहे, ''संकल्पाप्रमाणे मनुष्य कर्म करू शकेल.'' परंतु संकल्पशक्तीचा संकल्प त्याच्या हातात नाही. फक्त नियतिवाद जर आपण मानला, सारे पूर्वसंकल्पित आहे असे मानले तर त्याचे पर्यवसान कर्मशून्यतेत होईल, जिवंतपणी मृतवत असण्यास होईल; जीवनाविषयीची माझी जी बुध्दी आहे ती अशा पूर्वसंकल्पाविरुध्द बंड करून उठते.  परंतु माझी ही बंडखोरवृत्तीही पूर्वकर्मानुसारच असेल !

ज्यांचा उलगडा करता येत नाही, अशा तात्तिक व आध्यात्मिक प्रश्नांचा बोजा मी माझ्या बुध्दीवर सहसा घालीत नसतो.  तुरुंगात खूप वेळ स्तब्ध राहिलो म्हणजे असे विचार न कळत माझ्या मनात येतात.  कधी कधी तर कामात गढून गेलो असलो तरी असे विचार माझ्या मनात येतात; नाही असे नाही.  एखाद्या दु:खद प्रसंगी असे विचार मनात आले म्हणजे केवळ तटस्थपणे प्रसंग पाहत राहणार्‍याची वृत्ती बनते व मनाचे सांत्वन होते.  पण एकतर बहुतेक मी कामात गढलेला असतो, नाहीतर कामाच्या विचारात गुंग झालेला असतो.  प्रत्यक्ष कामात नसलो तर मी कल्पना करतो की, कामाची ही मी तयारी चालविली आहे.

नुसते काम नव्हे, तर एकीकडे सारखा विचार चालू असता, त्या विचाराच्या स्फूर्तीने त्या विचारातूनच कामाचा अखंड ओघ सुरू होतो.  अशा कार्याचा संदेश मला फार वर्षांपासून मिळालेला आहे, आणि जेव्हा क्वचितप्रसंगी विचार नि कर्म यांच्यातील परमैक्याचा मला अनुभव येतो, त्यांचे सुसंवादित्व व संपूर्ण मेळ यांचा अनुभव येतो, विचाराची कर्मात परिणती आणि कर्माचे पुन्हा त्या विचाराशी समरसत्व यांचे संपूर्ण ज्ञान होते, त्या वेळेस जीवनातील पूर्णतेचा क्षण मी अनुभवीत असतो.  त्या क्षणापुरता असा एक आत्मप्रत्यय घेतो की, काठोकाठ भरलेला जिवंतपणा व दैदीप्यमान चैतन्य असलेले जीवन जगतो आहे.  परंतु असे क्षण क्वचितच येतात.  ते दुर्लभ-अतिदुर्लभ असेच असतात.  पुष्कळ वेळा विचार कर्मापुढे धावतात तर कर्म विचाराला ओलांडून जाते.  दोहोंचा मेळ फारसा बसत नाही.  दोहोंना एका रेषत आणण्याची धडपड व्यर्थ जाते.  कित्येक वर्षांपूर्वी माझ्या जीवनात असा एक काळ येऊन गेला की, जेव्हा मी एक प्रकारच्या भावनामय समाधीत मग्न असे; मला व्यापून राहणार्‍या कार्याशी मीही तद्रूप होऊन जात असे.  परंतु माझ्या तारुण्यातील ते दिवस आता संपले.  नुसता बराच काळ लोटला आहे म्हणून नव्हे, तर दु:खदायक विचारांचा, अनुभवांचा महासागर मध्ये पसरला आहे, म्हणून ती पूर्वीची उत्साहाची भरती आज नाही.  माझी दुर्दमनीय आवेगवृत्ती आता थोडी शांत झाली आहे.  माझ्या भावना, माझ्या संवेदना यांवर आज माझा अधिक संयम आहे.  विचारांचा बोजा हा पुष्कळदा अडथळा वाटतो.  ज्या मनात एके काळी केवळ नि:शंकता असे तेथे आता शंका डोकावतात.  कदाचित हा वयोमानाचा परिणाम असेल, की आजच्या युगाची वा आजच्या घटकेचीच ही सर्वसामान्य वृत्ती आहे कोण जाणे !

आणि तरीही या घटकेला सुध्दा कर्माची हाक ऐकली की, माझ्या मनात कालवाकालव सुरू होते, थोडा वेळ विचारांशी झगडल्यावर पुन्हा मला तो आनंदाचा रमणीय आवेग अनुभवायची इच्छा असते.  तो आवेग धोक्यांना-संकटांना तोंड द्यायला धावतो, मृत्यू समोर आला तरी त्याचा उपहास करतो.  मरणाचा मला फारसा मोह नाही.  तरी त्याचे मला भय आहे असेही वाटत नाही.  जीवनाकडे पाठ फिरवावी, हे जीवनच नाही असे विचार मनाला पटत नाहीत.  जीवनावर माझे प्रेम आहे.  अजूनही मला त्याचे आकर्षण आहे, म्हणूनच तर माझ्यासभोवती अदृश्य असे अनंत अडथळे असले तरी माझ्या विशिष्ट वृत्तीप्रमाणे या जीवनाचा अनुभव घेण्यासाठी मी उभा असतो, धडपडतो.  परंतु जीवनाचा अनुभव घेण्याची माझी ही इच्छा मला जीवनाशी खेळावयास लावते, त्याच्याकडे डोकावून बघावयास लावते.  मी जीवनाचा गुलाम होऊ इच्छित नाही, आणि असे केल्यानेच आम्ही एकमेकांस अधिक ओळखू.  एकमेकांची अधिक किंमत करू.  मी वैमानिक व्हायला पाहिजे होते म्हणजे जेव्हा जीवन कंटाळवाणे वाटले असते, तेव्हा मी एकदम उड्डाण करू शकलो असतो.  मेघांच्या दाटीत घुसलो असतो आणि मग मनात म्हटले असते,

गेली इतकी वर्षे झरझर ।
जातिल पुढची तीहि भरभर ।
वेळ काढला व्यर्थ धरेवर ।
सर्व पाहिले पारखुनी तर ।
असे वाटते स्वैर फिरावे गुंगत या गगनात ।
असे जगावे असे मरावे करून यमावर मात ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel