भारताचा शोध

जुने ग्रंथ, जुने अवशेष, भूतकालीन संस्कृतीने विविध क्षेत्रांत निर्मिती करून मिळविलेले यश, ही सर्व विचारात घेऊनही हिंदुस्थानचे स्वरूप समजावून घ्यायला जरी मदत झाली तरी जे उत्तर मला पाहिजे होते ते मला मिळाले नाही, त्यामुळे माझे समाधान झाले नाही.  आणि या गोष्टी मला उत्तर देऊ शकतही नव्हत्या; कारणा त्या भूतकालासंबंधीच फक्त होत्या.  त्या भूतकालाचा व आजच्या वर्तमानकालाचा खरोखरी काही संबंध आहे का याचे उत्तर मला हवे होते.  हिंदुस्थानचा आजचा वर्तमानकाळ म्हणजे मध्ययुगीन सरंजामशाही, छाती दडपून टाकणारे दारिद्र्य व हालअपेष्टा आणि मध्यवर्गीयांचा थोडा फार उथळ अर्बाचीनपणा, या सर्वांचे एक विचित्र मिश्रण आहे.  माझ्यासारख्यांचा जो वर्ग आहे, जो एक प्रकार आहे त्याचा गुणगौरव करणारा मी नाही.  परंतु हिंदी स्वातंत्र्ययुध्दात याच वर्गातील लोकांकडे नेतृत्व जाणार असे दिसत होते.  ते अपरिहार्य आहे असे मला वाटे.  मध्यमवर्गाला स्वत:ला बांधून टाकल्याप्रमाणे, जखडून टाकल्याप्रमाणे वाटत होते; एका विवक्षित मर्यादेत त्यांना कोंडल्याप्रमाणे ठेवण्यात आले आहे अशी त्यांची समजूत होती.  या वर्गाला वाढण्याची, विकास करून घेण्याची इच्छा होती.  ब्रिटिश सत्तेच्या चौकटीत राहून त्याला तसे करता येईना.  म्हणून या सत्तेविरुध्द बंड करण्याची वृत्ती वाढली.  परंतु आम्हांला चिरडून टाकणार्‍या सामाजिक रचनेविरुध्द ही बंडखोर वृत्ती नव्हती.  फक्त ब्रिटिशांना हाकलून त्यांची जागा घ्यावी एवढेच त्यांच्या डोळ्यासमोर असे.  सामाजिक रचना आहे तशीच ते ठेवू इच्छित होते.  त्या रचनेतूनच ते जन्माला आले होते.  त्या विशिष्ट सामाजिक पध्दतीतच वाढले होते.  त्यामुळे तिची पाळेमुळे उखडून, फेकून देणे हे त्यांच्या शक्तीबाहेरचे, वृत्तीला न झेपण्यासारखे काम होते.

परंतु नवीन शक्ती उदयास आल्या.  त्यांनी आम्हांला खेड्यांतील बहुजनसमाजाकडे लोटले आणि एक नवीनच हिंदुस्थान-अजिबात निराळा हिंदुस्थान तरुणांच्या समोर उभा राहिला.  या बुध्दिमान तरुणांना या हिंदुस्थानची आठवणही नव्हती.  ते त्याला विसरून गेले होते किंवा आठवण असूनही या हिंदुस्थानकडे आजपर्यंत त्यांनी फारसे लक्ष दिले नव्हते.  या नवदर्शनाने नवतरुण अस्वस्थ झाले.  सर्वत्र अपार दारिद्र्य होते.  दु:ख-दैन्याला सीमा नव्हती.  तेथले प्रश्न गंभीर होते, अती महत्त्वाचे होते, आणि या बुध्दिमान तरुणांच्या मनात जी जीवनमूल्ये होती, जे काही सिध्दान्त होते, त्यांची एक उलथापालथच झाली.  यामुळेच हे तरुण विशेषकरून बेचैन झाले.  खरा हिंदुस्थान कोठे आहे, कसा आहे त्याचा आता शोध होऊ लागला.  त्यामुळे नवीन जाणीव येऊ लागली.  हिंदुस्थानचे खरे स्वरूप समजू लागले आणि मनात झगडा सुरू झाला.  आमच्यावर होणार्‍या प्रतिक्रिया सगळ्या एकच नव्हत्या.  पूर्वसंस्कारानुरूप ज्या वातावरणात जे जसे वाढले होते, ज्यांना जसे अनुभव आले होते, त्याप्रमाणे त्यांच्यावर त्या नवदर्शनाची प्रतिक्रिया झाली.  काहींचा खेड्यांतील जनतेशी आधीपासूनच परिचय होता, त्यांना तो काही नवीन अनुभव नव्हता.  त्यांना फारसे वेगळे काही वाटले नाही.  परंतु मला तरी ते नवदर्शन होते.  जलपर्यटन करून काही नवीन शोध लागावा तसे मला वाटले.  माझ्या लोकांतील काही दोष, काही चुका, काही दुर्बलता यामुळे जरी मला अपार दु:ख होत असे, तरी या बहुजनसमाजात मला असे काही एक आढळले की, ज्याचे वर्णन मी करू शकणार नाही.  वर्णनातील असे तेथे काहीतरी मला दिसले, आणि या जनतेकडे मी ओढला गेलो.  मध्यमवर्गीयांत हे काही तरी मला कधी दिसले नाही.

बहुजनसमाजाच्या कल्पनेची केवळ पूजा करणारा मी नाही.  नुसत्या तात्त्विक विचाराने बहुजनसमाज म्हणजे काहीएक वेगळा गट समजून चालण्याचे मी प्रयत्नाने टाळतो.  भारतीय जनतेचे इतके विविध प्रकार मला दिसत असले तरी त्याचा प्रकार कोणता हे माझ्या मनात न येता, ही एक चालतीबोलती जिवंत व्यक्ती आहे इतके माझे लक्ष जाते, व म्हणून भारतातल्या असंख्य जनतेकडे काल्पनिक, मोघम गटातल्या व्यक्ती म्हणून माझे लक्ष नाही.  जनतेतल्या व्यक्तीकडे भारतीय जनता सत्यस्वरूपात, जिवंत हाडामांसाची, बोलतीचालती अशी माझ्या डोळ्यांसमोर उभी असते.  तिच्यातील ती सारी विविधता मी बघतो आणि त्यांची अपार संख्या असली तरी त्यांच्याकडे अस्पष्ट थवे, संघ या दृष्टीने न बघता व्यक्ती म्हणून मी पाहात असतो.  त्यांना पाहून मी निराश झालो नाही.  कदाचित त्यांच्यापासून मी फार अपेक्षा केली नाही म्हणूनही असे झाले असेल.  परंतु अपेक्षेपेक्षाही अधिक मला त्यांच्याजवळ आढळले.  हे जे काही जनतेजवळ मला आढळले, एक प्रकारचे स्थैर्य, काही उपयोगाला आणण्याजोगे सामर्थ्य सापडले, या सर्वांचे कारण म्हणजे आतापर्यंत त्यांनी जिवंत ठेवलेली भारतीय सांस्कृतिक परंपरा हे होय, असे माझ्या एकदम लक्षात आले.  ही सांस्कृतिक परंपरा थोड्याफार अंशाने तरी त्यांच्यात होती.  गेली दोनशे वर्षे टोले खाता खाता या परंपरेतले बरेचसे छिलून गेले होते, पण उपयुक्त असा बराचसा भाग बाकी राहिला होता व त्याबरोबरच अगदी निरूपयोगी व वाईट भागही राहिला होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel