राष्ट्रवाद आणि आंतरराष्ट्रवाद

भारतासंबंधीची माझी प्रतिक्रिया पुष्कळशी अशी भावनात्मक होती; अर्थात ही भावनात्मक प्रतिक्रिया ही अनेक गोष्टींनी बनली होती व मर्यादित होती.  ही प्रतिक्रिया राष्ट्रवादाचे स्वरूप घेते.  पुष्कळांच्या बाबतीत या राष्ट्रवादाला मर्यादा रहात नाही, घरबंद रहात नाही, परंतु माझे तसे नव्हते.  माझ्या आजच्या हिंदुस्थानच्या अवस्थेत राष्ट्रवाद अपरिहार्य आहे.  राष्ट्रवाद ही नैसर्गिक नि आरोग्यदायी वाढ आहे.  कोणत्याही परतंत्र राष्ट्राला स्वत:च्या स्वातंत्र्याची तहान प्रथम हवी; पहिली प्रभावी प्रेरणा हवी; स्वत:च्या मुक्तीची आणि हिंदुस्थानसारख्या स्वत:चे विशिष्ट व्यक्तिमत्व असल्याची जाणीव असलेल्या देशाला, वैभवशाली भूतकाळाचा वारसा मिळालेल्या देशाला राष्ट्रीय स्वातंत्र्याची तहान असणे अधिकच अवश्य आहे.

जगभर ज्या घडामोडी नुकत्याच झाल्या त्यांनी काय दाखविले ?  श्रमजीविवाद, आंतरराष्ट्रवाद, यांच्या नवीन प्रवाहामुळे राष्ट्रवादाची कल्पना आता मागे पडेल असे घोषवण्यात येत होते.  परंतु या म्हणण्यात फार थोडे सत्य होते ही गोष्ट दिसून आली.  जनतेचे हृदय हलविणारी राष्ट्रवाद ही अद्यापही अति-प्रबल अशी प्रेरणा आहे.  राष्ट्रवादाच्या विचाराभोवती एक भावना, एक परंपरा यांची गुंफण असते, आपल्या सर्वांचे समान जीवन आहे, आपले ध्येय समान आहे ही भावना असते.  मध्यमवर्गातील बुध्दिमान वर्ग राष्ट्रवादाकडून आंतरराष्ट्रवादाकडे हळूहळू जात होता; निदान तसे त्याला वाटत होते; परंतु त्याच वेळेस हेतुपुर:सर आंतरराष्ट्रवादावर उभारलेल्या श्रमजीवी कामगार चळवळी राष्ट्रवादाकडे वळत होत्या.  महायुध्द आले आणि जिकडे तिकडे एकजात सारे राष्ट्रवादाच्या जाळ्यात ढकलले गेले.  राष्ट्रवादाचा हा लक्षात भरण्याजोगा पुनरोदय, किंवा राष्ट्रवादाचा पुन्हा लागलेला शोध व राष्ट्रवादाच्या महत्त्वाच्या अर्थाचा नवा साक्षात्कार झाला आहे त्यामुळे नवीन प्रश्न उभे राहिले आहेत.  आज जुन्या प्रश्नांचे स्वरूप बदलून गेले आहे.  मूळ धरून बसलेल्या प्राचीन परंपरा एकदम फेकून देता येत नाहीत; त्यांची अजिबात जरूर नाही असे म्हणून चालणार नाही.  आणीबाणीच्या प्रसंगी या जुन्या परंपरा एकदम जागृत होतात, माणसांच्या मनावर त्याचा अपार परिणाम होता; आणि पुष्कळ वेळा परमोच्च त्यागासाठी जनता तयार व्हावी, पराकाष्ठेची तिने शर्थ करावी म्हणून जाणूनबुजून या परंपरेच्या भावनांचा उपयोग केलेला आपणास अनेक ठिकाणी दिसून येतो.  परंपरेचा स्वीकार करायलाच हवा.  अर्थात नवीन विचाराला, नवीन काळाला, नवीन परिस्थितीला अनुरूप अशा प्रकारचा बदल तिच्यात केला पाहिजे ही गोष्ट खरी.  नवीन परिस्थितीशी तिचा मेळ घातला पाहिजे.  त्या जुन्यातून पुढे नवीन परंपरा उभी केली पाहिजे.  राष्ट्रवाद या ध्येयाची मुळे खोल गेली आहेत, तो प्रबल आहे.  राष्ट्रवाद म्हणजे जुन्या जमान्यातील चीज, तिला यापुढे काही अर्थ उरला नाही, असे मुळीच नाही.  परंतु अपरिहार्य अशा आजच्या परिस्थितीतून नवीन ध्येये आज जन्माला आली आहेत.  आंतरराष्ट्रवाद, श्रमजीविवाद उत्पन्न झाले आहेत.  या विविध ध्येयांचे एकजिनसी असे संमिश्रण, एक विशाल समन्वय आपणास करणे प्राप्त आहे.  जगातील विरोधवैरे कमी व्हावीत असे वाटत असेल, जागतिक समतोलपणा हवा असे आपणास वाटत असेल तर राष्ट्रवाद नि हे नवे वाद यांचा कोणत्यातरी स्वरूपात मेळ घातल्यावाचून गत्यंतर नाही.  राष्ट्रवादाची हाक हृदयाला सदैव हलवणार हे आपण कबूल केले पाहिजे.  मानवी मनाला त्याची सनातन ओढ आहे हे लक्षात ठेवून या भावनेला आपण वाव दिला पाहिजे.  परंतु मर्यादित क्षेत्रातच या भावनेला अधिसत्ता देणे योग्य ठरेल.

नवीन ध्येय, आंतराष्ट्रीय चळवळी यांचा ज्या देशांवर अपार परिणाम झालेला आहे, त्यांच्यावरसुध्दा राष्ट्रवादाची जर इतकी पकड अद्याप आहे, तर भारतीयांच्या मनावर ती त्याहून कितीतरी अधिक असणार.  कधी कधी असे सांगण्यात येत असते की, हा तुमचा राष्ट्रवाद तुमच्या परागतीचे, मागासलेपणाचे द्योतक आहे; इतकेच नाही, तर पुढे आणखी असेही म्हणतात की, तुमची स्वातंत्र्याची मागणी ही सुध्दा तुमच्या मनाचा कोतेपणा दाखविते.  ब्रिटिश साम्राज्यात किंवा ब्रिटिश राष्ट्रसंघात हिंदुस्थानचे दुय्यम तिय्यम दर्जाचे भागीदार होऊन राहण्याने जगात आंतरराष्ट्रवाद विजयी होणार असे या टीकाकारांना बहुदा वाटत असावे.  ज्याला आज आंतरराष्ट्रवाद म्हणून गोंडस नाव देऊन आमच्यासमोर मांडण्यात येत आहे तो आंतरराष्ट्रवाद म्हणजे संकुचित ब्रिटिश राष्ट्रवादाचे वाढवलेले स्वरूप होय.  ब्रिटिश हिंदी इतिहासाचा अपरिहार्य परिणाम हा की अशा ब्रिटिश राष्ट्रसंघात आम्ही सामील होणे ही गोष्ट सुतराम अशक्य आहे; परंतु क्षणभर आम्ही त्या गोष्टी विसरून, बाजूला ठेवून जरी बघितले तरीही या ब्रिटिशप्रणीत आंतरराष्ट्रवादात आम्ही शिरावे असे त्यात काहीही नाही.  आणि असे असूनही राष्ट्रवादाची प्रखर ज्वाला भारतात धगधगत असूनही कितीतरी अन्य राष्ट्रांपेक्षा खर्‍या अर्थाने आंतरराष्ट्रवाद नि आंतरराष्ट्रीय सहकार्य यांच्यासाठी भारत पुढे आलेला आहे; त्याने त्यांचा स्वीकार केला आहे; एवढेच नव्हे, तर जागतिक संघटनेसाठी स्वतंत्र राष्ट्र म्हणून असणार्‍या हक्कांना मर्यादा घालायलाही, थोडे खालचे स्थान घ्यायलाही भारत तयार आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel