अव्यक्ताचा शोध लावण्याचे हिंदी मनाचे हे जे पहिले धाडशी प्रयत्न झाले, त्यांत सत्यावर सारखा भर आहे, सत्यावर अधिष्ठान आहे, सत्याचा सारखा ध्यास लागलेला आहे.  अपौरुषेय, ईश्वरप्रणीत किंवा ठाम सिध्दांत म्हणून कोणतेही तत्त्व खरे मानणे म्हणजे ज्याच्या बुध्दीची साहसी भरारी पुरेशी नाही अशा अर्ध्याकच्च्या लोकांची समजून ती पध्दत त्यांनी बाजूला टाकली.  त्या विचारवंतांची प्रयोग करण्याची पध्दत स्वत:च्या प्रत्यक्षानुभवाने प्रचीती घेण्याची.  केवळ भावनागम्य व अतींद्रिय अनुभवाप्रमाणे, त्यांना झालेली ही अव्यक्ताची प्रचीती बाह्य दृश्य जगाच्या अनुभवाहून वेगळी होती.  आपल्या बुध्दीला समजण्यासारख्या त्या दिशा, काल अशा बंधनांनी मोजता येण्यासारख्या ह्या दृश्य जगाच्या पलीकडच्या एका वेगळ्या अनंत, अदृश्य, दिक्कालबंधनाच्या मर्यादा नसणार्‍या जगात ह्या हिंदी मनाची भरारी गेलेली दिसते.  या अनंताच्या प्रदेशातले त्याचे अनुभव ह्या कोत्या जगाच्या भाषेत मांडणे कठीण होते.  हा साक्षात्कार काय होता, तो कल्पनेचा आभास होता का शाश्वत सत्याचे एक दर्शन होते ते मला सांगता येत नाही.  कदाचित पुष्कळ प्रयोगांत ह्या विचारवंतांची आत्मवंचनासुध्दा झाली असेल.  पण मला त्यात महत्त्वाचा भाग वाटतो तो हा की, अमक्या धर्मात किंवा अमक्या आचार्याने सांगितले म्हणून त्याच मार्गाने गेले पाहिजे असे न करता स्वानुभवाने अव्यक्ताचा शोध लावण्याचे हे प्रयत्न होते.

एक लक्षात ठेवायचे ते हे की, हिंदुस्थानात तत्त्वज्ञानाचा उद्योग ही काही मूठभर तत्त्वज्ञांची किंवा शिष्टांची मिरासदारी नव्हती.  तत्त्वज्ञान बहुजनसमाजाच्या धर्माचा महत्त्वाचा भाग असे.  तत्त्वज्ञानाचे हे गूढ गंभीर विचार बारीक होत होत झिरपत झिरपत सर्वसामान्य लोकांपर्यंत शेवटी जाऊन पोचत आणि त्यामुळे जीवनाकडे पाहण्याची तत्त्वज्ञानी दृष्टी हिंदुस्थानात चीनप्रमाणे अगदी सर्वसामान्य झाली.  काही थोड्या लोकांच्या दृष्टीने तत्त्वज्ञान म्हणजे विश्वाच्या विविध घटनांची कारणे व त्यांचे नियम, जीवनाचा अंतिम हेतू याचा अगदी खोलात शिरून वळणावळणाने शोध घेणे, आणि जीवनातील परस्परविरोधी घटनांच्यामागे काही मूळचा एकसूत्रीपणा आहे किंवा नाही याचा शोध घेणे.  परंतु बहुजनसमाजापर्यंत पोचलेल्या तत्त्वज्ञानाचे एवढे कोडे न होता ते फार सुटसुटीत झाले; व तरीसुध्दा त्या तत्त्वज्ञानामुळे सर्वसामान्य माणसाला काही जीवनहेतू काही कार्यकारण संगती सापडे.  आलेल्या प्रसंगाला व दैवाच्या घाल्याला खंबीरपणाने तोंड देण्याला धीर चढे व आनंदी-समाधानी वृत्ती कायम राही.  टागोर यांनी डॉ. ताय-चि-ताओ ह्यांना लिहिले होते, ''चीन व हिंदुस्थान यांतील प्राचीन विद्या म्हणजे ताओ-सत्पथ.  यांचा शहाणपणा असा की त्यांनी मानवी जीवन अंतर्बाह्य परिपूर्ण करण्याचा, संसारातल्या बहुविध कर्तव्यांतच जीवनाच्या आनंदाचे मिश्रण करण्याचा कसून प्रयत्न केला.  हा शहाणपणाचा ठसा निरक्षर, अडाणी, सामान्य जनतेवर थोडाफार कायम उमटला व सात वर्षे घोर युध्द चालूनही चिनी जनतेचा श्रध्देचा आधार तुटला नाही व वृत्तीतला आनंद सुटला नाही.''  हिंदुस्थानातील आपली सत्त्वपरीक्षा जास्त वर्षे चालू आहे.  दारिद्र्य आणि अपरंपार दैन्य आपले कित्येक वर्षे कायम सोबतीच झाले आहेत.  आणि असे असूनही हिंदी जनता हसते, खेळते, गाते, नाचते, हेही दिवस जातील या खुशीत असते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel