भारतमाता

मी या सभेतून त्या सभेकडे असा सारखा हिंडत होतो.  सभांतून पुष्कळदा आपला हा हिंदुस्थान, हा भारत देश, असे शब्द मी उच्चारीत असे.  भारत हे संस्कृत नाव मूळ संस्थापक जो भरत त्याच्यावरून पडले.  शहरातील सभांतून भारत, भारतमाता असे शब्द मी क्वचितच वापरीत असे.  कारण शहरातील श्रोते अधिकच निर्ढावलेले; त्यांना यापेक्षा जास्त मसालेदार माल लागे.  तेथे एवढ्या भांडवलावर भागले नसते.  परंतु किसानाची मर्यादित दृष्टी त्याच्यासमोर या विशाल देशाविषयी मी बोलत असे.  आपला देश केवढा मोठा, किती विविध, एक प्रांत दुसर्‍यापेक्षा किती निराळा, आणि तरीही सारा देश एकच कसा, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत शेतकर्‍यांचे प्रश्न सर्वत्र सारखे कसे आहेत, स्वराज्य आणायचे आहे, ते या किंवा त्या भागासाठी नसून सर्व देशासाठी कसे आहे; ते मी सांगत असे.  वायव्येकडील खैबर खिंडीपासून कन्याकुमारीच्या दक्षिण टोकापर्यंत मी सर्वत्र हिंडलो.  परंतु शेतकरी कोठेही जा तेच प्रश्न मला कसे विचारीत, त्यांची दु:खे समान कशी होती, सर्वत्र भीषण दारिद्र्य, उपासमार, कर्जाचा डोंगर, सावकार आणि जमीनदार, त्यांचे ते विशेष हक्क, सरमसाट खंड, डोईजड कर, पोलिसांचा जाचकाच आणि या सार्‍या आपत्ती परकी सत्तेने जी एक चौकट आपणावर लादली आहे तिच्याशी कशा संबध्द आहेत ते मी सांगत असे.  आणि सर्वांना सर्वत्र त्रास आहे तर सुखही येईल हे सर्वांना कसे मिळाले पाहिजे ते मी समजावून सांगत असे.  संपूर्ण हिंदुस्थानचा विचार सगळा आपला सर्वांचा देश म्हणून करायला त्यांनी शिकावे, एवढेच नव्हे, तर ज्या विशाल जगाचा आपण एक भाग आहोत त्या जगाचाही त्यांनी थोडाफार विचार करायला शिकावे असा माझा प्रयत्न असे.  म्हणून त्यांच्यासमोर बोलताना मी त्यांच्यासमोर चीनमधील लढायांचा उल्लेख करीत असे.  स्पेन, अबिसीनिया, मध्य युरोप, इजिप्त, आशियाच्या पश्चिमेकडील देश यांतील संघर्ष, तेथील चळवळी यासंबंधी मी बोलत असे.  रशियात कसे आश्चर्यकारक फेरफार होत आहेत ते व अमेरिकेने किती प्रगती केली आहे ते सांगे.  अशा रीतीने एक व्यापक दृष्टी शेतकर्‍यालाही यावी म्हणून माझी धडपड असे.  हे काम सोपे नव्हते.  परंतु वाटत होते तितके कठीणही गेले नाही.  कारण रामायण महाभारत ही आपली प्राचीन महाकाव्ये, तसेच इतर दंतकथा आणि पुराणे यामुळे भारताची त्यांना कल्पना होती.  त्या प्राचीन साहित्याशी परिचित असल्यामुळे आपल्या देशाची कल्पना करणे त्यांना कठीण गेले नाही.  त्यांच्यापैकी काहीजण हिंदुस्थानच्या चारी दिशांना दूरवर यात्रेच्या निमित्ताने हिंडून फिरून आलेले असत.  कधी कधी माझ्या श्रोत्यांत जुने सैनिक असत, ते गेल्या महायुध्दात अनेक स्वार्‍यांतून जगातील निरनिराळ्या भागांतून जाऊन आलेले होते.  १९३० सालच्या सुमाराला सर्वत्र मंदी आली, तिचा संबंध जागतिक घडामोडींशी कसा होता ते त्यांना सांगितले की परकी देशांचे उल्लेख त्यांना पटकन पटत. 

कधी कधी सभास्थानी मी पोचताच प्रचंड जयघोषांनी माझे स्वागत केले जाई.  'भारतमाता की जय' या गर्जना उठत.  या घोषणेचा अर्थ काय असे मी त्यांना विचारी तेव्हा ते बुचकळ्यात पडत, कारण मी असा काही प्रश्न करीन अशी त्यांची अपेक्षा नसे.  ज्या भारतमातेचा जय व्हावा असे तुम्हाला वाटते ती भारतमाता म्हणजे काय ?  या प्रश्नाचे त्यांना नवल वाटे, व काय उत्तर द्यावे हे ध्यानात न आल्यामुळे ते एकमेकांकडे बघत व माझ्याकडे बघत.  मी पुन्हा पुन्हा विचारीत राहिलो तर एखादा तडफदार जाट, जमिनीशी पिढ्यानपिढ्या एकरूप झालेला असा किसान उभा राही आणि उत्तर देई की, भारतमाता म्हणजे ही धरित्री, ही हिंदुस्थानची सुंदर जमीन, परंतु मी पुन्हा प्रश्न विचारी की कोठली जमीन ?  तुमच्या खेडेगावातील जमिनीचा तुकडा की जिल्ह्यातील सारी जमीन की प्रांतातील, की या सर्व हिंदुस्थानातील ? अशा रीतीने प्रश्नोत्तरे चालत, आणि ते शेवटी अधीर होऊन म्हणत, ''आम्हांला समजत नाही, तुम्ही सारे नीट सांगा'' आणि मी तसा प्रयत्न करी.  तुम्ही समजता त्याप्रमाणे सर्व हिंदुस्थान यात येतोच, परंतु आणखीही काधी अधिक त्यात आहे.  भारतातील पर्वत व नद्या, अरण्ये व अन्न देणारी अफाट शेतजमीन या सार्‍या गोष्टी आपणास प्रिय आहेतच; परंतु शेवटी भारत म्हणजे मुख्यत्वेकरून भारतीय जनता, तुमच्या माझ्यासारखे हे सारे लोक, या अफाट देशात सर्वत्र पसरलेली हिंदी जनता हा भारतमातेचा मुख्य अर्थ.  भारतमाता म्हणजे कोट्यवधी हिंदी बंधुभगिनी भारतमातेचा जय म्हणजे या भारतीय जनतेचा जय.  आणि मी शेवटी म्हणे की तुम्हीही सारे या विशाल भारतमातेचेच अंश आहात.  तुम्ही स्वत:च एक प्रकारे मूर्तिमंत भारतमाता आहात.  हळूहळू हा विचार त्यांच्या मनोबुध्दीत मुरत जाई, हृदयात घुसे आणि मग एखादा मोठा नवीन शोध लागला अशा रीतीने त्यांच्या डोळ्यात एक नवीन प्रभा चमके.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel