ज्या वेळेस आम्हाला एकमेकांची अत्यंत आवश्यकता होती, ज्या वेळेस आम्ही एकमेकांच्या इतकी जवळ आलो होतो, त्याच वेळेस नेमक्या दोन-दोन वर्षांच्या या दोन दीर्घ शिक्षा आड आल्या.  तुरुंगातील ते जाता न जाणारे दिवसच्या दिवस मी विचार करीत बसे.  आशा वाटे की खात्रीने एकत्र येण्याचा योग येईल.  आणि ही वर्षे तिने कशी दवडली ?  तिची काय स्थिती होती ?  मी कल्पना करू शकेन, परंतु नक्की सांगता येणार नाही.  कारण तुरुंगात ज्या भेटीगाठी होत किंवा बाहेर जो थोडा वेळ मिळाला, त्या वेळेस आम्ही नेहमीप्रमाणे नसू.  स्वत:ची वेदना, स्वत:चे दु:ख दुसर्‍याला कळू नये म्हणून आम्ही दोघे वरपांगी हसत असू, आनंदी रहात असू.  जणू काही नाही असे दाखवून नित्याप्रमाणे वर्तत असू.  परंतु तिच्या मनाला शांती नव्हती ही गोष्ट खरी.  कितीतरी गोष्टी तिच्या मनात होत्या, त्या तिला त्रास देत होत्या, सतावीत होत्या.  मी तिला साहाय्य देऊ शकलो असतो, पण कारागृहातून ते कसे होणार, किती जमणार ?

मानवी संबंधांचा प्रश्न

बेडेनवेलर येथे तासच्या तास जेव्हा मी एकटा असे तेव्हा हे व अशाच प्रकारचे अनेक विचार माझ्या मनात येत.  तुरुंगातील वातावरणाचा परिणाम अद्याप माझ्यावर होता.  मला तो झडझडून पटकन दूर टाकता आला नाही.  तुरुंगाची आता मला संवय झाली होती, आणि बाहेरही फार मोठा फरक नव्हता.  मी नाझी राज्यात होतो.  नाझी राजवटीचे अनेक प्रकार माझ्या सभोवती घडत होते.  मला त्या सर्व गोष्टींची चीड असे.  अर्थात माझ्या बाबतीत नाझी राजवट काही ढवळाढवळ करीत नव्हती.  काळ्या जंगलातील कोपर्‍यात त्या लहानशा खेड्यात नाझी राजवटीच्या फारशा खाणाखुणा नव्हत्या.

किंवा असेही असेल की माझे मन दुसर्‍याच गोष्टींना भरून गेले होते.  माझे सारे गतजीवन—भूतकालीन जीवनाचा सारा चित्रपट—माझ्यासमोर फिरत होता, आणि तेथे नेहमी कमला माझ्याजवळ सदैव उभी असलेली दिसे.  हिंदी स्त्रियांचे ती मला प्रतीक वाटे; हिंदी स्त्रियांचेच काय, स्त्री-जातीचेच ती प्रतीक वाटे.  कधी कधी हिंदुस्थानासंबंधीच्या माझ्या कल्पनांत आश्चर्यकारक रीतीने ती मिळून जाई, एकरूप होई.  हिंदुस्थान, प्रिय भारत देश !  आमचा दोघांचा आवडता देश !  तो कसाही असो.  त्याच्यात दोष असोत, दुबळेपणा असो, तरी तो आम्हाला प्रिय आहे.  हिंदुस्थान म्हटले म्हणजे काही तरी गूढ, काही तरी हाती न सापडणारे, हातून निसटणारे असे वाटे.  कमला मला अशीच नव्हती का ?  समजले होते का तिचे खरे स्वरूप मला ?  जाणले होते का मी तिला ?  आणि तिनेही मला ओळखले होते का ?  समजून घेतले होते का ?  मी एक विक्षिप्तच आहे.  माझ्यातही गूढता आहे, माझ्यामध्येही खोल असे काहीतरी आहे की, ज्याचा अंत मलाही अद्याप लागलेला नाही.  मी तरी माझ्यात खोल बुडी मारून कोठे संपूर्ण तलास लावला आहे ?  माझ्या या स्वरूपामुळे कमलाला माझी भीती वाटत असावी असे माझ्या मनात कधी कधी येत असे.  मूळचा माझा स्वभाव व लग्नाच्या वेळचाही स्वभाव असा काही होता की, नवरा म्हणून समाधानाने मला कोणी पत्करू नये.  काही बाबतीत कमला नि मी अगदी एकमेकांपासून निराळी होतो, परंतु असे असूनही काही गोष्टींत आमचे संपूर्ण साम्य होते.  परंतु एकमेकांना आम्ही पूरक नव्हतो.  एकाची जी उणीव ती दुसरा भरून काढू शकत नव्हता.  आमची प्रत्येकाची वेगवेगळी शक्तीच आमच्या परस्परसंबंधांच्या बाबतीत आमचा दुबळेपणा ठरे.  कधी कधी दोघांच्या मनांचे संपूर्ण ऐक्य होई, संपूर्णपणे दोघांचे जमे.  तर कधी केवळ अडचणीच असत.  आणि वस्तुस्थिती असेल तशी निमूटपणे घेऊन चालण्याचे सामान्य सांसारिकाचे जीवन, आम्हा दोघांनाही शक्य नव्हते.

हिंदुस्थानातील बाजारात आमची अनेक चित्रे विकायला मांडलेली असतात.  एका चित्रात आम्ही दोघे होतो.  शेजारी शेजारी उभी होतो. आमच्या चित्रांच्या खाली 'आदर्श जोडी' असे शब्द छापलेले होते.  आम्ही परस्परांस अनुरूप होतो.  आम्ही आदर्श दांपत्य होतो अशी पुष्कळांची कल्पना असे.  परंतु तो आदर्श सापडणे व सापडला म्हणजे पक्का धरून ठेवणे फार कठीण.  असे होते तरी मला आठवते की सिलोनमध्ये विश्रांतीसाठी गेलो असता मी कमलाला म्हटले, ''अनेक अडचणी आल्या, मतभेद झाले, तरी एकंदरीत आपण किती सुखी !  या जीवनाने आपणांस नानापरीने फसवले, आपल्या अनेक खोड्या केल्या; तरीही आपण एकंदरीत किती भाग्यवान !''  लग्न म्हणजे एक गुंतागुंतीची गोष्ट आहे; ही साधी गोष्ट नाही.  हजारो वर्षांच्या अनुभवानंतरही अद्याप लग्न म्हणजे एक कोडेच आहे.  कितीतरी मंगल विवाहांचे विध्वंस झालेले आम्ही सभोवती पाहात होतो.  जे आरंभी सोने वाटत होते त्याची माती झालेली अनेकांच्या संसारात आम्ही पाहिली होती.  त्या मानाने आम्ही खरेच किती सुखी !  किती दैवाचे !  मी हे सारे तिला सांगत होतो आणि तिलाही ते पटले.  कारण जरी आम्ही कधी कधी भांडत असू, एकमेकावर रागावत असू तरी प्रेमाची स्वयंभू ज्योत आम्ही कधी विझू दिली नाही.  जीवनात दोघांच्याही समोर नवीन नवीन साहसाचे प्रसंग येत, आणि एकमेकांचे नवीनच एखादे स्वरूप पाहण्याची संधी मिळून एकमेकांस समजून घेण्याची नवीनच अंतर्दृष्टी लाभे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel