बुध्द-कथा

मी अगदी लहान होतो तेव्हासुध्दा मला बुध्द-कथा आवडे.  कैकवेळा मनाची चाललेली तडफड सोसताना झालेले दु:ख व क्लेश भोगून अखेर बुध्द-पद पावलेल्या तरुण सिध्दर्थाकडे माझ्या मनाचा ओढा हाता.  एड्विन अर्नोल्डचे ' आशियाचा प्रदीप ' हे काव्य माझे आवडते काव्य होते.  पुढे मोठेपणी माझ्या प्रांतात मी जेव्हा भरपूर हिंडलो फिरलो तेव्हा बुध्दांच्या आख्यायिकेशी संबंध आलेली स्थळे पाहणे मला आवडे व तेवढ्याकरता जरूर पडली तर काही वेळा दौर्‍याचा ठरलेला मार्गही बदलत असे.  ही स्थळे बहुतेक माझ्या प्रांतातच आहेत व काही प्रांताबाहेर असली तरी जवळच आहेत.  येथे नेपाळच्या सीमेवर बुध्द जन्मले, येथे ते भटकले; येथे गयेला (बुध्द-गया-बिहारमध्ये) बोधिवृक्षाखाली ते ध्यानस्थ बसले आणि त्यांना आत्मज्ञान झाले.  येथे त्यांनी पहिले प्रवचन दिले; आणि येथेच ते निर्वाणाला गेले.

ज्या देशात बौध्द धर्म अद्याप जिवंत आणि प्रभावी असा धर्म आहे, त्या देशात जेव्हा मी गेलो, तेव्हा तेथील बुध्दमंदिरे आणि मठ बघायला मी गेलो व तेथे मला बुध्दभिक्षू आणि बौध्द धर्मी सामान्य लोकही भेटले.  बौध्द धर्माचा या लोकांच्यावर काय परिणाम झाला आहे ते जाणून घेण्याचा मी यत्न करीत होतो.  त्या लोकांच्या मनावर, चेहर्‍यावर बौध्द-धर्माचा कोणता ठसा आहे, अर्वाचीन जीवनासंबंधी त्यांची काय प्रतिक्रिया आहे, ते मी पाहात होतो.  असे जे काही एकंदरीत पाहिले, त्यातला पुष्कळसा भाग मला अप्रिय वाटला.  फोलकट शब्दावडंबर, समारंभाचा खटाटोप, विधिनिषेधांचे ग्रंथच्या ग्रंथ, स्वत: बुध्दानेच टाकून दिलेला आध्यात्मिक काथ्याकूट, इतकेच नव्हे तर मंत्रतंत्र, या सर्व प्रकारांची पुटेच्यापुटे बुध्दाच्या मूळच्या सयुक्तिक नीतितत्त्वांच्या सिध्दान्तावर चढली होती.  बुध्दाने कानीकपाळी ओरडून सांगितले तरीसुध्दा ते न मानता अखेर या त्याच्या अनुयायांनी त्यालाच एक देव बनविला आहे.  देवळातून, आसमंतातून, जेथे जेथे गेलो तेथे बुध्दाच्या प्रचंड मूर्ती माझ्याकडे पाहातच होत्या व माझ्या मनात आले की हे सर्व पाहून बुध्दाला काय वाटेल ? पुष्कळसे भिक्षू मूर्ख व उध्दट होते.  त्यांचा हट्ट हा की, आम्हाला नसला तरी आमच्या वेषाला नमस्कार केलाच पाहिजे.  देशपरत्वे त्या त्या देशाचा छाप बुध्द धर्मावर बसून त्या त्या देशाच्या चालीरीती व राहणीप्रमाणे त्या धर्माचे रुप झालेले दिसले.  असे होणे स्वाभाविक आहे,  किंबहुना अपरिहार्य आहे.

परंतु चांगल्या गोष्टीही पुष्कळ आढळल्या.  काही विहारांतून, मठांतून आणि त्याला जोडून असलेल्या पाठशाळांतून जिकडेतिकडे अध्ययन व चिंतन संथपणे चाललेले दिसले.  पुष्कळ भिक्षूंची मुद्रा आत्मसंतुष्ट, शांत दिसे व चित्तवृत्ती गंभीर, सौम्य जगाच्या कटकटीतून मुक्त, अलिप्त वाटे.  ही मुद्रा, ही वृत्ती जगाच्या आजकालच्या जीवनपध्दतीशी सुसंगत आहे, का कटकट टाळण्याकरता हा पळ काढला आहे ?  जीवनात जी अखंड धडपड चाललेली असते, तिच्याशी या मनोवृत्तीचा मेळ घालून, ग्राम्यपणा, हावरटपणा, हिंसा या ज्या उपाधी आपल्यामागे लागल्या आहेत त्यांची पीडा कमी करता येईल का ?

जीवनाकडे पाहण्याची माझी जी दृष्टी आहे, तिच्याशी बुध्दधर्मातील निराशावादाचे जमेना, कारण जीवन आणि जीवनातील संकटांना भिऊन संसार सोडून निघून जाणे हेही माझ्या वृत्तीला मानवत नाही.  निसर्गशक्तीच्या नाना प्रकारांना देवदेवता मानून त्यांच्या मूर्ती कल्पून मूर्तिपूजा करणार्‍याची वृत्ती माझ्या अंगात कोठेतरी शिरून मनात दबाव धरून बसली आहे.  या वृत्तीला जीवन व निसर्गात असलेला उल्हास मानवतो व संसारातल्या धकाधकीच्या मामल्याचा कंटाळा येत नाही.  मी जे बरेवाईट अनेक अनुभव घेतले, मी जे सभोवती पाहिले, त्यातले बरेचसे जरी दु:खदायक आणि क्लेशकारी असले तरी या माझ्या वृत्तीत बदल झाला नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel