बहुजनसमाजाची संस्कृती

अशा रीतीने आजच्या भारतीय जनतेचे चालू नाटक मी पाहिले.  त्यातल्या पात्रांची दृष्टी भविष्यकाळाकडे गेलेली असतानासुध्दा त्यांचे जीवन भूतकालाशी जोडून ठेवणारे धागे मला केव्हा केव्हा आढळून येत.  त्यांच्या जीवनावर अपरंपार परिणाम करणारी सांस्कृतिक पार्श्वभूमीही सर्वत्र मला आढळून आली.  ती 'दंतकथा, परंपरा, इतिहास, पुराणे, सोपे तत्त्वज्ञान या सर्वांचे मिळून एक मिश्रण होते व ते असे एकजीव झालेले होते की त्यातले एक संपून दुसरे कोठे सुरू झाले ते कळणे शक्य नसे.  अशिक्षित व निरक्षर मनुष्याच्या वाट्याला हीच पार्श्वभूमी आलेली होती.  सर्वसामान्य जनतेला रामायण, महाभारत व इतर प्राचीन ग्रंथांची भाषांतरातून व इतर तर्‍हेने खूप माहिती असे व त्यांतले एकूणएक ठळक प्रसंग, कथा व तात्पर्य यांच्या मनावर इतके ठसलेले होते की त्यामुळे त्यांचे मन सुसंस्कृत होऊन त्यांच्या विचाराला भरीवपणा आलेला होता.  त्यांची मनोभूमी पडीत नव्हती, हृदय रिते नव्हते.  खेड्यातील अशिक्षित लोकांना शेकडो कविता तोंडपाठ असत.  त्यांच्या बोलण्यात ही काव्ये, सुभाषिते, हे चरण पदोपदी येत.  किंवा कधी जुनी पौराणिक गोष्ट येई, तिच्यात एखादे सुंदर नीतितत्त्व गुंफलेले असे.  एखादवेळेस एखाद्या खेड्यात मी आजकालच्या गोष्टींवर बोलत असताना जमलेली मंडळी सगळ्या बोलण्याला अशा पौराणिक कथांनी अशी एक निराळी कलाटणी देत की, त्याचे मला आश्चर्य वाटे.  माझ्या लक्षात असे येई की, माझ्या डोळ्यांपुढे जशी इतिहास ग्रंथात येणारी प्रत्यक्ष घडलेली म्हणून ठरलेली भूतकाळची चित्रे येत, तशी निरक्षर शेतकर्‍यांच्या डोळ्यांपुढेही काही भूतकालची चित्रे येत.  त्यांची ती चित्रे, दंतकथा, परंपरागत गोष्टी किंवा पुराणातले प्राचीन वीर किंवा सतींची असत.  त्यात ऐतिहासिक असा फार थोडा भाग असे.  परंतु निदान त्यांच्या बुध्दीला तरी ती अगदी खरी म्हणून पटलेली होती.

त्या जमलेल्या लोकांचे चेहरे, बांधा व शरीराची हालचाल पाहिली तर कितीतरी मनमोकळे चेहरे व घाटदार, ताठ, मजबूत बांधे दिसत; कितीतरी स्त्रिया मला सुंदर, सडसडीत, तरळ, रूबाबदार वाटत. क्वचित एखादी अगदी उदास दिसे.  वरच्या वर्गातील लोकांमध्ये बहुधा सुंदर शरीरांचे नमुने अधिक दिसत.  कारण आर्थिक दृष्ट्या ते किंचित बरे असत.  कधी कधी एखाद्या खेडेगावातून किंवा जवळच्या रस्त्यातून जात असताना असा एखादा सुंदर पुरुष, एखादी सुंदर बाई दृष्टीस पडे की, मला एक आश्चर्याचा धक्का बसून प्राचीन लेण्यांतील नमुन्यांची आठवण होई. शेकडो वर्षे ह्या देशात किती भयानक प्रसंग आले, किती हलाखीची परिस्थिती आली तरी त्या सर्व प्रसंगांतून पिढ्यान् पिढ्या टिकाव धरून हा नमुना कायम कसा राहिला याचे मला आश्चर्य वाटे, आणि मनात येई की काळ चांगला आला व या लोकांना सुधारायला जास्त वाव मिळाला तर अशा लोकांच्या हातून काय करून दाखविता येणार नाही ?

जिकडे तिकडे दारिद्र्य दिसे आणि त्यामुळे पाठोपाठ आलेली शेकडो दैन्ये दु:खे दिसत.  प्रत्येकाच्या कपाळावर हा दारिद्र्याचा शाप लिहिलेला दिसे.  सारे जीवन चिरडून विद्रूप झाले होते; जगणे म्हणजे एक संकट झाले होते व ह्या वेडेवाकडेपणामुळे, त्या कायम हालाखीमुळे, ह्या रोजच्या चिंतेमुळे कितीतरी दुर्गुणांचे पाझर जिकडे तिकडे वहात होते.  हे सगळे पाहिले की जीव उबगे; पण स्पष्ट खरे पाहू गेले तर हीच हिंदुस्थानची यथार्थ वस्तुस्थिती होती.  जे नशिबात आले ते मुकाट्याने भोगावे अशी आगतिक शरणागतीची वृत्ती फार बोकाळली होती.  परंतु हजारो वर्षांच्या या प्राचीन संस्कृतीचा वारसा म्हणून जो एक सौम्यपणा, शांतपणा, लोकांच्या अंगी बाणला होता तो कसल्याही संकटांनी घासले तरी पुसून जाण्यासारखा नव्हता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel