सिंधुखोर्‍यातील संस्कृतीवर लिहिणारा मार्शल हा एक सर्वमान्य विद्वान आहे व तेथील उत्खनन त्याच्याच देखरेखीखाली झाले.  त्याचा आणखीही एक उतारा देऊ.  ''सिंधूच्या तीरावरील संस्कृतीचा आणखीही एक विशेष आहे.  येथील कला व धर्म यांचे एक स्वतंत्र स्वरूप आहे; त्यांच्यावर येथला एक विशिष्ट ठसा आहे.  या काळातील इतर देशांची जी काही माहिती आपणांस उपलब्ध आहे तीवरून असे म्हणता येईल की, या सिंधुसंस्कृतीत बकरे, कुत्रे आणि इतर प्राणी यांची भांड्यावरून जी चित्रे आहेत तशा शैलीची चित्रे अन्यत्र कोठेही सापडली नाहीत.  तसेच सुंदर कोरीव काम केलेल्या मुद्रा व विशेषत: आखूड शिंगे व वशिंड असलेल्या बैलाची मुद्रा यांचे रेखासौंदर्य, वळीव आकार व ठसठशीत कल्पनाविकास हे गुण रत्नावरील नक्षीकामात अन्यत्र कोठेही सापडलेल्या नमुन्यांत क्वचितच सापडतात.  हराप्पा येथे सापडलेले माणसांचे दोन लहान पुतळे आहेत.  त्यांच्या घडाईत असा काही सुटसुटीत चपळ बांधा आला आहे की, पुढे ग्रीक कलांचा काळ येईपर्यंत तरी इतकी सुंदर शिल्पकला आपणांस अन्यत्र कोठे दिसत नाही.  सिंधुतीरावरील धर्म व इतर देशांतील तत्कालीन धर्म यांत समान असे पुष्कळ आहे.  इतिहासपूर्व आणि इतिहासोत्तर कोठलेही धर्म घेतले तरी सर्वांच्याच बाबतीत असे म्हणता येईल.  परंतु असे असले तरी एकंदर सर्व बाजूंनी जर आपण पाहू तर असे म्हणावे लागेल की, सिंधुनदीच्या तीरावरील धर्म हा विशेषेकरून भारतीय धर्म होता.  अभिजात हिंदी धर्म होता व जो हिंदू धर्म आज जिवंत आहे त्याच्यापासून तो फारसा निराळा नव्हता.''

अशा रीतीने आपणास दिसून येते की, सिंधूच्या खोर्‍यातील ही संस्कृती समकालीन अशा इराणी, मेसापोटेमियन व इजिप्शियन संस्कृतींशी संबध्द होती.  त्यांच्याशी देवघेव करीत होती आणि काही बाबतींत त्यांच्याहून सरस व श्रेष्ठ होती.  ही संस्कृती नागरी—मोठ्या शहरांतून केंद्रित झालेली संस्कृती होती व त्यात वैश्यवर्ग धनसंपन्न असून त्या वर्गाला या संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आलेले होते असे आढळते.  रस्त्यावर दुतर्फा ओट्यावरची मोकळी दुकाने व काही इतर लहान दुकाने असावीत व ही शहराची मांडणी पाहून हल्लीच्या गावातील बाजारपेठांची आठवण येते.  प्राध्यापक चाईल्ड म्हणतात, ''सिंधुतीरावरील शहरात राहणारे कारागीर विक्रीसाठी भरपूर माल निर्माण करीत असावेत असे दिसते.  किंमत कशी ठरवली जात असे, चलनाचे स्वरूप काय होते हे समजायला मार्ग नाही.  परंतु वेगवेगळ्या मालाची देवघेव सुलभ करण्याचे समाजातले साधन म्हणून काही विशाल टोलेजंग अशा खाजगी घरांना कोठारे आहेत.  माल साठवून ठेवायच्या त्या जागा असाव्यात.  या घरांचे मालक व्यापारी असावेत.  घरांची संख्या व आकार यांवरून व्यापारीवर्ग मोठा व चांगलाच सधन असावा असे दिसते.  तेथील अवशेषांमध्ये आश्चर्यकारक संपत्ती सापडली आहे.  सोन्याचांदीचे दागिने, हिरेमाणके, सुंदर मातीची भांडी, तांब्याच्या पत्र्याची भांडी, धातूची यंत्रे व हत्यारे असे कितीतरी प्रकार येथे मिळाले आहेत.''  हाच ग्रंथकार पुढे लिहितो, ''रस्त्यांची नीट योजनावार आखणी व आश्चर्य वाटण्याजोगी उत्तम पध्दतीची स्वच्छ ठेवलेली गटारे दिसतात त्यावरून शहराबाबत काहीतरी अत्यंत दक्षपणे काम करणारी शासनसंस्था असावी असे दिसते.  या शासनसंस्थेची सत्ता चांगली असावी व त्यामुळे त्यांना नदीच्या पुरामुळे पडलेल्या शहरांतून लहान मोठ्या रस्त्यांची आखणी करून त्याप्रमाणे घरे बांधणे व नगररचनेतील किरकोळ नियम पाळणे या बाबतीत नागरिकांवर सक्ती करता येत असावी.'' *

-------------------------
* गॉर्डन चाईल्ड : 'इतिहासात काय घडले ?' (What happened in History?) पृष्ठे ११३-११४.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel