जातकातील हकीकतीवरून एक निराळीच विचित्र घटना घडलेली दिसते.  विशिष्ट धंद्यातील लोकांनी आपल्या स्वतंत्र वसाहती, आपली स्वतंत्र गावे वसविल्याचे आढळते.  एक गाव म्हणजे सारा सुतारांचा- हजार सुतार कुटुंबे त्या गावात होती.  एक गाव लोहार वगैरे धातुकाम करणार्‍यांचा.  आणि अशा प्रकारे त्या त्या धंद्यांची गावे होती.  ही त्या त्या विशिष्ट धंद्यांची गावे शहरापासून जवळच वसलेली असत. त्यांचा माल शहरांत खपे, आणि त्यांनाही शहर जवळ असल्यामुळे जीवनाला आवश्यक वस्तू मिळवायला सोपे जाई.  ही गावे सहकारी तत्त्वावर चालत व सर्व गावांच्या वतीने म्हणून त्या गावच्या कारागिराकडून तयार केल्या जाणार्‍या मालाचा घाऊक पुरवठा करण्याचे सौदे पत्करीत.  बहुतेक या अशा अलग राहणीमुळे, त्या त्या धंद्यातील लोकांच्या अलग संघटनांमुळे जातिभेदाची वर्णव्यवस्था हळूहळू अस्तित्वात येऊन चोहूंकडे पसरत गेली असावी.  ब्राह्मणांनी आणि क्षत्रियांनी घालून दिलेले उदाहरण व्यापारी संघांकडून, निरनिराळ्या धंदेवाईकांकडून क्रमश: गिरवले गेले.

उत्तर हिंदुस्थानभर मोठमोठ्या सडका व त्यावर ठिकठिकाणी विश्रांतिगृहे व मधूनमधून रुग्णालये होती.  त्यामुळे देशाच्या निरनिराळ्या दूरच्या भागांचे दळणवळण होते.  देशातल्या देशात व्यापार भरभराटीत होताच, शिवाय हिंदुस्थान आणि इतर देश यांच्यातही भरपूर देवघेव होती.  ईजिप्तमध्ये ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात मेंफिस येथे हिंदी व्यापार्‍यांची वसाहत होती असे तेथे सापडलेल्या हिंदी लोकांच्या मुखवट्यांवरून वाटते.  हिंदुस्थान आणि आग्नेय आशियातील द्वीपे यांच्या दरम्यानही व्यापार बहुधा असावा.  समुद्रावरील व्यापारासाठी गलबते लागणारच.  हिंदुस्थानात नद्यांतून वगैरे वापरण्यासाठी म्हणून गलबते बांधण्यात येत असत असे स्पष्ट दिसते.  द्वीपात राहून येणार्‍या व्यापार्‍यांकडून गलबतावरील जकात घेतल्याचे महाभारतात उल्लेख आहेत.

व्यापार्‍यांच्या समुद्रपर्यटनांचे जातकातून शेकडो उल्लेख आहेत.  देशात मालाचे तांडे वाळवंट ओलांडून पश्चिमेकडे भडोच बंदरापर्यंत व उत्तरेकडे गांधार व मध्य आशियाकडे जात.  भडोच बंदरातून मालाची गलबते, त्या वेळी 'बाव्हेरू' नाव असलेल्या हल्लीच्या बाबिलोनला माल पोचविण्याकरता इराणच्या आखातात जात.  जातकावरून दिसते की, देशातल्या देशात नद्यांमधूनही खूप व्यापार चाले.  काशी, पाटणा, चंपा (भागलपूर) आणि अशाच इतर ठिकाणांहून गलबते नदीमार्गे थेट समुद्रापर्यंत जात आणि तेथून दक्षिणेकडे पुढे सिलोन, मलायाकडे जात.  प्राचीन तामीळ काव्यातून कावेरीच्या तीरावरील कावेरीपट्टणम् बंदराचा उल्लेख, ते बंदर आंतरराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र होते असा येतो.  ही गलबते प्रचंड असावीत, कारण जातकातून म्हटले आहे की, एकेका गलबतात शेकडो व्यापारी आणि इतर बाहेर जाणारे प्रवासी असत.

उत्तर हिंदुस्थानात इसवी सनाच्या पहिल्या शतकात मिलिंद हा ग्रीक राजा होता, तो बौध्दधर्माचा मोठा पुरस्कर्ता झाला व त्याच्या नावाचे एक जातक आहे.  त्या मिलिंद जातकात पुढील उल्लेख आहे. ''एखाद्या बंदरातील गलबताचा मालक मालाची नेआण करताना घेतलेल्या भाड्यामुळे जसा श्रीमंत होतो आणि मग त्याला दूरवरचे समुद्रपर्यटन करणे शक्य होऊन तो वंग देशाला जाईल, ताक्कोलला जाईल, कधी चीनला जाईल किंवा सैबेरियाला जाईल, कधी सुरतला तर कधी अलेक्झांड्रियाला, कधी कारोमांडेल किनार्‍याला तर कधी आणखी दूर अपरांत बंदराला, जेथे गलबते जमतात तेथे जाईल.''

हिंदुस्थानातून बाहेर जाणार्‍या मालांत पुढील पदार्थ असत.  रेशीम, मलमल, तलम कापडांचे अनेक प्रकार, चाकू-सुर्‍या, चिलखते वगैरे, नक्षीदार कापड, कलाबतू, अत्तरे, सुगंधी पदार्थ, औषधे, हस्तिदंत आणि हस्तिदंती सामान, रत्ने आणि रत्नजडित वस्तू, सोने (चांदीचा उल्लेख नाही) इत्यादी. *

-----------------------------------------

*
१     सी. ए. एफ. र्‍हिस डेव्हिड्स् केंब्रिज, 'हिंदुस्थानचा इतिहास' खंड पृष्ठ २१२;
२    र्‍हिस डेव्हिड्स्-'बुध्दधर्मीय हिंदुस्थान'-पृष्ठ ९८.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel