इहपरलोकी कल्याण व्हावे म्हणून श्रध्दापूर्वक आचरण्याचा मार्ग या दृष्टीने हिंदुधर्माकडे पाहावे तर तो अनिश्चित, आकारहीन, बहुविध, सर्वांना सर्व प्रकारचा असा आहे.  त्याची व्याख्या करणे अशक्यप्रायच आहे.  इतकेच नव्हे, तर जगात ज्या अर्थी धर्म हा शब्द वापरला जातो त्या अर्थाने त्याला धर्म म्हणता येईल की काय असा संशय वाटतो.  त्याचे हल्लीचे किंवा पूर्वीचे स्वरूप पाहिले तर त्यात अगदी उत्तमापासून तो अगदी कनिष्ठ प्रकारच्या काही काही परस्परविरुध्द, अशा सर्व प्रकारचा श्रध्दामार्ग व आचारांचा समावेश झालेला आहे.  हिंदुधर्माचे महत्त्वाचे स्वरूप हे दिसते की नांदावे, नांदू द्यावे; जगावे, जगू द्यावे.  महात्मा गांधींनी हिंदू धर्माची व्याख्या करण्याचा पुढीलप्रमाणे यत्न केला आहे.  ''हिंदू धर्माची व्याख्या करा असे जर मला कोणी सांगितले तर मी इतकेच म्हणेन की अहिंसक मार्गाने सत्याचा शोध, ईश्वर न मानणारा मनुष्यही स्वत:ला हिंदू म्हणवून घेऊ शकतो.  हिंदू धर्म म्हणजे सत्याचा कसून पाठलाग करणे... हिंदू धर्म म्हणजे सत्याचा धर्म; सत्य म्हणजेच परमेश्वर.  ईश्वर न मानणे आम्हांला माहीत आहे.  परंतु सत्य न मानणे आम्हांला माहीत नाही.''  गांधीजी 'सत्य आणि अहिंसा' असे म्हणतात.  परंतु गांधीजी ज्या अर्थाने अहिंसेचा अर्थ करतात, त्या अर्थाने अहिंसा हिंदू धर्माचा महत्त्वाचा भाग आहे असे न मानणारे काही नामवंत आहेत आणि तेही नि:संशय हिंदूच आहेत, (विचारवंतांचे म्हणणे आहे) तेव्हा हिंदू धर्माचे वैशिष्ट्य म्हणून दाखविणारे केवळ सत्य काय ते उरले, परंतु याला व्याख्या कोण म्हणेल ?

म्हणून हिंदी संस्कृतीला हिंदू संस्कृती किंवा हिंदू धर्म असे म्हणणे बरोबर नाही व इष्टही नाही.  प्राचीन ग्रंथात स्पष्ट रूपाने मांडलेल्या विविध तत्त्वपध्दतींत जरी हिंदू संस्कृतीचेच वर्चस्व प्रतीत होत असले तरी फार प्राचीन संस्कृतीलाही हिंदू संस्कृती म्हणणे बरोबर किंवा इष्ट नाही.  आणि हल्लीच्या काळी तर त्या अर्थाने त्या संज्ञा वापरणे जास्तच चुकीचे आहे; आणि आज तर तसा शब्द लावणे हे अगदीच चुकीचे आहे.  जोपर्यंत तो प्राचीन धर्म आणि ते तत्त्वज्ञान मुख्यत: जीवनाचा एक मार्ग, जगाकडे पाहण्याची एक विशिष्ट दृष्टी या स्वरूपात होती तोपर्यंत हिंदी संस्कृती व हिंदू संस्कृती हे शब्द समानधर्मी होते.  परंतु तर्‍हेतर्‍हेचे कर्मकांड व विधी यामुळे धर्माचे स्वरूप जास्त जास्त कडक बनत गेले.  तेव्हा त्या सर्वसंग्राहक 'संस्कृती' च्या अर्थापेक्षा त्याचा अर्थ काही बाबतीत अधिक तर काही बाबतीत कमी झाला.  एखाद्या ख्रिश्चनाला किंवा मुसलमानाला आपला धर्म कर्मठ श्रध्देने पाळूनसुध्दा आपली राहणी व संस्कृती हिंदी वळणाची करणे शक्य होते व त्याप्रमाणे पुष्कळ वेळा होत होते.  अशा तर्‍हेने स्वत:चा धर्म न बदलता, स्वत:त असा बदल करून तो हिंदी बनत असे.

या देशाला किंवा येथील संस्कृतीला व परंपरा बदलत गेली तरी अखंड असलेल्या आपल्या इतिहासाला योग्य शब्द हिंदी हा आहे.  हिंदी हा शब्द हिंद शब्दापासून बनला आहे.  हिंदुस्थानसाठी हिंद शब्द अजूनही सामान्यत: उपयोगिला जातो.  आशियाच्या पश्चिमेकडील देशांत, इराण, तुर्कस्थान, इराक, अफगाणिस्तान, ईजिप्त या सर्व देशांत हिंदुस्थानचा उल्लेख हिंद या शब्दानेच करण्यात येतो, आणि जे जे हिंदुस्थानचे त्याला हिंदी असे म्हणतात.  हिंदी या शब्दाचा धर्माशी काहीएक संबंध नाही. हिंदुस्थानचा अनुयायी हा जितका हिंदी, तितकाच हिंदी ख्रिश्चन, हिंदी मुसलमानही हिंदी.  अमेरिकेतील लोक सर्व हिंदवासीयांना हिंदी म्हणून संबोधतात ते काही फारसे चूक नाही.  परंतु हिंदी शब्द ते वापरतील तर ते अगदी बरोबर ठरेल.  परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की, हिंदुस्थानात हिंदी शब्द विशिष्ट लिपीशी, देवनागरी लिपीशी जोडला गेला आहे.  म्हणून अधिक व्यापक व अधिक नैसर्गिक अर्थाने तो शब्द योजणे कठीण झाले आहे.  आजकालचे वितंडवाद एकदा मिटले म्हणजे आपल्याला हिंदी हा शब्द त्याच्या मूळच्या समाधानकारक अर्थाने कदाचित वापरता येईल.  परंतु: तूर्त इंडियन उर्फ हिंदी या अर्थाकरता हिंदुस्थानी हा शब्द रूढ आहे, तो अर्थात 'हिंदुस्थान' वरून आलेला आहे. परंतु हा शब्द काही केल्या पटत नाही, कारण 'हिंदी' या शब्दाला जी इतिहासाची व संस्कृतीची जोड आहे ती 'हिंदुस्थानी' ला नाही.  हिंदी संस्कृतीच्या प्राचीन युगांना हिंदुस्थानी म्हणणे कसेसेच वाटेल.

या आपल्या सांस्कृतिक परंपरेला इंडियन, हिंदी किंवा हिंदुस्थानी यांपैकी काहीही नाव आपण दिले तरी आपल्याला असे दिसते की, पूर्वी हिंदी तत्त्वज्ञानामुळे मुख्यत: आलेली जीवनाकडे पाहण्याची एक वृत्ती होती.  त्या वृत्तीमुळे अशी एक अंत:स्फूर्ती आलेली होती की, अनेक भिन्न गोष्टींचा समन्य करून त्यांना एकरूप करावे.  ह्या समन्वय करण्याच्या संग्राहक वृत्तीचा प्रभाव हिंदी संस्कृतीची जोपासना करण्यात व वंशव्यवस्थेतही ठळक दिसतो.

हिंदी संस्कृतीच्या वाढीचाच हा विशेष आहे असे नव्हे तर वांशिक वाढीचाही हाच विशेष आहे.  संस्कृती विचार किंवा दुसर्‍या कसल्याही प्रकारे काही परकीय आक्रमण आले की ते आव्हान समजून हिंदी संस्कृती त्याला तोंड देई व एखाद्या नव्याच प्रकाराने त्याचा समन्वय करून ते आक्रमण पचवून विजयी होई.  हे युध्द सुरू असतानाच हिंदी संस्कृतीचा कायाकल्प होऊन तिला नव्यतारुण्य प्राप्त होई व मूळ देह आणि पार्श्वभूमी कायम राहून तिला नवे अंकुर मात्र फुटत.  सी.ई.एम्. जोड त्याविषयी लिहितो, ''कारण कोणतेही असो, परंतु हिंदुस्थानने मानवजातीला मोलाची एक देगणी दिली आहे.  भिन्नभिन्न विचारसरणी आणि भिन्नभिन्न मानववंश यांचा समन्वय करायला हिंदुस्थान सदैव सिध्द असे; आणि असा संग्राहक महान समन्वय करण्याची शक्तीही त्याच्याजवळ असे.  सारांश हा की विविधतेतून एकता कशी निर्माण करावी हे हिंदुस्थानने जगाला शिकविले आहे.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel