मला या दृश्य जगाची, या चालू जीवनाची ओढ आहे.  दुसर्‍या जगाची, मरणोत्तर जीवनाची मला आवड नाही.  आत्मा म्हणून काही वस्तू आहे की नाही, मरणोत्तर जीवन असते का याविषयी मला काही माहिती नाही.  आणि हे प्रश्न जरी महत्त्वाचे असले तरी त्याचा मला काहीच त्रास होत नाही.  ज्या वातावरणात मी वाढलो, त्या वातावरणात आत्मा, पुनर्जन्म, कर्मसिध्दान्त, भविष्यकालीन जीवन इत्यादी गोष्टी गृहीतच धरण्यात आल्या होत्या.  माझ्यावरही त्यांचा परिणाम झालेला आहे, आणि या कल्पनांकडे माझाही कल धावतो.  मला या कल्पना आवडतात असे म्हटले तरी चालेल.  हे भौतिक शरीर नाश पावल्यावर आत्मा म्हणून काही वस्तू शिल्लक राहणे शक्य असेल; तसेच कार्यकारणात्मक कर्मसिध्दान्ताचा नियमही जीवनास लागू करण्यास प्रत्यवाय असायला नको.  पण जेव्हा आदिकारणाचा प्रश्न उपभवतो, तेव्हा अडचण पडते.  तसेच एकदा शरीर नाहीसे झाल्यावर आत्मा उरतो असे मानले म्हणजे पुनर्जन्म सिध्दान्तही तर्काला सोडून आहे असे वाटत नाही.

परंतु या व अशाच प्रकारच्या अनेक मीमांसा आणि नानाविध कल्पना यांच्याकडे माझा कल असला तरी त्यावर धर्म म्हणून माझी श्रध्दा नाही.  ज्यांच्याविषयी आपणास बिलकुल ज्ञान नाही अशा अज्ञात प्रदेशातील हे सारे बौध्दिक तर्क आहेत.  या काल्पनिक विचारांचा माझ्या जीवनावर परिणाम होत नाही.  म्हणून उद्या या कल्पना खोट्या ठरल्या काय किंवा खर्‍या ठरल्या काय माझ्यामध्ये काही फरक होणार आहे असे नाही.  प्रेतात्मविद्या, प्रेतात्म्यांचे तथाकथित आविष्कार आणि हे प्रयोग करणारी ती मंडळे हे सारे मला बावळटपणाचे वाटते.  जीवनोत्तर गूढे उकलून काढणे, अतींद्रिय प्रांतात संशोधन करणे, यासाठी असले उपाय अवलंबणे म्हणजे फाजील मूर्खपणा आहे.  एवढेच नव्हे, तर याहूनही काही वाईट त्यात आहे.  कारण जी माणसे फार भाबडी असतात, अतिश्रध्दाळू असतात, अशांच्या भावनांची ही प्रतारणा करण्यात येते.  मनाची अस्वस्थता जावी, दु:खापासून मुक्तता व्हावी असे वाटणार्‍या भोळ्या जीवांना हे प्रेतात्मविद्यावाले फसवतात.  अर्थात त्या प्रेतात्मविद्येच्या प्रयोगातही काही सत्यांश असेल, नाही असे मी म्हणत नाही.  परंतु ज्या रीतीने या प्रश्नांकडे बघण्यात येते, ती रीत चुकीची आहे; तसेच लहानसहान गोष्टींवरून, येथल्या तेथल्या चार पुराव्यांवरून निर्णय काढणे व सिध्दान्त काढणे हेही बरोबर नाही.

पुष्कळ वेळा या जगाकडे पाहात असताना माझे मन गूढतेने भरून जाते.  अज्ञात अशा शेकडो गंभीर गोष्टी आहेत असे मनात येते.  हे सर्व समजून घेतले पाहिजे.  माझ्या शक्यतेनुसार तसा प्रयत्न केला पाहिजे असे मनात येते.  या सर्व अज्ञात विश्वाशी एकरूप व्हावे आणि संपूर्णत: त्याची सहानुभूती घ्यावी असे मनात येते.  परंतु हे समजून घेण्याचा मार्ग म्हणजे विज्ञानाचा मार्ग, — इंद्रियगम्य, प्रत्यक्षावगम असा मार्ग.  अर्थात केवळ प्रत्यक्षावगमता अशी वस्तूच नाही, केवळ इंद्रियगम्य अशी वस्तूच नाही याची मला जाणीव आहे.  आपल्या सर्व अनुभवांत स्वत:ची व्यक्तीनिष्ठा असते.  केवळ वस्तुनिष्ठ असा अनुभव अशक्यच आहे.  असे असले तरीही आपल्या अनुभवात शक्य तितकी वस्तुनिष्ठ अशी वैज्ञानिक दृष्टी असावी, शास्त्रीय पध्दत असावी.

'गूढगहन' म्हणजे काय आहे याचे मला ज्ञान नाही.  मी त्या गूढगहनतेला ईश्वर हे नाव देत नाही.  कारण ज्या गोष्टींवर माझा विश्वास नाही, अशा गोष्टींनाही ईश्वर म्हणून मानण्यात येत असते; ईश्वर ही संज्ञा तेथे वापरण्यात येते.  एखाद्या देवतेची, साकार अशा एखाद्या सर्वश्रेष्ठ अज्ञात शक्तीची मी कल्पनाच करू शकत नाही.  किती तरी लोक असा एक सर्वसामर्थ्यसंपन्न सगुण साकार परमेश्वर मानतात याचे मला आश्चर्य वाटते.  सगुण साकार ईश्वराची, अशा व्यक्तिगत देवाची कल्पना मला कशीशीच वाटते.  अद्वैताची कल्पना माझ्या बुध्दीला थोडीफार तरी समजू शकते.  वेदान्तातील अध्दैत तत्त्वज्ञानाकडे मी ओढलाही जातो.  अर्थात त्यातील सारा गहन विचार, त्यातील सारा ब्रह्म-माया प्रकार मला कळला आहे असे म्हणण्याचे धाडस मी करीत नाही; आणि हेही खरे की, अशा तत्त्वांची केवळ बौध्दिक रीत्या गोडी चाखणे म्हणजे फारसे पुढे जाणे नव्हे, खरे ज्ञान होणेही नव्हे.  माझा या तत्त्वज्ञानाकडे ओढा असला तरी वेदान्त किंवा अशाच प्रकारची इतर दर्शने यांची मला एक प्रकारची भीती वाटते.  कारण अनंताच्या विस्तारातील त्यांचे हे संसार, हे विचाराचे विहार मला अस्पष्ट, अंधुक व अनिश्चित असे दिसतात.  याच्या उलट या दृश्य सृष्टीचे बहुरंगी, बहुरूपी, भरीव नटलेले स्वरूप पाहून मी तल्लीन होतो.  प्राचीन भारतीय किंवा प्राचीन ग्रीक विचारात सृष्टीत सगळीकडे देव भरला आहे या विचारात मला गोडी वाटते, ओळखीच्या जगात आलो असे वाटते.  अर्थात त्या विचारातील देवदेवतांची कल्पना तेवढी बाजूला सारायची.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel