सेल्यूकस हा अलेक्झांडरचा सेनापती होता, तो अलेक्झांडरच्या मरणानंतर आशिया मायनर ते हिंदुस्थानपर्यंतच्या सर्व मुलखाचा वारसदार झाला.  बरोबर सैन्य घेऊन सिंधू नदीच्या तीरावर, वायव्य प्रांतात पुन्हा आपली सत्ता प्रस्थापण्यासाठी तो चालून आला.  परंतु त्याचा पूर्ण मोड होऊन त्यालाच काबूल-हिरातपर्यंतचा अफगाणिस्थानचा भाग चंद्रगुप्ताला द्यावा लागला व सेल्यूकसच्या एका मुलीशी चंद्रगुप्ताने लग्न केले.  दक्षिण सोडून बाकी सर्व उत्तर हिंदुस्थानभर म्हणजे अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत आणि तिकडे उत्तरेला काबूलपर्यंत चन्द्रगुप्ताच्या साम्राज्याचा विस्तार होता.  ऐतिहासिक काळातील मध्यवर्ती सुसंघटित असे हे पहिलेच बलाढ्य हिंदी साम्राज्य झाले.  या प्रचंड साम्राज्याची पाटलिपुत्र ही राजधानी होती.

हे जे नवीन राज्य निर्माण झाले त्याचे स्वरुप, या साम्राज्याची व्यवस्था कशी होती ?  सुदैवाने हिंदी आणि ग्रीक दोन्ही वृत्तान्त भरपूर उपलब्ध आहेत.  मेग्यास्थेनिस हा सेल्यूकसचा पाटलिपुत्र येथील वकील होता, त्याने तत्कालीन हिंदी राज्यव्यवस्थेचे आणि समाजाचे वर्णन करुन ठेवले आहे.  दुसरा त्याहीपेक्षा महत्त्वाचा वृत्तान्त म्हणजे 'कौटिलीय अर्थशास्त्र' हा ग्रंथ आहे.  त्याचा उल्लेख मागे आलाच आहे.  चाणक्याचेच कौटिल्य हे दुसरे नाव होते.  यामुळे हा ग्रंथ नुसता पुस्तकी विद्येचा नसून अनुभवी मुत्सद्दयाचा म्हणून आपल्याला उपलब्ध आहे.  कारण चाणक्य हा एक महान पंडित होता, इतकेच नव्हे, तर मौर्य साम्राज्याच्या स्थापनेत; रक्षणात आणि विस्तारात त्याचे मोठे वर्चस्व होते.  चाणक्याची युरोपातील मॅकिएव्हिलीशी तुलना करण्यात येत असते व काही अंशी ही तुलना योग्य आहे.  परंतु मॅकिएव्हिलीपेक्षा प्रत्येक गोष्टीत चाणक्य मोठा होता, बुध्दीने महान होता, कृतीने महान होता.  एखाद्या राजाचा तो केवळ अनुयायी नव्हता, किंवा एखाद्या सर्वसत्ताधीश सम्राटाचा नम्र सल्लागार म्हणून नव्हता.  संस्कृतमध्ये मुद्राराक्षस म्हणून या काळावरचे एक नाटक आहे.  त्या नाटकावरुन आर्य चाणक्याचे चित्र फार यथार्थ दिसून येते.  धाडसी आणि योजनापटू, स्वाभिमानी आणि सूड घेणारा, अपमान कधी न विसरणारा, ध्येय कधीही दृष्टीआड न करणारा, शत्रूचा पराजय करण्यासाठी, त्याला फसवण्यासाठी हरएक युक्तीचा अवलंब करणारा असा हा चाणक्य मौर्य साम्राज्याचा खरा सूत्रधार होता.  सम्राट चंद्रगुप्ताला स्वामी मानण्यापेक्षा प्रिय पट्टशिष्य मानण्याची त्याची वृत्ती होती.  राजेशाही थाटामाटात काडीचेही लक्ष न घालता, तपस्व्यासारखी साधी, रुक्ष रोजची राहणी ठेवणारा हा ब्राह्मण त्याने दिलेले वचन व केलेली प्रतिज्ञा पुरी केल्यावर कशाची आशा ठेविली असेल तर ती ही राज्यकारभाराची धुरा खाली ठेवून ईशचिंतनात ब्राह्मणाला उचित असा जन्म घालवावा.

हेतुसिध्दीसाठी काहीही करायला चाणक्याने मागेपुढे पाहिले नाही.  त्याला कशाचीही दिक्कत वाटत नसे.  परंतु ध्येयाला अननुरुप अशा साधनांचा अवलंब केल्याने ते ध्येयही नष्ट होण्याचा संभव आहे ही गोष्ट जाणण्याइतका तो शहाणा होता. युध्द म्हणजे कोणत्याही इतर साधनांनी साधण्यासारखे नसले तर राज्याचे धोरण साधण्याचा पुढचा उपाय आहे, हा विचार क्लॉस् विट्झच्यापूर्वी कितीतरी वर्षे चाणक्याने सांगितला आहे, असे म्हणतात.  परंतु येवढेच सांगून तो थांबला नाही.  त्याने आणखी असेही म्हटले आहे की, ''युध्दासाठी युध्द कधीही नसावे; युध्दाने अधिक मोठे हेतू साध्य होत असतील तर त्याला काही अर्थ आहे.  युध्दामुळे परिणामी राज्याची स्थिती अधिक चांगली व्हावी या शुध्द हेतूनेच मुत्सद्दयांनी युध्द ठरवावे.  केवळ शत्रूचा पराजय, नि:पात एवढाच युध्दहेतू नसावा.  युध्दाने दोन्ही पक्ष धुळीत मिळणार असतील तर सार्‍या मुत्सद्देगिरीचे दिवाळेच निघाले म्हणायचे.  सशस्त्र साधनांनी, सैन्यबलाने युध्द चालवायचे असते हे खरे.  परंतु प्रत्यक्ष हल्ला करुन युध्दाला आरंभ करण्यापूर्वीच जिच्या जोरावर अगोदरच शत्रूचे नैतिक धैर्य नष्ट करता येते व त्याच्या सैन्यात दुफळी माजून तो असा हतबल होऊन जातो की, तो कोलमडून पडतो किंवा अगदी त्या बेताला येतो अशी पाताळयंत्री कारस्थाने करण्याची श्रेष्ठ बुध्दिमत्ता सैन्यापेक्षा फार महत्त्वाची आहे.  तरी बुध्दिमान आणि उदार वृत्तीच्या शत्रूला चिरडून टाकण्यापेक्षा त्याला आपला मित्र करुन ठेवणे चांगले हे तो विसरत नसे.  शत्रुपक्षात दुफळी पाडून कारस्थानाने त्याने अखेरचा विजय मिळवला होता.  परंतु आख्यायिका अशी आहे की, विजयाच्या त्या अखेरच्या क्षणाला प्रतिस्पर्ध्याशी उदारतेने वागायला चंद्रगुप्ताचे मन वळवून चाणक्याने स्वत:कडे असलेली अमात्यपदाची मुद्रा स्वत:च्या हाताने त्या प्रतिस्पर्ध्याच्या प्रधानमंत्र्याला दिली.  कारण त्या प्रधानाची बुध्दी आणि त्याची स्वत:च्या स्वामीविषयीची निष्ठा यांचा चाणक्याच्या मनावर खोल परिणाम झाला होता.  या नाटकाचा शेवट पराभव आणि शरणागती यामुळे निर्माण होणार्‍या कटुतेत न होता, परस्पर सलोख्यात गोडीगुलाबीचे नव संबंध निर्माण करण्यात होऊन शत्रूला आपलेसे करुन राज्याचा पाया स्थिर आणि शाश्वत करण्यात या एकंदर प्रकरणाची समाप्ती होते.

मौर्य साम्राज्याचे सेल्यूकसशी, तसेच त्याच मागून येणार्‍या राज्यकर्त्यांशी, टॉलेमी फिलॅडेल्फसशी आणि अशा रीतीने ग्रीक जगाशी राजकीय संबंध येत होते.  एकमेकांशी असलेल्या व्यापारी हितसंबंधांमुळे हे राजकीय संबंध कायम राहिले.  स्ट्रॅबो म्हणतो की, ''हिंदी माल कास्पियन समुद्र आणि काळा समुद्र यांच्या द्वारा युरोपात जात असे.  त्या महत्त्वाच्या मार्गाच्या साखळीचा ऑक्सस नदी हा एक दुवा होता.  ख्रिस्तपूर्व तिसर्‍या शतकात हा मार्ग फार वापरात होता तेव्हा मध्य आशिया भरभराटीत होता, कारण तो सुपीक व समृध्द होता.  पुढे एक हजार वर्षानंतर हा भाग रुक्ष होऊ लागला.  घोड्यांची निपज चांगली व्हावी म्हणून सम्राटाजवळ अरबी घोडे होते असा अर्थशास्त्रात उल्लेख आहे.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel