खगोलज्योतिष शास्त्राचाही अभ्यास विशेष होता व पुष्कळ वेळी त्याचे रूपान्तर फलज्योतिषात होई.  औषधी-विद्येवर ग्रंथ होते, आणि रुग्णालयेही होती.  हिंदी आयुर्वेदाचा धन्वतरी हा मूळ पुरुष अशी आख्यायिका आहे.  परंतु या विद्येवरचे सुप्रसिध्द ग्रंथ ख्रिस्त शकाच्या आरंभीच्या काळातले आहेत.  ते चरक आणि सुश्रुत यांचे ग्रंथ होत.  चरकाने औषधीवर लिहिले आहे व सुश्रुताने शस्त्रक्रियेवर लिहिले आहे.  चरक हा कनिष्काच्या दरबारी राजवैद्य होता.  कनिष्काची राजधानी वायव्य प्रांतात होती.  चरक आणि सुश्रुत यांच्या ग्रंथांमध्ये अनेक रोगांची नावे आहेत, त्यांची चिकित्सा व त्यांचे निदान करण्याची पध्दती आहे.  शस्त्रक्रिया, प्रसूति-विद्या आणि प्रसूति-शास्त्रक्रिया, निरनिराळी स्नाने, आहार, आरोग्य, बालसंगोपन आणि आयुर्वेदीय शिक्षण इत्यादी विषय या ग्रंथातून आहेत.  हे ज्ञान आहे ते प्रयोग पध्दतीचे आहे.  अनुभव, प्रयोग यांच्यावर भर आहे.  शस्त्रक्रियेचे शिक्षण देताना शवच्छेदनाचा अभ्यास असे.  सुश्रुताने शस्त्रक्रियेची अनेक हत्यारे सांगितली आहेत व शस्त्रक्रियेचे अनेक प्रकार सांगितले आहेत.  त्यात अवयव कापून टाकणे, पोटावर शस्त्रक्रिया करून बाळंतिणीची सुटका करणे, पोटातील आंत्रविकारावर शस्त्रक्रिया करणे, डोळ्यातील् मोतिबिंदू काढणे अशा अनेक प्रकारांचा उल्लेख येतो.  जखम जंतुहीन, निरोगी ठेवण्याकरता धुरी देण्याचा प्रघात होता.  ख्रिस्तपूर्व तिसर्‍या-चौथ्या शतकात गुरांसाठीही दवाखाने होते.  जैन आणि बौध्दधर्मातील अहिंसेच्या महत्त्वामुळे या गोष्टी सुरू झाल्या असाव्यात.

प्राचीन हिंदी लोकांनी गणितात युगप्रवर्तक शोध लावले होते.  शून्याचा शोध, दशमस्थान मूल्य शोध, उणे चिन्हाचा शोध, बीजगणितात अज्ञात संख्येबद्दल अक्षरे वापरण्याची पध्दती या सार्‍या गोष्टींचे श्रेय प्राचीन भारतीयांना आहे.  हे शोध कधी लागले त्यांचा नक्की काल सांगता येणार नाही.  कारण एखादा शोध लावणे आणि व्यवहारात त्याचा प्रसार होणे, यांच्या दरम्यान कितीतरी काळ जातो.  परंतु एवढे खरे की, अंकगणित, बीजगणित आणि भूमिती यांचा पाया हिंदुस्थानात फार प्राचीन काळी घातला गेला होता.  ॠग्वेद कालातसुध्दा अंकगणनेचे मूळ साधन दहा हे आहे.  काळ व संख्या या कल्पनांचे भारतीय बुध्दीने केलेले आकलन पाहून आश्चर्य वाटते.  परार्धापर्यंत त्यांनी गणनावाचक स्वतंत्र नावे नमूद केली होती. ग्रीक, रोमन, इराणी आणि अरब यांच्याजवळ हजार, फार तर दहा हजारांच्या अंकाला (१०४) निरनिराळे शब्द होते.  हिंदुस्थानात अशी (१०१८) अठरा नावे आहेत, व अठराहूनही मोठी नामावळी आहे.  बुध्द जेव्हा लहानपणी शिकत होते, तेव्हा त्यांनी परार्धापर्यंतची अठरा नावे सांगितलीच, परंतु त्याच्या पलीकडे आणखी बत्तीस, म्हणजे एकूण दशस्थानमूल्यांची पन्नास स्वतंत्र स्थानांची (१०५०) नावे सांगितली, असा त्यांच्या एका कथेत उल्लेख आहे.

याच्या अगदी उलट जितके खाली, सूक्ष्म जाता येईल तितके जाण्याचाही प्रयत्न आहे.  कालगणनेचे लघुतम साधन, लघुतम घटक जो होता तो सेकंदाचा सत्तरावा भाग होता, आणि लांबी मोजण्याचा लघुतम घटक (१.३ × ७–१०) इंच होता.  हे सारे मोठे वा सूक्ष्म आकडे सर्वस्वी तात्त्विक असत, व त्यांचा उपयोगही.  तथापि हे तर मान्य केलेच पाहिजे की दिक् आणि काल यांची जी विशाल कल्पना भारतीयांना होती, ती दुसर्‍या देशात कोठेही नव्हती.

भारतीयांचे विचार, कल्पना सगळे विशाल प्रमाणावर चाले.  पुराणात कोट्यवधी, अब्जवधी वर्षांचे काळ असतात.  अर्वाचीन भूगर्भशास्त्रातले युगायुगांचे प्रचंड कालखंड किंवा अर्वाचीन ज्योतिषशास्त्रातील तार्‍यांची प्रचंड अंतरे पाहून त्यांना काही विशेष वाटले नसते.  हिंदी संस्कृतीच्या या विशाल पार्श्वभूमीमुळे युरोपात डार्विन वगैरेंच्या सिध्दान्तामुळे जो अंतर्बाह्य गोंधळ एकोणिसाव्या शतकात उडाला तसा तेथे उडाला नाही.  युरोपातील सर्वसाधारण लोकांच्या बुध्दीला झेपणारे कालमान म्हणजे फार तर काही हजार वर्षांचेच होते.

ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात उत्तर हिंदुस्थानात जी वजने-मापे होती ती, अर्थशास्त्रात दिलेली आहेत.  बाजारात नीट वजने-मापे आहेत की नाहीत ते पाहायला अधिकारी असत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel